नेमकं काय हवं?

नेमकं काय हवं? करिअर मार्गदर्शन करताना, हे करा ते करा असं सांगणं सोपं. परंतु एकदा निर्णय घेतल्यानंतर यश मिळेल की नाही ही घालमेल का होते म्हणून अनेक पालक, विद्यार्थी समुपदेशन घेतात. त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या सारखे असंख्य पालक, विद्यार्थ्यांसाठी हा लेख.

वैयक्तिक आणि करिअरमधील यशाची पहिली पायरी म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये आणि करिअरमध्ये नेमकं काय पाहिजे हे माहिती करून घेणं. त्यासाठी आपल्याला आयुष्यात काय प्राप्त करायचं आहे हे ठरवून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या भावनिक, आर्थिक, बुद्धिमत्ता क्षमतेनुसार आणि व्यक्तिमत्त्व पाहून धेय ठरवतो.

करिअरचं ध्येय ठरवल्यानंतर दुसरं महत्त्वाचं ध्येय म्हणजे वैयक्तिक आणि कौटुंबिक. जर तुमच्या करिअरच्या आणि उत्पन्नाच्या ध्येयात तुम्ही ‘काय’ मिळवणं अंतर्भूत असेल, तर तुमच्या वैयक्तिक-कौटुंबिक ध्येयांमध्ये ते ‘का’ मिळवणं आवश्यक आहे याचा समावेश होतो. या सगळ्या ‘का’ प्रश्नांची उत्तरं मिळविण्यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठता आणि कामाला लागता.

आपल्या आयुष्यातली ध्येयं ठरविण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी साध्या सात पायऱ्यांची प्रक्रिया पार पाडावी लागते. ही प्रक्रिया अमलात आणणं अगदीच शक्य आहे. प्रभावी, व्यावहारिक अशा या पायऱ्यांचा अवलंब केलेले लोक यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणं आहेत.

१. ध्येय नेमकं आणि स्पष्ट असलं पाहिजे तरच त्याला ध्येय म्हणता येईल. आपल्याला नेमकं काय अपेक्षित आहे ते ठरवा. नेमकेपणा ठेवा. ‘मला श्रीमंत व्हायचं आहे, मला अधिक आनंदी व्हायचं आहे, मला आरोग्यपूर्ण राहायचं आहे, मला जगभर भटकंती करायची आहे’ अशा ढोबळ अपेक्षा सांगण्याची चूक करू नका. या अपेक्षांना ध्येय म्हणता येणार नाही. यांना फारतर इच्छा-आकांक्षा, भ्रम म्हणता येईल.

२. आपली ध्येयं कोणती ते लिहून काढने. एका सर्व्हेनुसार, तीन टक्के वयस्क लोक आपलं ध्येय गाठण्याचं स्पष्ट नियोजन लिहून काढतात. या व्यक्ती अशा प्रकारे ध्येय लिहून नियोजन न करणाऱ्या व्यक्तींपेक्षा साधारण दहा पटीने जास्त कमाई करतात.

३. वेळेची मर्यादा ठरवणे. आपलं ध्येय कधीपर्यंत पूर्ण करायचं आहे याची एक ठराविक तारीख ठरवून घ्या. जर आपलं एखादं ध्येय खूपच मोठं असेल तर एकदम ते पूर्ण करण्याच्या मागं न लागता त्या ध्येयाची छोट्या छोट्या भागांत विभागणी करा. या छोट्या छोट्या ध्येयांनाही पूर्ण करण्यासाठी निश्चित तारीख व वेळ द्या.

४. यादी बनवा. ध्येय गाठण्यासाठी जी कामं करणं आवश्यक वाटतात त्यांची यादी करा आणि जसं जसं आठवेल तशी त्यात अधिक भर घाला. ही यादी परिपूर्ण होत नाही तोवर हा सराव चालू ठेवा.

५. यादीतल्या कामांची क्रमवारी ठरवा. कुठल्या विशिष्ट क्रमाने आपली यादी तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि त्यातली कोणती कामं स्वतःला करावी लागणार आहेत याची एक चेकलिस्ट तयार करा. पहिल्यांदा काय करायचं आहे? दुसऱ्यांदा काय करायचं आहे? तिसऱ्यांदा काय करायचं आणि असं पुढे पुढे. ठराविक क्रमाने काम करण्यासाठी तयार केलेल्या चेकलिस्टचं रूपांतर पुढे आपोआपच कृती कार्यक्रमात होतं.

६. आपण ठरवलेल्या नियोजनानुसार कृती करण्यास सुरुवात करा. काहीही करा, कोणतीही गोष्ट करा, परंतु लगेच कामाला सुरुवात करा. पहिलं पाऊल उचलणं हेच सगळ्यात अवघड काम असतं. ज्या कामाला आपण कधीच सुरुवात करत नाही असंच काम कठीण मानलं जातं.

७. आपल्या सर्वांत महत्त्वाच्या ध्येयावर रोज काही ना काही काम केलंच पाहिजे. यश मिळविण्यासाठी आठवड्यातील सात दिवस, महिन्याचे तीसही दिवस काही ना काही हालचाल करत राहा. एकही दिवस अजिबात वाया घालवू नका. अगदी दररोज आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने एकेक पाऊल पुढे सरकायचं आहे हे ध्यानात ठेवा.

स्वकष्टाने लक्षाधीश झालेल्या ८५% लोकांचं एकमेव, प्रबळ ध्येय होतं की, रोजच्या रोज काम करणं. आपलं पण असायला हवं. उद्दिष्टपूर्ण कृतिशीलता हा यश मिळवण्याची सुरुवात असते. आपल्या नियोजित ध्येयांच्या आणि उद्दिष्टांच्या दिशेने जितक्या पद्धतशीरपणे, नियोजित कृती करणार तितक्या अधिक वेगाने आपण आपल्या अपेक्षांची पूर्ती करू शकु.

तरुण, तरुणी, वयस्कर मंडळी कुणीही, कधीही हे करू शकतं. मोटिवेशन महत्वाचं. आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर तब्येतीकडे कशा प्रकारे लक्ष दिलं पाहिजे आणि तंदुरुस्ती कशी मिळवली पाहिजे याबद्दल नीट विचार करा म्हणजे सर्वकाही मिळेल.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *