लोकांना न दुखावता त्यांना कसे सुधारावे यावर काल विशेष चर्चा झाली. समोरून बोलणारी व्यक्ती एका कंपनीची मॅनेजर होती. रोजच्या कामात त्याला सर्वात मोठा अडसर होता त्याचा स्वभाव. अतिशय फटकळ आणि पटकन राग येणारा म्हणून थोडा प्रसिद्ध. मनमोकळे बोलताना त्याच्या मानसिकतेचे विश्लेषण करता आले.
अर्थात त्यालाही त्याच्या स्वभावाची माहिती असल्याने समुपदेशन घेणे त्याने योग्य समजले. ठराविक गोष्टी त्याला सांगणे क्रमप्राप्त होते. कुठे चुका होतात हे समजाऊन सांगतानाच काय करावं हे त्याच्या लक्षात आणून दिले.
१. आपल्या बोलण्याची सुरुवात नेहमी खर्या कौतुकापासून केली पाहिजे. आधी जर आपण आपल्या चांगुलपणाची स्तुती ऐकली तर नंतर मग आपल्यातील वाईटपणाबद्दल ऐकणे त्रासदायक होत नाही.
२. लोकांना त्यांच्या चुका थेटपणे सांगण्याची कधीही चूक करू नये. अप्रत्यक्ष स्वरूपात कोणाचीही निंदा ठराविक काळच होऊ शकते.
३. कोणाचीही निंदा करण्यापूर्वी आपल्या सर्व चुका आणि उणिवा नक्कीच सांगा. एक कुशल आणि योग्य नेता या सिद्धांताचे अवश्य पालन करतो.
४. कठोर आदेश दीर्घ काळ चालणार्या आक्रोशाला जन्माला घालीत असतात. मग हा आदेश चूक सुधारण्यासाठी दिलेला असला तरीही. म्हणून सरळ सरळ आदेश देण्याऐवजी प्रश्न विचारा.
५. बहुतेक लोक दुसर्याच्या सन्मानाला पायदळी तुडवितात. आपण दुसर्याच्या चुका काढीत असतो. इतरांसमोर कर्मचारी आणि मुलांची अशी निंदा करतो, जणू काही त्यांना इज्जतच नाही. त्याऐवजी समोरच्या व्यक्तीला शर्मिंदे होऊ देऊ नका. त्याचा सन्मान करा.
६. थोड्याशा का असेना, पण प्रत्येक सुधारणेचे मोकळ्या मनाने कौतुक करा.
७. इतरांना प्रोत्साहित करा. चुका सुधारणे अवघड काम नसल्याचे त्यांना सांगा.
८. आपल्या समोरच्या व्यक्तीवर एखादे काम अशा प्रकारे सोपवा की, तो तुमचे म्हणणे ऐकण्यासाठी आनंदाने तयार होईल.
लोकांचे वागणे आणि दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता पडेल तेव्हा एका कुशल आणि प्रभावी व्यक्तीने ही तथ्ये लक्षात ठेवायला हवीत-
१. नेहमी प्रामाणिक रहावे. जो पूर्ण करता येणार नाही असा वायदा चुकूनही करू नये. फक्त आपल्याच फायद्यावर लक्ष केंद्रित न करता समोरच्या व्यक्तीच्या फायद्याकडेही लक्ष द्यावे.
२. समोरच्या व्यक्तीकडून तुम्हाला काय करून घ्यायचे आहे ते तुमच्या डोक्यात एकदम स्पष्ट असायला हवे.
३. आपले म्हणणे पूर्ण आत्मविश्वासाने जोर देऊन मांडा. समोरच्या व्यक्तीला काय हवे आहे, ते स्वत:लाच विचारा.
४. तुम्ही सुचविलेल्या कामामुळे समोरच्या व्यक्तीचा काय फायदा होऊ शकतो, या बाबीचाही शांततने विचार करा.
५. त्यानंतर हेच फायदे समोरच्या व्यक्तीच्या इच्छांसोबत जोडा. समोरच्या व्यक्तीला आग्रह करताना ही गोष्ट त्याच्यासाठी किती फायदेशीर होऊ शकते ते सांगा.
कामगार व्यवस्थापन आणि औद्योगिक मानसशास्त्र यामध्ये आपल्या सहकाऱ्यांबरोबर बोलताना, वागताना काय काळज्या घ्याव्यात याबद्दल खूप काही सांगितले आहे. एक महत्वाची गोष्ट जी सगळीकडे कामाला येते ती म्हणजे,
“कौतुक मनासाठी सूर्याच्या सुखदायक प्रकाशासारखे असते. कौतुकाशिवाय व्यक्तिमत्त्वाचे पुष्प विकसित होत नाही. तरीही लोक दुसर्यांशी वागताना निंदेचा गारवा वाढवितात आणि कौतुकाच्या सुखद ऊन्हापासून वंचित ठेवतात.”
तरीही या गोष्टींचा वापर केल्यावरही सर्व व्यक्तींची प्रतिक्रिया सारखीच सकारात्मक असेल असे समजण्याचा मूर्खपणाही आपण करू नये. या सिद्धांतानुसार वागल्यामुळे यश मिळण्याची शक्यता अनेक पटीने वाढत असल्याचे अनेक लोकांच्या अनुभवावरून हेच सिद्ध होते. हे यश या सिद्धांतामुळे १० टक्के जास्त वाढले तरीही तुम्ही पूर्वीपेक्षा १० टक्के जास्त चांगले लिडर सिद्ध होता आणि त्यामुळे तुम्हाला लाभच लाभ होतो.
©श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ज्ञ