माणसं कळत- नकळत, सुचेल आणि जमेल त्या तंत्राचा अवलंब तणावमुक्तीसाठी करीत असतात. कारण तणावग्रस्तता अत्यंत त्रासदायक आणि क्लेशकारक अशी अवस्था असते. काहीजण मूलभूत असे राजमार्ग प्रयत्नांनी शोधतात, तर काहीजण सोपे तात्कालिक मार्ग, कधी चोरवाटा, कधी पळवाटा धुंडाळतात. ते करीत असलेली मात कधी वास्तव, तर कधी भ्रामक असते. वेळोवेळीच्या या परीक्षेत काहीजण नापास होतात, तर काहीजण पास. विविध देशातील अनेक लहान मोठेदेखील मनावर ताण आले, की भविष्य- ज्योतिष याचा विचार करतात. तणावमुक्तीसाठी वापरला जाणारा हा सोपा वाटणारा आणि लोकप्रिय मार्ग म्हणायला हरकत नाही. अंकज्योतिष, हाताच्या रेषा पाहणे अशा अनेक पद्धती अस्तित्वात आहेत. आयचिंग ही भविष्यवेधाची पाच हजार वर्षं पुराणी अशी चिनी पद्धती आहे. तुम्ही विशिष्ट समस्येबाबत कसं वागणं हितकारक ठरेल, हे सांगणारा असा हा एक साहित्य-चमत्कार आहे. नियतीच्या मनाचा वेध घेण्यासाठी राजवंशातील लोकही याचा वापर करीत. हाही तणावमुक्तीचा एक मार्ग.
तणावमुक्तीसाठी वापरले जाणारे विविध मार्ग, उपाय आहेत.
१. ताण – तणावांबाबत माहिती / ज्ञान प्रश्नावली/चर्चा/समुपदेशन (कौन्सिलिंग) /तज्ज्ञांची मदत. आत्मज्ञान आपलं व्यक्तिमत्त्व, गुणावगुण, संधी, बलस्थानं, धोके, अडचणी, दुर्बलता, भोवतालची परिस्थिती याबाबत वास्तव जाणीव. आत्मपरीक्षण उदा. रोजनिशी (डायरी लिहिणे) सायकॉलॉजिकल टेस्टस् अर्थात मानसशास्त्रीय चाचण्या.
२. झोप/ विश्रांती/ मनोरंजन याबाबत योग्य भूमिका, सवयी व त्यासाठी वेळेचं नियोजन. सुयोग्य आहार/ व्यायाम/ आरोग्यदायी जीवनपद्धती योग्य/ प्राणायाम/ शवासन/ स्वसंमोहन/ रिलॅक्सेशन तंत्र/ मेडिटेशन/ ध्यान इत्यादी. लैंगिक सुख/वस्तुनिष्ठ सुखसोयी.
३. अनुभव व ज्ञान, वेळेचं नियोजन, निर्णयशक्ती, परस्परसंबंध, व्यावसायिक ज्ञान, आत्मसंरक्षण, स्वयंपाक, मुलांचं संगोपन वगैरे अनेक विषयांचे ज्ञान व अनुभव जे त्या व्यक्तीच्या जीवनाला आवश्यक आहेत. विवेकनिष्ठा जीवनदृष्टी/समाजशीलता. जीवनविषयक धोरण व त्यामागील तत्त्वज्ञान निश्चित करणे. भावनिक व बौद्धिक आंतरव्यक्ती संबंधातील समस्याबाबत समुपदेशन व मार्गदर्शन.
४. विनोद/ कला/ छंद/ क्रिएटिव्हीटी/ कार्यमग्नता इत्यादी. श्रद्धा/ भक्ती/ जप/ ध्यान/ भविष्यवेधाचा प्रयत्न/ धर्मनिष्ठा इत्यादी.
५. औैषधं अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, बॅचफ्लॉवर रेमेडीज्. इतर पर्यायी थेरपी जसे की रंगचिकित्सा/ प्रकाशचिकित्सा/ संगीत/ संमोहन इत्यादी.
६. तत्त्वज्ञान आणि योगसाधना यावर आधारित असे मार्ग. (SSY, आर्ट ऑफ लिव्हिंग, इत्यादी.)
तणावमुक्तीसाठी अशी अनेक तंत्रं माणसं कळत-नकळत वापरतात. पण अनेकांना या तंत्राची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे ही तंत्रं कशी वापरावीत, हे त्यांना कळत नाही. काहीजण एक-दोन तंत्रंच सर्व समस्यांसाठी वापरतात व अपयशी ठरतात. प्रत्येक वेळेची समस्या (ताण तणावांचा प्रकार) वेगळी असते. तेव्हा तणावमुक्तीची तंत्रं अनेक आहेत व ती अनुभवानुसारतणावमुक्तीचे राजमार्ग माहीत करून घ्यायचे आणि ते आपल्या समस्यासाठी चपखलपणे वापरायचे. तणावमुक्त होण्यासाठी आपलं जीवनविषयक धोरण व त्यामागील तत्त्वज्ञान निश्चित करायला हवं. आपली जीवनदृष्टी बदलायला हवी.
ताण-तणावांवर स्वार होण्याचे मार्ग माहीत करून घ्यायचे आणि ते आपल्या समस्यासाठी चपखलपणे वापरायचे. मग प्रत्येक दिवस आपला! ताण-तणावांवर स्वार होण्याचा!
श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ज्ञ