भूतकाळ आणि चिंता

“चिंता” याविषयावर मी नेहमीच लिहित आलोय कारण तिच एकमेव मोठी गोष्ट आपल्याला मानसिक त्रासाकडे नेत असते. त्याबाबत एका वेबीनार मध्ये आम्ही काल मोठी चर्चा केली. त्यात शेक्सपियर ने लिहिलेलं एक वाक्य मी इतरांना सांगितलं की “बुद्धिमान व्यक्ती कधीही आपल्या नुकसानीबद्दल शोक करीत नाही, तर हे नुकसान कसे भरून काढता येईल याचा आनंदाने विचार करतात.” याचाच अर्थ असा की आपल्या हातून घडून गेलेल्या चुकांचे शांत डोक्याने विश्लेषण करणे, त्या विश्लेषणाचा फायदा करून घेणे आणि मग त्या चुका विसरून जाणे. हा सर्वात चांगला फंडा चिंतेला दूर ठेवण्याचा आहे.  

चिंतेने तुम्हाला मिटवून टाकण्यापूर्वी तुम्ही चिंता मिटवा. कशी ते आपण खूप वेळा बोललो आहोत.

१. आपले डोके सतत व्यस्त ठेवून चिंता बाहेर काढून टाका.

२. बारीक सारीक गोष्टीवरून गोंधळ करू नका. बारीक सारीक गोष्टी म्हणजे वाळवीला आपला आनंद वाया घालवू देऊ नका.

३. आपल्या चिंतावर मात करण्यासाठी सरासरीचा नियम वापरा.

४. स्वत:लाच विचारा, ‘ही गोष्ट घडण्याची किती शक्यता आहे?’

५. आपल्या चिंतावर ‘स्टॉप लॉस’ ऑर्डर लावा. कोणत्या गोष्टीबद्दल किती प्रमाणात चिंता करायची हे नक्की करा.

६. भूतकाळ गाडून टाका. करवतीने भुसा चिरण्याचा प्रयत्न करू नका.

७. कुणाच्याही भूतकाळात शिरू नये, बोलू नये. इतरांनाही थांबवा.

८. आजच्या कर्मावर उद्या आहे हेही तितकेच सत्य.

होतं काय की माहिती असते पण त्याचा कुणी कसा वापर करायचा किंवा तो मी नव्हेच असं वागायचं. थोडक्यात चिंता ही जन्मजात व्यंग आहे आणि ती बरोबरच राहणार असा विचार योग्य नाही. चिंता आणि भूतकाळ यांचा परस्पर संबंध आहे.

तुम्ही करवतीने भुसा कापू शकत नाहीत, हे उघड सत्य आहे. कारण तो आधीच चिरलेला आहे. तो भूतकाळ आहे. ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही चिंता करीत असता तेव्हा तुम्ही करवतीने भुसा चिरण्याचा प्रयत्न करीत असता.

१. मी पूर्वी खूप छान काम करायचो ते आता होत नाही.

२. माझे जुने मित्र माझ्याशी पूर्वीसारखे बोलत नाहीत.

३. मी नेहमी वर्गात पहिला यायचो पण आता येत नाही.

४. माझ्या पूर्वीच्या चांगल्या सवयी आता राहिल्या नाहीत.

५. माझा पूर्वीचा फिटनेस राहिला नाही.

असे अनेक रोजच्या जगण्यात येणारे विचार आपल्याला चिंता करायला मजबूर करतात आणि जर आपण विचारात सुधारणा नाही केल्या तर दुःख आपला पिच्छा सोडणार नाही.

त्यामुळे आपला काहीही फायदा होत नसल्याचे आपल्याला आढळून येते. नदीमध्ये पुढे वाहून गेलेल्या पाण्याने तुम्ही पिकांचे सिंचन करू शकत नाहीत आणि लाकडाचा तो ओंडकाही कापू शकत नाहीत जो नदीमध्ये पुढे वाहून गेला आहे; पण त्यामुळे तुम्ही आपल्या चेहर्‍यावर सुरकुत्या आणि पोटामध्ये अल्सर मात्र नेहमीसाठी पाळू शकता.

चिंता न करणे अशक्य असले तरीही आपल्याला त्याला कसं हॅण्डल करावं याची माहिती ठेवली व आचरणात आणली तरीही खूप झालं. उतू गेलेल्या दुधाला साफ करायचं की त्यावर रडत बसायच हे आपण ठरवायचं. जबाबदारी आणि विचारांचे संतुलन महत्वाचे. विश्लेषण करून चुक सुधारने आणि घडलेली घटना विसरून पुढे चालणे हाच सुखाचा मंत्र.

 

©श्रीकांत कुलांगे

मानसोपचार तज्ञ

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *