अनेक वृध्द मंडळी आज आपापले नातवंडे आणि इतर मंडळीसह चांगल्यापैकी स्थिर आहेत. याउलट काही वृध्द मंडळी अनेक मानसिक त्रासातून जाताना आढळली आहेत. त्यांच्या बऱ्याच अडचणी असून त्यांना काय करावं हे लक्षात येतं नाही. आयुष्यभर कुटुंबासाठी झगडणाऱ्या या मंडळींना शेवटच्या पर्वात मात्र हालअपेष्टांना तोंड द्यावे लागते. त्यातून ज्या ताण तणाव आणि समस्या निर्माण होतात त्या काही खालील प्रमाणे.
१. जनरेशन गॅप मुळे असलेला तणाव. यामुळं मुलं, सुना, नातवंडांशी मतभेद.
२. निवृत्तीमुळे आत्मसन्मानाला बाधा, वाढत्या वयाच्या मुलांशी बरोबरीनं वागायला लागणं.
३. पती-पत्नीपैकी एकजण आधी जाणार हा वियोग किंवा दूर प्रांतात निघून गेल्यामुळं किंवा शारीरिक कमजोरीमुळं, कमी झालेल्या जुन्या मित्रांऐवजी नवे मित्र शोधणं.
४. ‘वृद्धाश्रमा’त राहावं लागणं.
५. आपली गरज नाही असं वाटून येणारं औदासीन्य, एकाकीपणा.
६. मानसिक, शारीरिक व आर्थिक क्षमता कमी झाल्यामुळं वाटणारी असुरक्षितता व परावलंबन.
७. शारीरिक असहायता, आजारपणं, बाह्यरूपात बदल, असमर्थता.
८. वृद्धांना मिळणाऱ्या दुय्यम स्थानामुळं तरुण दिसण्यासाठी धडपड.
९. मृत्यूची भीती.
१०. बदलत्या आर्थिक आणि शारीरिक परिस्थितीला साजेशी जगण्याची, राहण्याची परिस्थिती प्रस्थापित करणं.
११. आर्थिक असुरक्षितता काही जणांच्या बाबतीत इतकी अधिक असते की, प्रस्थापित राहणीमानात मोठे बदल करणं भाग पडतं.
१२. वाढत्या रिकाम्या वेळेचा उपयोग करून घेण्यासाठी नवीन काम शोधणं.
१३. विक्रेते, गुंड यांच्याकडून लुबाडले जाण्याची शक्यता व अशावेळी स्वसंरक्षण करण्यास असमर्थ ठरणं.
खास वृद्धावस्थेतील अशा अनेक ताणतणावांना व समस्यांना म्हातारपणी तोंड द्यावं लागतं. कारण अपरिहार्य असे शारीरिक, भावनिक, बौद्धिक, सामाजिक बदल शरीरात, मनात, समाजात, भोवतालच्या परिस्थितीत घडतात. म्हणून हा वर्ग प्रचंड अस्वस्थ होतो. यावर उपाय शोधणे हे सुध्दा जिकरीचे असते.
जेव्हा आपण स्वत:चा, एखाद्या व्यक्तीचा किंवा परिस्थितीचा स्वीकार करतो तेव्हाच काळजी किंवा तक्रार न करता त्यावर उपाय शोधू लागतो.
१. स्वीकार – तरुण पिढी आपल्यापेक्षा वेगळ्या आचारविचाराची असणार याचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ‘ते जसे आहेत’ तसा स्वीकार करणे हितावह.
२. विश्वास – आपली काळजी घेतली जाईल. प्रेम, आदर मिळेल असा त्यांच्याबद्दल विश्वास बाळगा आणि तो व्यक्त करा.
३. कृतज्ञता – तुमच्यासाठी तरुण पिढी जे करते त्याबद्दल आवर्जून कृतज्ञता व्यक्त करा. ती आपण पालक म्हणून जे केलं त्याची परतफेड आहे, असं समजल्यास त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं राहून जातं आणि ही गोष्ट त्यांना बोचते.
४. मान्यता – तरुण पिढीतील प्रत्येकाला जीवनाबद्दलच्या त्यांच्या निर्णयांबद्दल मान्यता हवी असते. त्यांना त्यांच्या, कर्तृत्वाबद्दल मान द्या. बरोबरीच्या नात्यानं, सन्मानानं वागवा. खूप वेळा प्रौढ मुलांनांही ‘लहान’ समजूनच बोललं, वागलं जातं हा त्यांना आपला अपमान वाटतो. तुम्ही त्यांच्या वयाचे असताना तुमची मानसिकता काय होती, हे आठवून पहा.
५. कौतुक, प्रशंसा – मुलांच्या कर्तृत्व, यश, खास तुमच्यासाठी केलेल्या कृत्याबद्दल तरुण पिढीतील प्रत्येक माणसाचं कौतुक, प्रशंसा करायला विसरू तर नकाच.यामुळे त्यांचा आत्मगौरव संतुष्ट पावेल.
६. प्रोत्साहन – तरुण पिढीतील प्रत्येक व्यक्तीमध्ये जे जे चांगलं आहे त्याबाबत प्रोत्साहन द्या.
भौतिक सुखसोयींमधील त्रुटी, तरुण पिढीच्या वागण्याबद्दल कुरकुर, तुमच्या भावनिक गरजा योग्य प्रकारे भागविल्या न जाणं, आजारपण या सर्व गोष्टींबद्दल चिंता, काळजी, वैताग, संताप, दु:खी, कष्टी, उदास होणं, वैफल्य अशा नकारात्मक भावना स्वत:मध्ये निर्माण करण्याची चूक आवर्जून टाळा. करावी लागणारी प्रत्येक गोष्ट खूप आनंदानं करा. आवश्यक तेथे तडजोडही करा; पण मिळालेलं बोनस आयुष्य हसत-खेळत जगा! प्रत्येक दिवस उत्साहानं साजरा करा. तसं तत्त्वज्ञान, जीवनाबद्दलचा दृष्टिकोन अंगीकारा, योजना आखा.
वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास ताण तणाव नियमन करण्यासाठी तयार व्हाल. बघा प्रयत्न करून. शक्य असल्यास समुपदेशन घ्या, मन व्यक्त करा.
©श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ज्ञ
Very useful article it is.
DR. Shrikant thank you very much.