मन आणि मानसिक आरोग्य

बऱ्याच मानसिक आजारांवर योग, ध्यान प्रभावी उपचार आहेत हे सांगण्यात येते. अनेक पेशंटची धारणा असते की हे उपचार केले की मनावर कंट्रोल राखणं शक्य होईल. परंतु ते सहज शक्य नसते.

योग आणि ध्यान या दोन गोष्टी निद्रानाश, मनाची चंचलता आणि उतावीळपणा या सर्वांवर प्रभावी उपाय आहेत. योगाभ्यासामध्ये असं सांगितलं गेलं आहे की आपल्या निद्रेचे मुख्य चार स्तर असतात. जर आपल्याला गाढ झोप हवी असेल तर आपल्याला आपल्या मनावर नियंत्रण मिळवता आलं पाहिजे. त्याच्या स्वैर संचाराला लगाम लावता आला पाहिजे. योगाचं पहिलं तत्त्व हेच सांगतं की तुम्ही शरीर नाही हे ओळखणं.

वास्तवात आपण आपल्या भावना आणि विचार यांच्यापेक्षाही वेगळे आहोत. खरं चैतन्य जरी शरीरात वास करत असलं तरीही ते मन आणि बुद्धी यांच्याही पलीकडे आहे. बंधन आणि मुक्ती या दोन्हींचं कारण मनच आहे. जर मन नियंत्रणामध्ये असेल तर ते माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे आणि जर तेच मन त्याच्या नियंत्रणाच्या बाहेर गेलं तर तेच त्याचा सर्वात मोठा शत्रू बनतं. नकारात्मक भावनांचं कारण इतरत्र कुठे नसून ते आपल्याच आतमध्ये असतं. आपण आपल्या रागाचं कारण बाहेर शोधणं बंद करायला हवं. यामुळे आपल्या विचारांमध्ये प्रगल्भता यायला लागते.

अध्यात्म म्हणजे विचारांना दाबणं नाही तर विचारांवर नियंत्रण मिळवणं होय. नकारात्मक आणि त्रासदायक विचारांना बाजूला करून आपल्या मनामध्ये चांगल्या विचारांनी भरणं होय. आपल्याला जेव्हा कोणत्याही गोष्टीचा त्रास होतो. एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडते तेव्हा कोणाला दोष द्यायला हवा याचं विश्लेषण गीतेच्या खालील सुभाषितामध्ये दिलेलं आहे.-

१. तुम्ही दुसऱ्यांना दोष देऊ नका. ते तर फक्त त्या घटनेसाठी निमित्तमात्र असतात.

२. चंद्र-सूर्यालाही दोष देऊ नका. ते तर दूरस्थ कारणमात्र आहेत.

३. ग्रह-ताऱ्यांनाही दोष देण्यात अर्थ नाही, ते तर फक्त काही अंशीच प्रभाव करतात.

४. कर्माला दोष देऊ नका, कारण ती फक्त आपल्या क्रियांची प्रतिक्रिया असते.

५. वेळेला दोष देऊ नका, कारण ती फक्त घटनांची साक्षी असते.

६. खरंतर या सगळ्यांमध्ये मनालाच दोषी ठरवायला हवं, जे सगळा विचार करतं, विविध भावना निर्माण करतं आणि आपल्या प्रत्येक अनुभवांचा कर्ताधर्ता असतं. आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं त्यासाठी मनच जबाबदार असतं.

जेव्हा आपण भौतिक जगाशी जोडले जातो तेव्हा आपण आपली खरी ओळख विसरतो आणि शरीराशी, मनाशी आणि बुद्धीशी जोडले जातो. त्यामुळे आपण स्वत:ला नकळत शरीर, मन आणि बुद्धी मानायला लागतो. आपण या तीन स्तरांपेक्षा फार वेगळे आहोत. आपण शरीर, मन आणि बुद्धीचा योग्य प्रकारे वापर करून या नकारात्मकतेवर विजय मिळवू शकतो.

मग मन म्हणजे नेमकं काय? मन हा आपल्या अंतरंगातील एक पडदा आहे. आपल्या इंद्रियांद्वारे जी काही माहिती पुरवली जाते ती आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचवण्याचं ते एक माध्यम आहे. याचाच अर्थ बाहेरील जगामध्ये डोकावून बघण्यासाठी मन ही एक खिडकी आहे.

मनापासून सावध का राहायला हवं? मन आपल्याला आपल्या मूळ उद्देश्यापासून दूर घेऊन जातं. विचारशून्य अवस्थेपासून आपल्याला दूर नेतं आणि आपला वेळ वाया घालवतं. मनच आहे ज्यामुळे जे सहज शक्य आहे ते कठीण वाटायला लागतं आणि बिनकामाच्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या भासायला लागतात. याही पुढे जाऊन मन आपल्याला अनावश्यक गोष्टी करण्यास भाग पाडतं. आनंदाची आणि सुखाची एक भ्रामक कल्पना निर्माण करतं. आपल्याला आदर्श जीवनाचं चुकीचं चित्र दाखवतं आणि जेव्हा त्या सर्व अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा ते आपल्या चुकीच्या वर्तणुकीसाठी आपल्यालाच दोषी ठरवतं. असे कितीतरी प्रसंग भूतकाळामध्ये घडले असतील जेव्हा तुमचंच मन तुम्हाला एखादं काम करायला भाग पाडतं, त्यासाठी तुम्हाला तयार करतं आणि मग त्या जाळ्यामध्ये तुम्हाला अडकवतं.

मग आपण कशाप्रकारे मनावर नियंत्रण मिळवू शकतो? सर्वात पहिली गोष्ट आपण ही समजली पाहिजे की आपण विचार नाही. आपल्यामधील चैतन्य आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण मनाचा हा खेळ ओळखू शकतो. त्यामुळे विचारांचं योग्य प्रकारे निरीक्षण केल्यावर आणि योग्य पद्धतीने मनाकडे पाहिल्यावर आपण मनाच्या आपल्यावर असलेल्या नियंत्रणाला आळा घालू शकतो. आपण जेव्हा आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न करतो तेव्हा आपण आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य प्रकारे उपयोग करू शकतो. सद्सद्विवेक बुद्धीच्या जोरावर आपण आपल्या मनाला योग्य प्रकारे नियंत्रित करू शकतो.

मानसिक आरोग्य हे शेवटी आपल्या या सर्व वरील गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणून मनाला ओळखा आणि आनंदी राहा.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *