‘‘आमच्या घरातलं वातावरण म्हणाल तर ते सदैव विस्कळीत असतं. कायमच तंग परिस्थिती असते. एवढा मोठा परिवार आहे की, त्यामध्ये काही ना काही कुरबुरी चालूच असतात. काय करावं?” माझा सल्ला घेण्यासाठी आलेल्या एका दाम्पत्यापैकी मध्यमवयीन व्यक्ती बोलत होती. पांढरपेशा कुटुंबातली, व त्यांच्या चेहऱ्यावरनं बरंच काही त्यांनी सोसल्याचं जाणवत होतं.
आपल्या समाजातल्या कुटुंबव्यवस्थेचं अनेकदा गुणगान केलं जातं. एकमेकांना धरून राहणारी आपण भारतीय माणसं पाश्चात्त्यांपेक्षा उजवे म्हणून असा तोरा मिरवतो. परंतु बऱ्याच ठिकाणी वस्तुतः परिस्थिती खालील प्रमाणे दिसून येते.
१. आपल्याकडच्या कुटुंबातदेखील बरेच अंतर्गत संघर्ष घडत असतात. शाब्दिक चकमकी घडत असतात. अनेकदा वरकरणी सुखी भासणाऱ्या एकत्र कुटुंबाच्या डोलाऱ्याखाली त्या कुटुंबातल्या स्त्रियांचे नि:श्वास दबलेले असतात.
२. कधीकधी काही कुटुंबात दुर्दैवानं एखादा जुना हट्टी मनोविकार असलेला रुग्ण असतो आणि त्याला सांभाळत संसार पुढे ढकलणं कठीण होऊन बसतं; पण अशा व्यक्तीकडून कसल्या अपेक्षा कराव्या याचा हिशोब समजला तर अपेक्षाभंगाचं दु:ख होत नाही आणि त्याची सल कमी होऊ शकतो.
३. मोठ्या कुटुंबातनं जाणवणारा हा आणखी एक प्रकार म्हणजे, इथे लहान मुलगा पन्नास वर्षांचा झाला तरी धाकटा राहतो. त्याला सर्व गुन्हे माफ अशा थाटात वागवण्यात येतं.
४. बऱ्याचदा मोठ्या कुटुंबामध्ये असे प्रसंग घडतात. कुटुंबातील दीर, नणंद, जाऊ किंवा इतर कुणीतरी नातलग घरातील शांत व ऐकून घेणाऱ्या व्यक्तीला विनाकारण टोचून बोलत असतात. ती व्यक्ती विरोध न करता मुकाट्याने हे सर्व ऐकून घेत असली तर तसल्या बोलण्याचे त्यांना अपराधीपणदेखील वाटत नाही.
५. संयुक्त कुटुंबापेक्षा एकत्र कुटुंबामध्ये अनेक अडचणी असतात. व्यक्ती तितक्या प्रकृतीप्रमाणे सगळ्यांचे स्वभाव वेगळे असतात. अशावेळी घरातल्या सुनांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं. त्या घुसमटतात. त्यानंतर वादांना तोंड फुटतं, मनं दुखावली जातात आणि घराचं घरपणही हरवतं.
टाळता येण्याजोगा मनस्ताप टाळलाच पाहिजे. त्यासाठी अनेक सल्ले व्यक्तिनुरुप किंवा परिस्थितीनुसार देता येतात. खालील सल्ले सर्वश्रुत आहेत.
१. वैयक्तिक आणि कौटुंबिक समुपदेशन घेणं.
२. एकत्रितपणे मार्ग काढण्याचं ठरवणं.
३. योग्य विचारसरणीच्या सदस्यांना विश्वासात ठेवणं.
४. एखाद्या विचित्र विचारसरणीच्या सदस्याची हेटाळणी न करणं.
५. अपमान करणं, टाकून बोलणे, कमी लेखणे हे कमी व्हायला हवे.
६. आर्थिक, वैचारिक बंधनं शिथिल करने.
७. सर्व सदस्यांनी आपआपल्या जबाबदाऱ्या स्वीकारणे गरजेचे.
८. शारीरिक किंवा मानसिक आजार पटकन तज्ञांना सांगणे व सल्ला घेणं आवश्यक.
९. काय घालावं, काय व कुठे बोलावं याची जाण असली पाहिजे.
१०. सहनशक्ती व ताणावर नियंत्रण यासाठी प्रयत्नशील राहिल्यास बरेच प्रसंग टाळता येतील.
सहन कर, दुर्लक्ष कर, मन मोठं कर, असा सल्ला अनेकजण देतात. परंतु, किती वेळ कोण सहन करू शकतं हे त्या त्या व्यक्ती आणि परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यांच्याशी स्वतंत्रपणे बोलून त्यांच्या मनामधील धग कमी करणं गरजेचं. वडीलधारी मंडळीचा अॅप्रोच अधिक शांत आणि त्रयस्थ असला की मोठे प्रश्न सुटतात. कुटुंबाला एकत्रितपणे सल्लामसलत देण्याइतपत परिस्थिती तयार करायला हवी. चुकीच्या प्रथा आणि परंपरा किती सांभाळत बसायच्या हे आपणच ठरवायचं. मार्ग निघतात परंतु त्याला इच्छा शक्ती पाहिजे.
मोठ्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी काही विचार केला पाहिजे.
तुम्ही घराच्या केंद्रभागी आहात म्हणून तुमच्याकडे न्याय्य भूमिका असणं आवश्यक आहे. उदा. घरातील एखाद्या नाकर्त्या तीस वर्षांच्या मुलाला लहान असं संबोधून सगळ्या जबाबदारीतनं त्याला मुक्त नाही करू शकत. त्याच्या धरसोड वृत्तीमुळे त्याला नोकरी मिळत नाही. त्याचा अहंभाव आड येतो आणि तो अहंभाव तुम्ही अन्याय्य भूमिकेनं फुलवत आहात. प्रश्न आहे तो तुमच्या भूमिकेचा. असे खूप उदाहरणे देता येतील.
म्हणून एकत्रित कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी संयुक्तिक प्रयत्न मनापासून सर्वांनी सहकार्य भावनेतून करायला हरकत नाही. घुसमट दूर करायची जबाबदारी जशी सर्वांची आहे, तशीच ती स्वतःची सुध्दा आहे हे ध्यानात घ्या.