घटक आणि तणावनिर्मिती यांचा अभ्यास व या बाबतीतील प्रयोग असं सांगतात की, अत्यंत धार्मिक आणि श्रद्धावान लोक हे अत्यंत तीव्र ताणसुद्धा सहजगत्या सहन करतात. असं का?
शास्त्रीयदृष्ट्या, श्रद्धेमुळं आपला आनंद, उत्साह वाढविणाऱ्या एन्डॉर्फिन्सचं रक्तातील प्रमाण वाढतं. शरीरातील अंत:स्रावी ग्रंथींच्या स्रावावरही याचा चांगला परिणाम होतो. शरीरातील अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण करणाऱ्या चेतासंस्थेचं कार्य सुधारतं. फारसा गंभीर आजार नसलेला रुग्ण जर मनानं खचला, तर अतिशय निष्णात डॉक्टरही त्याला बरा करू शकत नाही; पण गंभीर आजारातही श्रद्धावान रुग्ण खंबीरपणे ठाम उभे राहतात व अनेकदा आश्चर्यकारकरीत्या असाध्य समजल्या जाणाऱ्या आजारावरही यशस्वी मात करतात. श्रद्धा माणसाला धीर देते. आशा निर्माण करते, मनोबल वाढविते.
आता असं घडतं, याची कारणमीमांसा सोपी आहे. कोणत्याही मानवी मनानं ‘धोका’ म्हणून लेबल केली की, तणाव- प्रतिक्रिया शरीरात सुरू होते. धार्मिक आणि श्रद्धावान लोकांची परमेश्वरावरील श्रद्धा त्यांच्या मनात आशा निर्माण करते. एखादी दुर्दैवी घटना घडली, तरी यातून आपल्याला देव तारून नेईल, या श्रद्धेमुळे तणाव-प्रतिक्रियाच घडून येत नाही किंवा अत्यल्प घडते. यांची देवावरील श्रद्धा -भक्ती हीच त्यांची शकती बनते. अनेक संत-भक्त यामुळंच आत्यंतिक तणावजन्य परिस्थितीतून सहज पार होतात. देवावर श्रद्धा असते, तशीच ही श्रद्धा स्वत:वर असेल, सत्पुरुष किंवा इतर व्यक्तींवरील असेल, तर प्रत्येकाचं श्रद्धास्थान वेगवेगळं असू शकतं. उदा., आई वडील, गुरू, मोठा भाऊ, बहीण, मित्र, इतर व्यक्ती, कुणीही. काही वेळा विशिष्ट माणसाची, विशिष्ट बाबतीत विशिष्ट व्यक्तींवर श्रद्धा असते.
श्रद्धा ही चूक असो वा बरोबर, डोळस असो वा अंधपणाची, जोपर्यंत ती श्रद्धा त्या व्यक्तीबाबत अंतर्यामी खरी असते तोपर्यंत ती फायदा करून देते. मात्र साशंकता निर्माण होता कामा नये. साशंकता श्रद्धेचे सुपरिणाम घडू देत नाही. होकारार्थी विचारांमुळंच आपले बुद्धिकौशल्यं उद्दीपित होतात. भीती वाटत नाही. समस्यांना घाबरण्याऐवजी त्या सोडविण्याकडे कल वाढतो. धोक्याच्या घंटा डोक्यात वाजत नाहीत व अंती बरकत होत राहते. विश्वास दुणावतो, एखादं नुकसानही ‘पार्ट ऑफ दि गेम’ म्हणून स्वीकारलं जातं. ज्योतिषावरील विश्वासाचा जर फायदा होत असेल, तर तो यामुळंच होत असावा. इथं तो ज्योतिषी, बुवा, ताईत इ. काम करीत नाहीत, तर ‘श्रद्धा’ काम करते. असाच फायदा परमेश्वरावरील विश्वासाचा होतो, ती परमशक्ती मला तारून नेईल, या विश्वासामुळं तणाव-प्रतिक्रिया घडून येत नाही व यामुळं तणावांचे दुष्परिणाम व शक्तीचा र्हासही होत नाही. उलट, बुद्धी, कल्पना होकारार्थी दिशेनं स्वयंचलित होऊन फायदा होतो.
श्रद्धावंतांना या श्रद्धांचा आणि त्यातील तत्त्वांचा फायदा होत राहतो आणि श्रद्धा आणखी दृढावते. श्रद्धावंत माणूस बऱ्यापैकी तणावमुक्त असतो. त्याचं एक कारण हेही असावं.
आपल्या नात्यांमध्ये / वर श्रद्धा जरूर ठेवा, त्यातून सकारात्मक प्रतिसाद द्या/घ्या, चुकलं तर समजाऊन घ्या, सांगा, आपलेसे करण्यात श्रद्धा जरूर मदत करते. मनापासून श्रध्देला जवळ करा.
©श्रीकांत कुलांगे