वादविवाद पुरुष का घालतात याबाबत मागील ब्लॉग मध्ये चर्चा केली. परंतु पुरुष मंडळी कडून विचारणा सुरू झाली की बायकांच्या वादविवादाचे काय?
बायकासुद्धा मने दुखावणारे वादविवाद घडवून आणण्यात हातभार लावतात, पण त्यामागची कारणे वेगळी असतात. वरवर पाहता असे दिसते की, ती आथि॔क बाबींवरुन, जबाबदाऱ्यांवरुन किंवा इतर काही मुद्यांवरुन भांडते आहे, पण आतली गोष्ट अशी असते की, ती तिच्या जोडीदाराला खालील कारणांसाठी विरोध करत असते. बायका वाद घालतात, त्या मागची काही कारणे जे समुपदेशन दरम्यान येतात ते म्हणजे:
१. तो माझ्या भावनांचे किंवा विनंत्यांचे महत्त्व कमी करुन दाखवतो, तेव्हा मला ते आवडत नाही, त्यामुळे मला झिडकरल्यासारखे किंवा माझे महत्त्व कमी झाल्यासारखे वाटते.
२. जेव्हा मी एखादी गोष्ट त्याला करायला सांगते, पण तो ती विसरतो, तेव्हा मला हे आवडत नाही, पण तो असा आव आणतो की, मी त्याच्या मागे लागते, त्यामुळे मी त्याच्या मदतीसाठी त्याच्याकडे भीक मागते आहे असे मला वाटते.
३. मी जेव्हा अस्वस्थ किंवा दु:खी असते, तेव्हा तो मलाच दोष देतो, हे मला आवडत नाही,
४. तो जेव्हा आवाज चढवून बोलतो आणि तो कसा बरोबर आहे याची यादी करायला घेतो, तेव्हा मला ते मुळीच आवडत नाही, त्यामुळे मला असे वाटते की, मीच चुकीची आहे आणि त्याला माझ्या दृष्टिकोनातून बघण्याची इच्छाच नाहीये.
५. जेव्हा एखादा निण॔य घेण्याची वेळ येते, तेव्हा जर मी त्या संबंधात काही प्रश्न विचारले, तर तो माझी हेटाळणी करतो, ते मला मुळीच आवडत नाही. अशा वेळी मी त्याच्यावर ओझे बनून राहिले आहे किंवा मी त्याचा वेळ बरबाद करते आहे, असे मला वाटते.
६. जेव्हा तो माझ्या प्रश्नांना आणि माझ्या विचारांना काहीच प्रतिसाद देत नाही. तेव्हा मला ते आवडत नाही, त्यामुळे मला असे वाटते, की जणूकाही तो माझे अस्तित्वच नाकारत आहे.
७. मी का दुखावून घ्यायचे नाही किंवा काळजी करायची नाही किंवा रागवायचे नाही किंवा दुसरे काही; याचे तो जे स्पष्टीकरण देतो, ते मला मुळीच आवडत नाही, त्यामुळे त्याचा माझ्यावर विश्वास नाही असे मला वाटते; अशा वेळी मला खूप निराधार वाटते.
८. जेव्हा तो माझ्याकडून अशी अपेक्षा करतो की, मी हळवे असू नये तेव्हा ते मला पटत नाही, त्यामुळे मला असे वाटते की, संवेदनशील असण्यात काहीतरी चूक आहे किंवा दुबळेपण आहे.
जरी या सगळ्या वेदनादायी भावना आणि गरजा मान्य करण्याजोग्या असल्या, तरीसुद्धा बऱ्याच वेळा त्या प्रत्यक्षपणे सांगितल्या जात नाहीत; त्याउलट त्या मनातल्यामनात दबून राहतात आणि अचानक एके दिवशी त्यांचा स्फोट होऊन त्या वादविवादाच्या वेळी उफाळून येतात. काही वेळेस प्रत्यक्ष तू-तू-मैं-मैं होऊन व्यक्त होतात, किंवा त्या तुमच्या आक्रसलेल्या चेहऱ्यावरुन लगेच ओळखायला येतात.
यामागील भूमिका बरोबर की चुकीच्या हे ज्यानेत्याने ठरवलेलं बरं. आपल्या बोलण्यातून, देहबोलीतून अनेक सूचक गोष्टी व्यक्त होत असतात. म्हणून आपण कुठे आहोत आणि काय करतो, बोलतो याकडे जाणीपूर्वक लक्ष दिले तर प्रश्न निर्माण होणार नाहीत. परंतु काहींना राईचा पर्वत बनवण्याची सवय असेल तर मात्र….