जर नात्यांमधील संवाद नीट होत नसतील तर अनेक नाती संपुष्टात येऊ शकतात. समुपदेशन करताना, विविध प्रकारचे संवाद योग्य न झाल्यास ते कसे घातक ठरू शकतात याची प्रचिती येते.
निरोगी नातेसंबंधांसाठी संवाद आवश्यक आहे. आपल्या आयुष्यातील लोकांशी मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे बोलणे आपल्याला माहिती शेअर करण्यास, शिकण्यास, प्रतिसाद देण्यास आणि कायमस्वरूपी संबंध निर्माण करण्यास मदत करते. मित्र आणि कुटुंबासह कोणत्याही नातेसंबंधाचा संवाद हा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु रोमँटिक संबंधांमध्ये हे विशेषतः महत्वाचे असते.
नातेसंबंध किती यशस्वी होईल याचा अंदाज जोडप्याच्या “संवादाचा पॅटर्न” अनेकदा सांगू शकतो. चांगला संवाद विविध मार्गांनी आपले नाते सुधारण्यास मदत करू शकतो, जसे की:
१. नकारात्मक भावनांवर मात करण्याऐवजी, चांगल्या संवादामुळे लोक त्यांच्या समस्यांवर चर्चा करू शकतात आणि अधिक सकारात्मक, प्रभावी मार्गाने त्यांचे निराकरण करू शकतात.
२. हे आत्मीयता, जवळीकता वाढवते.
३. हे संघर्ष कमी करते आणि प्रश्नांना व्यवस्थित सोडविण्यासाठी मदत करते.
४. मानसिक कुचंबणा दूर ठेवते.
५. समाजातील एकोपा टिकून राहतो.
६. निर्णयशक्ती योग्य राहते.
संवाद आणि नातेसंबंधातील समाधान यांच्यात निश्चितच संबंध असला तरी, केवळ चांगल्या संवादामुळेच तुम्ही तुमच्या नात्यात किती आनंदी राहाल हे निश्चितपणे सांगता येत नाही. संवादाच्या समस्यांमुळे तुमच्या नातेसंबंधावर नकारात्मक परिणाम होत असल्याची काही चिन्हे आहेत:
१. तुमच्या जोडीदाराला काय वाटते किंवा काय विचार चालू हे तुम्हाला माहीत आहे असे गृहीत धरणं.
२. सतत एकमेकांवर टीका करणं.
३. निष्क्रिय-आक्रमक वर्तनात गुंतणे.
४. आपण आपल्या जोडीदाराशी खरोखर बोलू शकत नाही असे वाटणे.
५. तुमचा जोडीदार तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा बचावात्मक होणे.
६. एकमेकांना मूक वागणूक देणे. अबोला धरणे.
७. अपेक्षित उत्तर न शोधता, वारंवार समान वाद घालणे.
८. तडजोड न करणे किंवा इतर व्यक्तीचा दृष्टीकोन न ऐकणे.
९. समस्या किंवा संभाषणे टाळण्यासाठी मख्ख चेहऱ्याने राहणे.
अशा अनेक प्रकारे आपण आपले संबंध बिघडवत राहतो. यामुळे प्रसंगी नाते संपुष्टात येऊ शकते. विवाह पश्चात समुपदेशन करताना, या बाबींमुळे काडीमोड होण्यासाठी त्या कुटुंबांची होणारी उलघाल बघितली की मन सुन्न होतं. असं का घडतं?
१. अती राग.
२. मानसिक अस्थिरता.
३. आरोग्याच्या समस्या.
४. घमंड किंवा इगो.
५. अपमानातून सुड घेण्याची प्रवृत्ती.
६. वारंवार कमी लेखणे.
७. दुसऱ्याला पाण्यात पाहून स्वतःचा तोरा धाखवणे. आपले पद सिद्ध करणं
८. सुशिक्षित असूनही क्षुल्लक कारणावरून वाद करणं. (सुशिक्षित अशिक्षित)
९. मनातील घुसमट.
विसंवादातुन होणारे परिणाम भयावह असतात. आजच्या आधुनिक काळात घडणाऱ्या आत्महत्येचे वाढते प्रमाण हे अनेकदा विसंवादातून होतात असं संशोधन सांगतं. तुम्ही व्यक्त कसे होता याला खूप महत्त्व आहे. व्यक्त होताना आपले व्यक्तीमत्व समोरील व्यक्तींना दिसत असते. समाजात संवाद नीट व्हायला हवा.
नातेसंबंध सुंदर ठेवण्यासाठी काय वेगळं हवं हो? एक हसणं, प्रेमानं किंवा संवेदना ठेऊन बोलणं, आणि वादविवादला आवरते घेणे संयुक्तिक ठरेल. म्हणून बोलताना सावधगिरी बाळगली पाहिजे. चुका होतात पण त्यांना समजून घ्या. चूकभूल देणे घेणे म्हणतात ते उगाच नाही.