“माझं कुणी ऐकतच नाही म्हणून मला प्रचंड मनस्ताप होतो, घरात कुरबुर वाढली असून जीवन असह्य होतेय,” अशा विषयाशी संबंधित एक व्यक्ती काही आठवड्यांपूर्वी समुपदेशन घ्यायला आली होती. जवळपास सहा सिटिंग मध्ये हा प्रश्न बऱ्यापैकी निकालात निघाला. आपल्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात, इतरांनी आपले ऐकावे, आपला आदर करावा, भावनांची कदर करावी असा कटाक्ष असणार्यांनी वास्तवाकडे डोळसपणे पाहिले तर बऱ्याच कटू गोष्टी लक्षात येतील. अगदी जवळच्या व्यक्तींकडूनही आदर आणि प्रेम कधीमधीच मिळत असते. कायम नाही आणि जे मिळते तेही उत्स्फूर्त आणि खरेखुरे असेलच असे नाही. बरेचदा ते औपचारिक, दिखाऊ आणि नाटकी असते. अत्यंत जिव्हाळ्याच्या व्यक्तीदेखील त्यांच्या गरजा, समस्या आणि प्राथमिकता यातच गुरफटलेल्या असतात. तुमच्या गरजा आणि आनंद त्यांना कायम महत्त्वाचे वाटतील असे नाही. कधीकधी तर त्यांच्या वागण्यांत आपल्याबद्दल आदर, उदारता आणि कणव यांचा अभाव दिसतो. वास्तव इतके कटू आणि कठोर असताना आपली इतरांकडून परिपूर्णता, संवेदनशीलता आणि निश्चितीची मागणी समर्थनीय कशी म्हणता येईल?
भावनात्मक अस्वस्थता, दु:ख ही स्वतःच्या हटवादी मागण्या आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या एकाधिकारी किंवा दडपशाही वृत्ती यामुळेच प्रामुख्याने निर्माण होतात. कुटुंब प्रमुखाला हे तंतोतंत लागू होते. जग आपल्याला हवे तसेच असले पाहिजे असा कोणताही नियम नसल्याने मनासारखे न घडल्यास अपेक्षाभंगाचे दु:ख वाट्याला येतच राहणार. चिंता, विषण्णता, खुनशीपणा, वैरभाव, राग अशा त्रासदायक भावनांचे मिश्रण अनुभवावे लागणार.
भावनिक दुरवस्था आणि त्यामुळे सक्षमपणे जगण्यात होणारा गतिरोध कमी करण्यासाठी स्वत: तसेच इतरांच्या बाबतीत आपली सहिष्णुता वाढवायला हवी. आपली सद्सद्विवेक बुद्धी शाबूत ठेवली तर बऱ्याच उपयुक्त आणि स्वहिताच्या गोष्टी शिकायला मिळतील जसे-
१. स्वत:ला बदलण्याची तयारी असणे. इतरांकडून तुम्ही चांगल्या वागणुकीची अपेक्षा करता तर त्या पूर्ण होण्याकरिता किंमत मोजायची तुमची तयारी हवी. न आवडणाऱ्या त्यांच्या वागण्यावर संतापणे, चिडणे, वैतागणे किंवा विषण्ण होणे हेच त्यांच्या वागण्यात परिवर्तन घडवून आणण्याचे रास्त उपाय आहेत हा समज चूक व निराधार होय.
२. इतरांविषयी सकारात्मक मत बाळगणे – इतरांविषयी मत बनवताना अतिसामान्यीकरण टाळणे,. सुतावरून स्वर्ग गाठणे चुकीचे.
३. राईचा पर्वत किंवा छोट्या-मोठ्या गोष्टींचा बागुलबुवा करणे चुकीचे. अहिताचे, गैरसोय, अपेक्षाभंग, नावडते प्रसंग वाट्याला आले की, महासंकट आल्यासारखे आपण कधीकधी वागतो.
४. वस्तुस्थितीचे भान. तुमचे ‘वाटणे’ आणि वास्तव यात अंतर असू शकते.
५. स्वत:ला इतरांच्या जागी कल्पून त्यांचं वागणं समजून घेता येतं. बहुतेक वेळी दुसरा तसे का वागला हे जाणून घेतले जात नाही म्हणून अपेक्षाभंगाचे दु:ख होते, ते बरेचदा तुमची त्याच्या वागण्याकडे पाहण्याची दृष्टी पूर्वग्रहदूषित, विपर्यस्त आणि अवाजवी स्वरूपाची असते.
६. पटकन रिझल्ट मिळतील असं सहसा होत नाही. झटपट परिणामांचा हव्यास सर्वथा अवाजवी ठरतो. दृष्टिकोनात सकारात्मक बदलाला सुरुवात केली की, आपल्याला लगेच त्याचे परिणाम हवे असतात. असं लगेच होत नाही.
७. परिवर्तनाचा स्वीकार. आपली वागणूक कालपरत्वे बदलणार. जे पूर्वी समर्थनीय आणि हितकर होते ते आजही राहील असं नाही.
८. आपल्या भावना, आपले विचार आणि कृती यांची जबाबदारी स्वत:कडे घेणे योग्य. जबाबदारी स्वत:कडे घेतली तर जीवन सुखी आणि समृद्ध करण्यास भरपूर वाव मिळतो.
९. सकारात्मक स्वगत. बोलण्यात निखालस व आग्रही वाक्प्रचार टाळणे फायद्याचे ठरते. ‘नेहमीच’, ‘कदापिही नाही’, ‘व्हायलाच पाहिजे’, ‘घडायलाच नको’, ‘असे कसे होत नाही’, असे हटवादी वाक्प्रचार आपल्याकडून वापरले जातात. हटवादीपणा सोडून ‘केव्हा केव्हा’, ‘बहुधा’, ‘घडलं तर आनंद; पण न घडलं तर फारसं बिघडलं नाही’, हे वाक्प्रचार वापरण्यास सहज शक्य आणि लाभकारक ठरते. स्वत:शी बोलताना ‘च’ काराला टाळणे हितावह.
१०. परिस्थितीकडे डोळसपणे पाहणे. समस्यांतून आपण मुक्त झाल्याचा भास होतो; पण प्रत्यक्षात त्या सुटलेल्या नसतात. पुन्हा कधीही त्या डोकं वर काढून त्रासदायक ठरू शकतात.
११. चुकीचा दावा करण्याचे टाळणे. आपल्याला कळते तशी इतरांची मन:स्थिती असेलच असं नाही. आपल्या प्रतिक्रिया मात्र आपल्याला जसं दिसतं त्यानुसार होत असतात.
१२. गैरसमज दूर करणे. तीक्र भावना व्यक्त करूनच इतरांना प्रभावित करता येतं व हवं ते घडवून आणता येतं किंवा मिळवता येतं, असाही एक (गैर)समज आहे. आपण ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ करतो आहोत हे इतरांच्या लक्षात आले तर पदरी निराशा, राग, विषण्णता येणार.
एकूण काय तर, परिपूर्णतेचा आणि निश्चितीचा हट्ट तुमच्या मानसिक स्वास्थ्याला मारक ठरणार. ‘मी म्हणेन ती पूर्व’ म्हणींमधून प्रतीत होणारी एककल्ली, जुलमी, दुष्टाग्रही आणि हुकूमशाही वृत्ती आपल्याला कधीच हवं ते मिळवून देऊ शकत नाही शिवाय सुखही लाभू देणार नाही. असे दाखले इतिहासात खूप सापडतील. त्यापेक्षा आपल्या विचारांना वास्तव रूप दिले, तर समस्या सोडवणे सरळ होईल व सुखाची शक्यता वाढेल.