भावनिकतेचा वापर

‘सगळं आहे घरात, पण सुख मात्र नाही’ असं म्हणत दुःखाला जवळ करणारी माणसं पहिली की आयुष्यात एक नकळत पोकळी तयार व्हायला लागते, असं म्हणणारी अनेक माणसं आजकाल समुपदेशन घेण्यासाठी सायकॉलॉजीस्ट मित्रांना भेटून जात आहेत. मानसशास्त्रीय समुपदेशक म्हणून डोक्याला ताप करून घ्यायचा की कुंपणावर बसून पाहत राहायचं हा यक्षप्रश्न नक्कीच आहे.

आज, प्रत्येकाला स्वतःची जाणीव किंवा सेल्फ अवेअरनेस असणं ही महत्त्वाची गोष्ट. स्वत:ला स्वत:च्या भावना कळणं, त्या योग्य तऱ्हेने व्यक्त करता येणं तसंच इतरांच्या भावनांची दखल घेऊन त्यांना समजून घेता येणं, एवढं जरी करता आलं तरी वरचेवर दाटून येणारं नैराश्याचं मळभ आपण घालवू शकतो. नाकावरच्या रागाला थोपवू शकतो. हे सगळं साधतं ते भावनिक बुद्धिमत्तेमुळे.

आनंदाने आणि सुखाने जगणं खरं म्हणजे फार अवघड नसतं. आपली मानसिक जडणघडण कशी झालीय यावर बरंच काही अवलंबून असतं. अगदी झोपडपट्टीतसुद्धा आनंदाने जगणारे जीव असतात, तर बंगल्यात राहणारे सुखी असतीलच असं नाही. संशोधकांच्या मते प्रेम, स्वीकार आणि कामगिरी हे सुखासमाधानासाठी आवश्यक असणारे घटक आहेत. सुखाची प्रत्येकाची कल्पना वेगळी असते हे जरी मान्य केलं तरी वरील तीन गोष्टींना आपल्या आयुष्यात कितपत स्थान आहे यावरसुद्धा सुखाचा अनुभव अवलंबून असतो.

‘मी मलाच आवडत नाही. माझा मलाच राग येत असतो तर इतरांना मी कसा/कशी आवडणार?’ असं मनाशी वारंवार म्हणणाऱ्या व्यक्तींनी आपल्या गुणदोषांसकट स्वत:चा स्वीकार केलेला नसतो. जे स्वत:ला स्वीकारू शकत नाहीत, स्वत:वर प्रेमदेखील करू शकत नाहीत अशांना इतर लोक कितपत स्वीकारणार, त्यांच्यावर कितपत प्रेम करणार हा प्रश्नच असतो. स्वत:चा स्वीकार करण्यासाठी व्यक्तीचा स्वत:कडे बघण्याचा दृष्टिकोन आणि जुळवुन घेणं चांगलं असावं लागतं. हे नेमकं कसं साधायचं तेच अनेकांना माहिती नसतं.

दैनंदिन जीवनात शारीरिक, शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक, व्यावसायिक, वैवाहिक अशा वेगवेगळ्या स्तरांवर आपल्याला एडजस्ट करावं लागतं. एडजस्टमेंट म्हणजे बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणं, तडजोड करणं. ते एकदा चांगलं जमलं की, अंतर्गत सुसंगती साधली जाते.

निरोगी जीवनासाठी सुसंघटित व्यक्तिमत्त्व असणंही आवश्यक असतं. ते असलं की, व्यक्ती स्वत:कडून किंवा इतरांकडून अवास्तव अपेक्षा करत नाही. स्वत:ची महत्त्वाकांक्षेची पातळी देखील स्वत:च्या क्षमतांना अनुसरून मर्यादित ठेवते. एक सुरक्षित आयुष्य जगता येईल अशी खबरदारी घेते. स्वभावात लवचिकता असेल, ताठरपणा नसेल तर बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणं जड जात नाही.

दुसऱ्याला गृहीत धरण्यामुळेदेखील अनेक पेचप्रसंग उभे राहतात. आपल्याकडे हे फार घडतं. ‘मला वाटलं, तुम्ही अमुक एक गोष्ट करालच. म्हणून मी बोललो नाही.’ हे ‘मला वाटलं’ पालुपद आप्तेष्टांमध्ये अनेकदा गैरसमज निर्माण करतं आणि सुखाच्या आड येतं. मग ते गैरसमज घरगुती असोत, शेजाऱ्यापाजाऱ्यांशी असोत किंवा कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांमधील असोत. स्वत:च्या चुकीमुळे संबंधात अंतराय निर्माण झाला असेल तर चूक मान्य करून दिलगिरी व्यक्त करून संबंध पूर्ववत करता येतात. मात्र इथे ‘अहंकार’ नावाचा शत्रु आडवा येतो व  ‘मी का पडती बाजू घेऊ? मी का माफी मागू?’ असं स्वगत घोळवत ठेवून संबंध सुरळीत करण्याच्या मार्गात अडथळे निर्माण करतो. परस्परांशी अबोला धरणं, एकमेकांना टाळणं सुरू होतं. शह-काटशह दिले जातात, क्वचित क्षुद्र राजकारणसुद्धा खेळलं जातं. अशा ताणून धरण्याने अगदी सख्खी नाती दुरावतात. कुटुंबातील एखादी संवेदनशील, नात्यांना खूप महत्त्व देणारी व्यक्ती मात्र या सगळ्या प्रकाराने हतबुद्ध होते. दोन भावांपैकी एक चांगला, सरळ अन् दुसरा स्वार्थी, ताठर असेल तर त्यांना सांभाळून घेताना वयस्कर आईवडिलांना होणारा त्रास बऱ्याच जणांना परिचित असतो.

मत्सर हा सुखाच्या आड येणारा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. दुसऱ्यांचं चांगलं न बघवणं किंवा त्यांचं काही चांगलं ऐकलं की मनाला त्रास होणं अन् असंतुष्ट राहणं अशा वर्तनवैशिष्ट्यांनी युक्त असणाऱ्या व्यक्तींची संख्या काही कमी नाही. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी पैसा लागत नाही, पण मनाचा मोठेपणा लागतो.

रागावर खरंच विजय मिळवता येतो का, असा प्रश्न अनेकांना पडतो. मला वाटतं, रागाचे दुष्परिणाम समजून घेतले तर ऊठसूट रागवण्याची सवय कमी करता येते. क्रोधामुळे माणसाचा विवेक सुटतो, विवेक सुटल्याने स्मृतिदोष जडतात, स्मृतिदोषांमुळे हळूहळू बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाशामुळे शेवटी व्यक्तीचा विनाश होतो, असं गीतेत सांगितलेलं आहे. चला तर मग, ही सगळी मरगळ झटकून टाकून, ओशाळलेल्या मनाला जागृत करून पुन्हा जगायला शिकूया.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *