दहावीचा रिझल्ट लागणार म्हणून सांगितले गेले आणि मुलांचे फोन यायला सुरुवात झाली की नेमकं आम्ही या रिझल्ट मध्ये काय शोधावं. त्यांच्या मते हा विषय गहन आहे, यश की आनंद. त्यांना सांगितले की या रिझल्ट मधून तुम्हाला या दोन्ही गोष्टी मिळतील. यश व आनंद अत्यंत महत्वाचे का आहेत ते सुद्धा समजणे तितकेच गरजेचे:
१. सकारात्मक भावना – आनंदी जीवन, जे येणाऱ्या अनेक भावनांना संतुलित ठेऊन पुढे जाण्यासाठी वाट दाखवते.
२. व्यस्तता – व्यस्त आयुष्य, जे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी काळजीपूर्वक जगत असतो.
३. सकारात्मक नातेसंबंध – स्वप्न, ध्येय चांगल्या नात्यांशिवाय पूर्ण व्हायला अडचणी येतात.
४. अर्थपूर्ण जीवन – परिपूर्ण जीवन जगण्यासाठी योग्य असे मार्ग शोधून पुढे जाणे.
५. कार्यसिद्धी – जे ठरवले ते प्राप्त करणं.
दहावी नंतर पुढे काय हे प्रश्न असतात परंतु या आधीच आपण ते ठरवलं पाहिजे. त्याचबरोबर शारीरिक व मानसिक सुदृढता आवश्यक असते. अन्यथा आपण ठरवतो एक आणि होते दुसरेच. दोष नशिबाला. काहीही ठरवा परंतु पायाभूत कौशल्य आपल्यात कुठली आहेत किंवा असावीत ते पाहिले तर आयुष्यात कुठल्याही परीक्षांना तोंड देणे शक्य होते. मग ते कौशल्य:
१. जगण्याची व जीवनाची सुरक्षेसाठी लागणारे कौशल्य.
२. जीवन सुधारण्यासाठी आवश्यक ते कौशल्य. एका ठिकाणी ना थांबता पुढचा रस्ता शोधणे.
३. स्वयं विकास कौशल्य. उद्घरावा स्वयें आत्मा.
४. सामाजिक कौशल्य. समाजाभिमुख कर्त्यव्याची जाण आणि मिसळण्याची कला.
५. कामाचे कौशल्य. कुठलेही कार्य निर्विघ्नपणे पार पाडणे.
हे पायाभूत कौशल्ये जेंव्हा मुलांना समजावून सांगितले तेंव्हा त्यांचा पुढचा प्रश्न होता मार्कांचा. त्याला काही किंमत द्यावी का? हो गरजेचे आहे कारण त्यातून आपल्याला काही गोष्टी समजतात.
१. विश्वास – स्वतःवर किती विश्वास ठेवावा? तो टिकवण्यासाठी काय करावे ते समजते.
२. प्रयत्न – कुठे कमी पडलो, जास्त मेहनत घ्यावी किंवा घेतली.
३. कौशल्य – अजून कुठले स्किल आपण वापरू शकलो असतो किंवा
४. प्रतिभा किंवा टॅलेंट समजणे आवश्यक असते. त्यानुसार पुढील वाटचाल सुरू करता येते.
गरज, इच्छा व अपेक्षा या भावनात्मक असून त्या आतील आणि बाहेरील गोष्टींवर अवलंबून असतात. त्या दृष्टिकोनातून आपले ध्येय बऱ्याचदा ठरले जाते. त्यासाठी सकारात्मक इच्छाशक्ती, मानसिक शांती व दृढता, पायाभूत कौशल्ये, आणि जीवन काय आहे याची जाणीव आपल्याला आयुष्यात काही कमी पडू देत नाहीत. पालकांना सुद्धा अलीकडे या गोष्टींबाबत कल्पना आलेली असल्यामुळे ते मुलांवर न रागावता त्यांना समजून घेताना दिसतात ही अत्यंत चांगली सुधारणा आहे.
© श्रीकांत कुलांगे
9890420209