नात्यांचे भावबंध

नात्यामध्ये तुलना का केली जाते, नात्यातील नाजूक बंध का जपले जात नाहीत असा प्रश्न नवीन सुनेने केलेला. लग्नात आई वडिलांनी काही कमी नाही ठेवले, भरभरून दिले तरी नात्यात तुलना का? लग्नानंतर
समुपदेशन घेण्यासाठी येणाऱ्या अनेक युवतींनी हेच सांगितले होते. काय हवे नात्यांमध्ये? चुका दोन्ही बाजूंनी असतात. म्हणून काही प्रयत्न सासू -सून-नवरा-सासरा-मुलं केल्यास नात्यात पुन्हा जिव्हाळा निर्माण होऊ शकतो.

१. नात्यांची मशागत. प्रेमाने विचारपूस. आरामदायी शब्दांचा वापर करणे.
२. नात्यांमधलं व्यवस्थापन बिघडलेलं असतं, ते पुन्हा नियमित कारणे शक्य आहे का याबाबत विवेचन. संतुलित विचार.
३. कोणत्याही नात्यामध्ये तुलना केली जाणं हा मोठाच शाप आहे; तुलना ही नेहमी सदसद्विवेकबुद्धीने करण्याची गोष्ट आहे. ती तशी झाली तरच योग्य परिणाम देते. “उत्तम नातं तेच ज्यामध्ये परस्परांमधील सारखेपणा शोधला जातो अन् त्यासोबत एकमेकांमधील वेगवेगळ्या बाबींचाही आदर ठेवला जातो.”
४. स्पर्धा नकोच. त्यामुळे मत्सर वाढतो. सोज्वळ स्पर्धा प्रेरणा म्हणून ठीक आणि सकारात्मक हवी.
५. भावना समजावून घ्या! स्वत:च्या भावना समजावून घेणं, त्यावर विचार करणं आणि योग्य शब्दांमध्ये त्या व्यक्त करणं. समस्या समजाऊन घेऊन त्याप्रमाणे शब्द वापरून पहा.
६. ‘गृहीत धरणं’ हा नातेसंबंधांमधला मोठा शत्रूच! या शत्रूचा मोठा फटका बसतो आप्तस्वकीयांनाच! नातं जेवढं जास्त जवळचं तेवढा याचा फटका जास्त!
७. गैरसमज नकोच! गैरसमज ही अशी बाब आहे, जी वेळीच लक्षात आली नाही तर नातं कायमचंच संपवते. वस्तुस्थितीची खात्री करून घ्यावी.
८. संयम महत्त्वाचा! उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने प्रतिसाद देण्याऐवजी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची चूक बहुतांशवेळा घडते.
९. का हवा राग? रागाचे मुळ कारण शोधाच. रागाचे जसे स्वत:वर शारीरिक, मानसिक परिणाम होतात तसेच आपल्या रागामुळे इतरांवरही होतात हे लक्षात ठेवा. त्यामुळे तो टाळलेलाच बरा.
१०. वाद : एक कौशल्य. सध्या चालू असलेल्या मुद्द्यावर वाद घालणं हे अत्यंत कौशल्याचं काम आहे. केवळ चालू असणाऱ्या मुद्द्यालाच चिकटून राहण्यातच शहाणपण असते.
११. व्यक्त व्हा! जे रुचलं, आवडलं त्याची मन-मोकळेपणानं तारीफ करा. जे खटकलं ते स्पष्टपणे पण योग्य शब्दांत मांडा. स्पष्ट किंवा परखड बोलण्यासाठी त्रागा करण्याची किंवा आवाज चढविण्याची गरज नसते.

नातं दुरावण्याचं मूळ असणारी समस्या एकदा सोडवता आली की, आपोआपच नात्याचे बंध कायम राहतात. शब्दांच्या वापरानं भावना अधिक निग्रही होतात आणि भावनांमुळे शब्द अधिक धारदार होतात. हे चक्र चुकीच्या दिशेने जाऊ लागल्यावर मात्र नात्याची वासलात ठरलेलीच!

नात्यांमध्ये मतभेद, वाद असले तरी अडचणींच्या प्रसंगी न बोलावता जाण्याचा आणि सर्वतोपरी मदत करण्याचा नेम जुन्या लोकांनी नेहमीच पाळला आहे. केलेल्या या मदतीची कधी जाणीवही करवून न देता! स्वत:च्या कुटुंबीयांवर चिडचिड करताना दूरवरच्या लोकांना न चुकता ‘शुभरात्री’ आणि ‘सुप्रभात’चे संदेश पाठविण्याच्या या काळामध्ये या सगळ्या बाबी नक्कीच खूप महत्त्वाच्या ठरतात, नाही का?

“कुणाबद्दलही वाईट बोलू नका.
प्रत्येकाबद्दल जे-जे चांगलं,
उत्कृष्ट माहीत आहे,
ते मात्र जरूर सांगा.”

©श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *