आज एक अतिशय कळीचा मुद्दा चर्चिला गेला तो म्हणजे नात्यांमध्ये (नवरा आणि बायको) एकमेकांना समजून का घेतले जात नाही.
नात्यात एकमेकांचा आदर करणे महत्त्वाचे का आहे, याबाबत चर्चा पुढे रंगत गेली. या मध्ये काही कारणे अशी पण होती जी नवीन जोडप्यांनी पुढे आणली. एकमेकांना दोष देण्या ऐवजी एकोपा कसा टिकवता येईल आणि यामध्येच कसं आपलं हीत आहे ही यापाठीमागे माझी भूमिका होती.
एकत्र राहण्यासाठी आपण आपल्या पद्धती वेगवेगळ्या गोष्टीतून व्यक्त करू शकतो याबाबत अनेक तरुणांनी पुढाकार घेतला तर तरुणी मात्र एकच शब्द बोलत होत्या की, आम्हाला आदर द्या, एक मोलकरीण म्हणून नाही तर कुटुंबातील सदस्य म्हणून वागवा.
मग हा आदर कुणी कुणाला का कसा द्यावा किंवा तो कसा संपादन करावा याबाबी कडे त्यांचे लक्ष वेधले. टाळी एका हाताने वाजत नाही. दोघांनाही हवं असलेलं नातं निर्माण करण्याची जबाबदारी स्वतः पासून होते. प्रथम बायकोने काय करावे याबाबत तरुणांची मने;
१. त्याच्याबद्दल तक्रार करू नका.
२. त्याच्या चांगल्या सवयी जरूर सांगा.
३. प्रेमाने वागणूक आणि स्पर्श खूप काही सांगून जातो.
४. प्रोत्साहित करा.
५. त्याला त्याचा वेळ दिल्यास, बाहेरील दुनियेत असणाऱ्या प्रभावाचा वेग कमी करण्यास मदत होते.
६. सकारात्मक संवाद. कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रेमानं वागावं.
७. आदराने वागणूक दिली पाहिजे.
८. आपल्या पतीच्या बुद्धीचा, विचारांचा कोणासमोर कधीही विरोध करू नका.
९. त्याची तुलना कुणाबरोबर होऊ शकत नाही व करू नये.
१०. त्याला वेळ द्या. फक्त फोन किंवा मित्र मैत्रिणी, माहेरची मंडळी हीच त्यांची प्राथमिकता नसावी.
पत्नी एक सर्वांगीण व्यक्तिमत्त्व असते आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास कौटुंबिक स्वास्थ सकारात्मक राहते.
पतीने पत्नीसाठी काय करावं अशा काही अपेक्षा तरुणींनी व्यक्त केल्या;
१. तिला जाणीव करून द्या की आई व बहीण नंतर तीच एकमेव स्त्री आहे जिच्या वर त्याचे प्रेम आहे. आदर ठेवा.
२. तिला योग्य साथ द्यावी. भावनिक साथ अत्यंत मोलाची असते.
३. थोडीफार घरकामात मदत करावी.
४. ती जे काही सांगते ते ऐकण्याचा प्रयत्न.
५. तिला वेळ देणे गरजेचे.
६. विश्वास ठेवा.
७. टीका करू नका, चुकल्यास योग्य पद्धतीने समजून सांगा. तिच्याबाबत वाईट असे काही इतरांना सांगू नये.
८. तिला गृहीत धरू नका.
९. ती फोन वर बोलते म्हणजे काही कट कारस्थान रचत आहे असा समज नसावा.
१०. तिच्या माहेरील मंडळींना कमी लेखणे योग्य नाही.
पती पत्नी मधील नात्यात नियमितपणा आणणे गरजेचे असते. एकाधिकार ठेऊन कुणीही कुणाला जास्त दिवस नाही ठेऊ शकत ही काळाची शिकवण आहे. म्हणून सर्वांनीच काळजी घेतल्यास प्रपंच परमार्थ होतो. साध्या गोष्टींना सहजतेने घेऊन अहंकार दूर ठेवल्यास ते शक्य होते हे सर्व तरुण जोडप्यांनी मान्य केले. अर्थात हाच हेतू साध्य झाल्याने केलेली चर्चा सफल झाली असा आनंद साहजिकच सर्वांना झाला.
©श्रीकांत कुलांगे
?9890420209