वाचन आणि मानसिक स्वास्थ

 

वाचनातून आता काही फायदा होत नाही म्हणून एका वेबीनार वर चर्चा झाली. तेंव्हा मी स्पष्टपणे सांगितले की आपले मन तरूण आणि मेंदूला निरोगी ठेवायचे असेल तर वाचन हा एक चांगला उपाय आहे. पुस्तके वाचल्याने गिटार वाजवण्याबरोबरच आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यास फायदा होतो आणि हे फायदे आयुष्यभर टिकू शकतात. वाचनामुळे आपल्यात काय बदल होतात?-

१. आपली स्मरणशक्ती, सहानुभूती आणि मेंदूची मजबुती वाढते.
२. अधिक मोकळ्या मनाचे आणि क्रियएटीव्ह बनण्यास मदत होते. मानसिक लवचिकता येते.
३. मनाची एकाग्रता वाढते. शब्द संग्रह वाढणे व ध्यानात ठेवणे, यामुळें मेंदूचा विकास होतो.
४. जसजसे वय वाढते, वाचन ही वृद्धावस्थेकडे जाण्याची प्रक्रिया सुखमय बनवते.
५. चिंता कमी करण्यासाठी मोलाची भूमिका.
६. वाचन स्मृतीभंश रोखण्यास मदत करते.
७. डॉक्टर काही मानसिक आरोग्याच्या परिस्थितीवर उपचार म्हणून वाचन करायला सांगतात.
८. झोपायच्या आधी वाचन केल्याने आपल्याला झोप येण्यासाठी मदत होते.

आज आपल्याला ebook reader, किंडल यांच्या माध्यमातून पुस्तकांचा खजिना उपलब्ध आहे. पूर्वीसारखे वाचनालयात जायची गरज नसते.

मग आज वाचन संस्कृती का जोपासली जात नाही? वाचताना झोप येणे. डोळे दुखणे, कंटाळा, उदासिनता, नैराश्य हे जरी प्रामुख्याने असले तरी एक महत्त्वाचे, काय व कसे वाचायचे याचे ज्ञान नसणे.

आज जरी मोठा वर्ग वाचक असला तरी नेमके काय वाचावं हे समजत नाही. काय वाचल्याने मेंदूमध्ये काय होते ते पहा:

१. आत्मचरित्र – व्यक्तिरेखा, विचारसरणी आपल्यासमोर उभी राहते. प्रेरणा मिळते.
२. इतिहास – त्याकाळातील घटना, व्यक्तिरेखा, जागा जशाच्या तशा उभ्या रहातात.
३. परदेशी लेखक – त्या त्या देशाची विचारसरणी मेंदूला विचार करायला प्रवृत्त करते.
४. कविता – कविता प्रतीकात्मकता, रूपक आणि अस्पष्ट अर्थांमध्ये गुंतून मेंदूला आव्हान देतात.
५. फॅशन, डिझाइन, ट्रॅव्हल, सायन्स इत्यादी पुस्तके आपल्या मनात वा बुध्दीला चालना देतात, नावीन्य शिकवतात.
६. आर्किटेक्ट – आपल्या मेंदूमध्ये वास्तूंच्या वेगवेगळ्या आकाराची, जागांची हुबेहूब प्रतिकृती तयार होऊन मेंदूला उत्तेजना मिळते.

 

आता वाचनाची जागा व्हिडिओ ने घेतल्यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या.परंतु प्रत्यक्षात वाचन संस्कार वेगळेच. लहापणापासूनच मुलांसमवेत पुस्तके वाचली तर चांगली पिढी तयार होईल. मानसिक आरोग्य आणि वाचनाची गोडी यांचा परस्परसंबंध बऱ्याच संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्याला जोड विचारांची व चर्चेची मिळाली तर ज्ञान आणि बुद्धी दोघांचा विकास होतो. बघा काही आहे का वाचण्यासारखे घरात.असेल तर आजच वाचन सुरू करु…

 

©श्रीकांत कुलांगे
9890420209

1 thought on “वाचन आणि मानसिक स्वास्थ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *