मागील आठवड्यात मी जवळपास 385 व्यक्तींच्या मानसिक स्वास्थ्य चाचण्या घेतल्या आणि बऱ्याच जणांना फोन करून वार्तालाप केला. साधारण राग आणि तो व्यक्त करण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगळी आढळली. राग व्यक्त आपल्या कृतीतून, हावभाव, आणि बोलण्यातून होत असतो. राग योग्य ठिकाणी चांगला असतो तर तोच राग हानिकारक सुध्दा. राग ओळखणे आवश्यक आहे. काही लोक असे असतात ज्यांना काहीतरी प्राप्त करण्याची तीव्र इच्छा असते, अशा लोकांना लवकर राग येतो. जर तुमच्याकडून खालील गोष्टी होत असतील तर तुम्ही या प्रकारात याल..
१. धैर्याचा किंवा सबुरीचा अभाव.
२. पटकन अन्न खाणे.
३. अस्वस्थता.
४. कामादरम्यान चिडचिड.
५. रागाच्या वेळी स्वत: ला इजा करणे.
रागाची काही प्रमुख कारणे आहेत. जसे की…
१. चांगली व पुरेश्या झोपेचा अभाव.
२. शारीरिक परिस्थिती. ठराविक आजार जसे की हृदयविकार, रक्तदाब, हार्मोनल समस्या आपल्याला रागाच्या जवळ पटकन आणतात.
३. एकटेपणा. मानसशास्त्रज्ञ म्हणतात की ज्या लोकांचे मित्र कमी असतात त्यांना सहसा लवकर राग येतो.
४. टीव्ही पाहणे. हिंसक आणि गुन्हेगारी कार्यक्रम इ. पाहणे मुलं व तरुणांच्या मनावर पूर्णपणे परिणाम करतात. सध्या त्यात न्यूज चॅनल सुध्दा सामील आहेत.
५. मोबाईल व सोशिअल मीडिया. आज जगभरात सगळ्यांना हवा आणि नको असलेला प्रकार. राग आणि भांडणं, इथपासून ते डिव्होर्स पर्यन्त त्रास देणारा.
६. महत्वाकांक्षा. पाहिजे ते ध्येय प्राप्त झाले नाही तर त्रागा व नैराश्य.
७. मानसिक आजार.
८. विनाकारण. काही कारण नसताना रागावणे.
रागामुळे किती हानी होते ते सर्वांना माहिती आहे. तरीसुद्धा लोकांबरोबर बोलताना काही गोष्टी लक्षात आल्या.
१. वातावरण खराब होते. मैत्रीत, नात्यात दुरावा आला.
२. शारीरिक, मानसिक आरोग्याबरोबर आर्थिक हानी.
३. संतप्त लोकांच्या फुफ्फुसांचे कार्य खराब होते.पचानावस्था बिघाड.रक्तदाब व शुगर यांच्यात वाढ.
४. रोगप्रतिकारक शक्तीवर देखील विपरित परिणाम होतो. त्यामुळे आपण तणाव-संबंधी आजारांना बळी पडता.
५. चिडलेला माणूस स्वतःचे नुकसान करतो, विद्यार्थी अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.
परंतु आनंददायी बाजू अशी आहे की रागावर नियंत्रण ठेवता येते आणि व्यवस्थापित केले जाऊ शकते. रागावर नियंत्रण कसे ठेवावे:
१. सकारात्मक आणि क्रियेटीव्ह काम. न आवडणाऱ्या गोष्टीला सकारात्मतेने प्रतिसाद दिला तर त्रास कमी जाणवेल.
२. घर, राहतो ती जागा स्वच्छ करा, जरा फिरा. थोडक्यात बिझी ठेवणे. छंद जोपासणे.
३. रागाचे मुळ कारण शोधून त्यावर उपाय करणे.
४. तणाव दूर करण्याचा एक विनोद हा एक उत्तम मार्ग आहे.
५. रागवण्यामुळे झालेले तोटे – विश्लेषण आवश्यक. जाणवेल की विनाकारण रागवण्याची संख्या जास्त आहे.
६. वेळेवर खाणे, व्यायाम करणे आणि पुरेशी विश्रांती, शांतपणे पाणी पिणे.
७. योग, ध्यान आणि समुपदेशन देखील प्रभावी आहेत.
८. मोबाईल, ऑफिस चे काम, यांचा ताळमेळ ठेवणे.
कुठलीही गोष्ट प्रमाणाबाहेर नको. योग्य त्या ठिकाणी रागावणे जरुरी. पद्धत चांगली वापरली तर अनेक डोकेदुखी पासून दूर राहाल. राग व्यक्त करण्याच्या पद्धती अनेक आहेत. असा राग व्यक्त करा की समोरची व्यक्ती तुम्हाला चांगल्या रूपाने कायम ध्यानात ठेवील.
©श्रीकांत कुलांगे
9890420209