अचानक सुयोग चिडून आईशी आणि आजीशी फटकून बोलला की जे गरजेचे नव्हते व तो घरातून बाहेर पडला. नंतर त्याला काय वाटले असेल ते त्यालाच ठाऊक पण त्याची मनशांती भंगलेली आहे हे ओळखायला जोतिषाची गरज नव्हती. अचानक आपली शांती कशी भंग होऊ शकते याबाबत सर्वानाच ठाऊक आहे. मग असं असूनही आपल्या विचारांवर, मनावर आपण काबू का ठेऊ शकत नाही यावर मात्र विचार करणं गरजेचं.
मनाची शांती ही चिकाटीपूर्वक आणि दीर्घकाळ केलेल्या आत्मसंयमनाच्या प्रयत्नांच्या फलस्वरुप ती प्राप्त होत असते. माणसाचे अनुभव परिपक्व झाले आणि विचारांच्या कार्यपद्धती संबंधी नियमांचे त्याला विशेष ज्ञान आले की मनशांती आपल्यात आली हे समजते.
मन भंग करणाऱ्या गोष्टी नेहमीच घडणार.
१. जोडीदाराबरोबर भांडण.
२. नको त्या विचारांना चालना.
३. नको त्या ठिकाणी जाणं.
४. विचित्र परिस्थिती.
५. अपघात.
६. आप्तेष्टांच्या संकटसमयी आपल्याला जायला न जमणे.
७. आर्थिक टंचाई.
८. मुलांचे आरोग्य, त्यांच्या अडचणी.
९. मानसिक व शारीरिक कुचंबणा.
१०. इच्छा असूनही करू न देणं किंवा न करणं.
११. फितुरी, भांडण, समाज व्यवस्था, शासन निर्णय, शेजार पाजार इत्यादींचा होणारा परिणाम.
१२. कौटुंबिक कलह.
१३. अनिवार्य दुःखाने अतिक्षुब्ध होणं. रागीट वर्तन.
१४. शंका आणि चिंता.
आपण अशा कितीतरी लोकांना ओळखत असू ज्यांनी आपले ;
१. जीवन कडवट करून टाकले आहे.
२. त्यांच्या विस्फोटक, रागीट स्वभावामुळे जे जे सुंदर आणि मधूर आहे त्या सगळ्यांचा विध्वंस करून टाकला आहे.
३. शांती गमावून बदनाम झाले आहेत!
४. मानसिक रोग, शारिरीक व्याधी यांनी बेजार.
५. क्षणिक चुकीचे फळ आयुष्यभर भोगणारे.
६. रोजच्या कामात अडथळा आणणारे.
बहूसंख्य लोक समजूतदारपणा आणि आत्म-नियंत्रणाच्या अभावी त्यांचे जीवन उध्वस्त करीत असतात आणि त्यांच्या सुखाला ग्रहण लावत असतात. ही खरोखरच विचार करण्यासारखी बाब आहे. अशा वेळी मानसिक आरोग्य तपासणी, समुपदेशन, व्यायाम, योगा, चांगल्या लोकांशी संवाद, चांगली झोप व सकस आहार याची गरज असते.
ज्यांचा आपल्या विचारांवर ताबा आहे आणि ज्यांचे विचार शुद्ध आहेत अशा खऱ्या सुज्ञ लोकातच इतके सामर्थ्य असते की ते वाऱ्यावादळाला त्यांच्या आज्ञा मान्य करायला लावतात. अशा या प्रचंड वादळात हेलकावे खाणाऱ्या आत्म्यांनो, तुम्ही जिथे आणि ज्या स्थितीत जगत असाल तिथेच तुम्ही हे समजून घ्यावे की, जीवनरुपी महासागरात स्मितहास्य रुपी परमसुखाची बेटेही असतात आणि तुमच्या आदर्शांचे प्रकाशमान तट तुम्ही तिथे येण्याची प्रतिक्षा करीत आहेत. तुमच्या विचारांच्या नौकेच्या सुकाणूवर तुमची घट्ट पकड असू द्या. तुमच्या आत्म्याचे जहाज त्याच्या चालकावर विसंबून आहे — तो निद्रावस्थेत आहे, त्याला जागे करा. आत्म-नियंत्रणातच खरी ताकद असते, योग्य विचार करण्यात कुशलता असते आणि शांतीत सामर्थ्य असते. तुमच्या हृदयाला म्हणा, “शांती, स्थिर रहा!” शांत आणि स्थिर रहा!