प्रेरणा आणि विचारधारा

सर, मला सगळं करावसं वाटतं पण प्रत्यक्षात होत नाही. अनेकदा घरातील मोठे माणसं मागे लागतात हे कर आणि ते कर. अनेकजण असे आहेत, जे कुणीतरी मागे लागल्याशिवाय काहीही करीत नाहीत. प्रेरणा पळून गेल्यासारखं वाटतं. असं का होत असावं म्हणून आमच्या चर्चासत्रात उहापोह झाला.

१. ज्या बाबींची स्वत:ला आवड नसते किंवा ते काम न केल्याने फारसं नुकसान होणार नाही असं वाटतं – त्याबाबतीत असं घडतं.
२. कामातील किंवा आयुष्यातील एकसुरीपणा.
३. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची तयारी नसणं.
४. अति आत्मविश्वास असणं,
५. शारिरीक, मानसिक आजार.
६. झोपेची कमी, अनियमित आहार. यातून कंटाळा.
७. अमली पदार्थांचे सेवन.
८. आपल्या मनोवृत्तींवर सभोवतालचे वातावरण आणि घटनादेखील परिणाम करीत असतात.

अशा अनेक कारणांमुळे प्रेरणा आपल्यापासून खूप दूर राहते. मग प्रेरणास्रोत शोधायचे असेल तर काहीतरी करणं आलंच.

१. सभोवतालचं महत्त्व जाणून घेऊन योग्य ते स्थान निवडून आपल्या मनाची तयारी करणं.
२. पोषक वातावरण नाही असं जाणवलं तर त्वरित त्या वातावरणामधून बाहेर या आणि पोषक वातावरणात प्रवेश करा. तेही लवकरात लवकर!
३. अंत:प्रेरणा असो वा बाह्यप्रेरणा, ‘बक्षीस आणि शिक्षा’ हा सिद्धांत उत्तमरीत्या काम करतो.
४. शिस्त हवीच.! शिस्त ही अशी बाब आहे, जी स्वत:मध्ये रुजण्यासाठी जाणीवपूर्वक आणि सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
५. ध्येय नजरेत ठेवणे. ध्येय निश्चितपणे ठरवा, त्याची नेहमी जाणीव ठेवा, अल्प यशात समाधान मानू नका आणि आनंदाची घटना साजरी करून शक्य तितक्या लवकर पुन्हा पुढच्या कामावर परत फिरा. हा मंत्र नेहमीच कामाला आलेला आहे.
६. दीर्घ काळात पूर्ण करण्याच्या ध्येयाची छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये विभागणी करून त्यांची पूर्तता केली तर सुरुवात तरी होईल.
७. इतरांच्या मर्जीवर चालणारं खेळणं बनू नका. कारण त्यांनी चावी देणं बंद केलं की आपलं खेळणं बंद होत.
८. उत्साहाचा झरा बना. त्यामुळे तुम्ही इतरांसाठी प्रेरणा बनता.
९. आपल्या मर्यादा आपणच ठरवून टाकतो अन् त्यानंतर विसरून जातो की, या मर्यादा आपणच निर्माण केलेल्या आहेत. जर आपण मर्यादा निर्माण करू शकतो तर त्या काढूनही टाकू शकतो.

बक्षीस आणि शिक्षेचा अतिरेक वाईटच! नाहीतर बक्षिसाच्या आमिषाशिवाय आणि शिक्षेच्या भीतीशिवाय काम न करता येणं हा विनाकारण तुमचा कमकुवत दुवा बनेल. तसे नको व्हायला. नाही का? स्वप्रेरणेसाठी चार ‘c’ चा वापर करण्यास सांगितले आहे.

१. Consequences (परिणाम) – एखादं काम केलं तर होणारे फायदे आणि केलं नाही तर होणारं नुकसान यांचा तौलनिक विचार करा आणि निर्णय घ्या.
२. Competence (क्षमता) – स्वत:मधील क्षमता ओळखा.
३. Choice (निवड) – जेव्हा तुमच्या मनाच्या कौलाप्रमाणे तुम्ही एखादी बाब निवडता तेव्हाची प्रेरणा अधिक सखोल असते.
४. Community (समाज) – कोणतीही बाब करण्यासाठी हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो.

या चार ‘c’ चा वापर करून स्वत:ला प्रेरणा देणं सहज शक्य होतं. केवळ माहीत असून उपयोगाचं नाही; अंमलबजावणी केली पाहिजे. केवळ इच्छा असून उपयोगाचं नाही; प्रत्यक्ष कृती केली पाहिजे.

सर्वांत मोठी प्रेरणा स्वत:चं अस्तित्व टिकविण्याची असते. ध्येय साध्य होणार याची खात्री बाळगा. कारण इतके होऊनही आपले ध्येय साध्य होईल असा तुमच्यातच आत्मविश्वास नसेल तर बाहेरचे लोकही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत.

 

©श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *