चुका आणि सुधारणा

त्याच्या कडून पुन्हा पुन्हा त्याच चुका होतायत म्हणून रमा तिच्या नवऱ्या बाबत गाऱ्हाणं करत होती. तिला सहज विचारलं की तुझ्या कडून नाही होत का त्याच चुका? थोडावेळ विचार करून होकारार्थी उत्तर मिळाले.

कित्येकदा मी अशी चूक करणार नाही असं अनेकदा ठरवून वर्ष, महिने, उलटले तरी त्याच गोष्टी पुन्हा आपल्याकडून घडतात. रोज नवीन चूक कळत नकळत होतेच, पण जर कधी मोठी चूक नेहमीच होत असेल तर मात्र नक्कीच काहीतरी चुकतंय हे मान्य करायला पाहिजे. का होतं असं?

१. मेंदू मध्ये दूषित माहिती जाणे. चुकीच्या माहितीने मेंदू तसेच कार्य करतो असा निर्वाळा शास्त्रज्ञांनी दिलाय.
२. सवयीचा भाग. चुकांपासून न शिकण्याची वृत्ती.
३. मानसिक समज नसणे. मेंदू सुदृढ नसण्याची लक्षणं.
४. वागण्याची पद्धत. मी वागतो तेच योग्य असा (गैर) समज.
५. बालपणापासून योग्य शिक्षण न मिळाल्यास चुकांना गांभीर्याने पाहिले जात नाही आणि पुन्हा तेच होत राहतं.
६. सामाजिक वातावरण जे चुकांना मान्यता देते.
७. चुका करणं हे योग्य आहे अशी मानसिकता तयार होणे. कित्येकदा या गोष्टींना घरातून खतपाणी घातले जाते.
८. चुकीची मित्र संगती.
९. योग्य गुरूचा, शिक्षणाचा अभाव.

जर मोठ्या चुका वारंवार होत राहिल्या तर त्यांचे परिणाम गंभीर होतात.

१. संसार उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येते.
२. मानसिक आजार जडण्याची शक्यता. मनःशांती भंग पावते.
३. समाजात नाव खराब होते.
४. नोकरीतून काढून टाकले जाण्याची भीती
५. आर्थिक व शारीरिक नुकसान.
६. भांडणं, कलह डोकेदुखीची कारणे ठरतात.

लहान चुका वेळीच लक्षात घेऊन सुधारणा करणे अपेक्षित असते. सर्वच ज्ञानी असतात असे नव्हे परंतु सर्वांगीण विकासासाठी लहानपणापासून चुकांना समजाऊन सांगितले तर मोठ्या चुकांना आवर घालणं शक्य होते.

नैसर्गिकरित्या काही चुका झाल्याच आणि आपण त्यांना सकारात्मकतेने घेतल्या तर काही फायदे होतात असे संशोधन सांगते.

१. आपण मनुष्य आहोत हे सिद्ध होते.
२. वागण्यात उत्तरदायित्व आणि स्वतंत्रता आणता येते.
३. अयशस्वी होऊन यश आल्यास जास्त आनंद होतो.
४. विद्यार्थी दशेत समस्यांचे निराकरण करण्यासाठी चुकांपासुन शिकलो तर पुढे जाऊन समस्यांना सामोरे जाणे सोपे जाते.
५. चुका मुळे आपली स्मरणशक्ती चांगली राहण्यास मदत होते.
६. अपयश बर्‍याचदा आपल्याला यशस्वीतेकडे नेतो.
७. आपल्याला खरोखर काय हवे आहे आणि आपल्याला कसे जगायचे आहे हे स्पष्ट करण्यास चुका आपल्याला शिकवतात.
८. आपल्या चुका लक्षात घेतल्या आणि कबूल केल्याने आपण केलेल्या वचनबद्धतेच्या संपर्कात राहण्यास मदत होते.
९. चुका स्वतःस चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत करतात. कित्येकदा आपणच आपले वैरी आहोत हे जाणवते.
१०. चांगले निर्णय घ्यायची शक्ती मिळेल.

सर्वांना आपल्या चुकांमधून शिकण्याची आवश्यकता आहे जेणेकरून आपण त्या पुन्हा पुन्हा जोखमी घेण्याचा धोका पत्करणार नाही. चांगले निर्णय घेण्यासाठी आपण शहाणपण आणि बुद्धी विकसित करणे आवश्यक. जर आपण खरोखर आपल्या चुकांमधून शिकलात तरच चांगल्या निर्णय शक्तीचा विकास होईल. संसार, समाज वाचवायचा असेल तर अगोदर चुका होऊ नये म्हणून काळजी घेतली तर मानसिक स्वास्थ्य आणि सुदृढता कायम जवळ राहील.

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *