मुलगा मोठा झालाय पण त्याला चांगल्या सवयी का लागत नाहीत म्हणून मुलाचे आईबाबा त्याला माझ्याशी ऑनलाईन बोलण्याचा हट्ट करत होते. पण तो बापडा बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता हे समजायला वेळ लागला नाही. असे का होते हे त्यांना समजाऊन सांगितले. नंतर त्या मुलाचा मूड ठीक झाल्यावर तो होऊन माझ्याशी बोलला. त्याला स्पष्ट सांगितले की सुधरायचे असेल तर पहिले सवयी बाबत बोलूया.
सवयी बदलण्याचे दोन टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे आपल्याला मागे खेचणाऱ्या व आपल्या भविष्यावर नकारात्मक परिणाम घडवून आणणाऱ्या सर्व सवयींची एक यादी करणे, कोणकोणत्या वाईट सवयी आहेत हे इतरांना अगदी स्पष्टपणे विचारा. त्यामध्ये काही समान सूत्र सापडतेय का ते पहा. साधारणपणे अपयशाला बऱ्याच अंशी कारणीभूत ठरणाऱ्या वाईट सवयींची एक यादी आपल्या निदर्शनास येते;
१. चालढकल करणे.
२. शेवटच्या क्षणी बिले भरणे.
३. स्वीकारलेले काम किंवा सेवा ठरलेल्या वेळेत पूर्ण करून न देणे.
४. काही येणी येण्यास विलंब झाला तरी चालवून घेणे.
५. भेटीसाठी किंवा बैठकीसाठी उशिरा जाणे.
६. नवीन व्यक्तीचा परिचय झाल्यावर काही वेळातच त्या व्यक्तीचे नाव विसरणे.
७. इतरांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांच्या शेऱ्यांवर अकारण प्रतिक्रिया देणे.
८. जोडीदार किंवा कुटुंबियांसमवेत असताना फोनवर बोलत रहाणे.
९. पुन्हा पुन्हा पत्रव्यवहार हाताळणे.
१०. उशिरापर्यंत काम करीत रहाणे.
११. मुलांसोबत वेळ घालविण्याएवजी कामाला प्राधान्य देणे.
१२. आठवड्यातून दोनपेक्षा अधिक वेळा बाहेरचे निकृष्ट पदार्थ खाणे.
१३. व्यायामाला प्राधान्य अजिबात न देणं.
एकदा का तुम्ही तुमच्या वाईट सवयी ओळखल्या की दुसरा टप्पा म्हणजे सकारात्मक व उपयुक्त सवयी अंगिकारणे आणि त्यांना पूरक ठरणारी यंत्रणा विकसित करणे. त्यासाठी, योगाभ्यास, नियमित आहार, झोप, व्यायाम, समुपदेशन इत्यादी गोष्टी मदत करतात.
यश म्हणजे सोप्या, निश्चित व प्रगतीकडे घेऊन जाणाऱ्या सवयी कोणत्या ते ओळखणे आणि अगदी मन:पूर्वक त्यांचे आचरण करणे होय. काही तथ्य या ठिकाणी त्याला समजाऊन सांगितले.
१. आपलं यश किंवा अपयश आपल्या सवयीवर अवलंबून असते.
२. वाईट सवयींमुळेच आपले मोठे नुकसान झाले हे आपल्याला आयुष्यात फार उशीरा कळते.
३. ज्या लोकांसोबत आपण जास्त काळ रहातो त्या लोकांसारखेच आपण बनतो.
४. जगात दोन प्रकारचे लोक असतात – (जहाजाच्या) नांगरासारखे व मोटरसारखे! ठरवा आपण कुणाबरोबर राहायचे.
त्याला एक होमवर्क दिला (तुम्ही करून बघा). ज्या लोकांसोबत नियमितपणे आपण वेळ घालवतो अशा लोकांची यादी करायची. यामध्ये आपले कुटुंबीय, सहकारी, शेजारी, मित्र, आपल्या सोसायटीच्या, संघटनेचे सदस्य, संप्रदायातील लोक आणि इतर लोकांचा समावेश होईल.
ही यादी लिहून झाल्यावर त्या यादीतील नकारात्मक आणि विषारी मनोवृत्तीच्या लोकांच्या नावासमोर ऋण (–) चिन्ह द्या. जे लोक सकारात्मक व प्रोत्साहक वृत्तीचे आहेत त्यांच्या नावासमोर प्लस (+) चिन्ह द्या. प्रत्येक व्यक्तीच्या नावासमोर खूण करण्यापूर्वी तुम्ही जो काही विचार कराल त्यातून तुम्हाला एक तथ्य सापडेल. तुम्ही जिथे काम करता तिथले अनेक लोक विषारी मनोवृत्तीचे आहेत असेही कदाचित तुम्हाला आढळून येईल किंवा कदाचित तुमचे मित्र तुमच्या प्रत्येक कामाला नाक मुरडताना आढळतील किंवा कदाचित तुमचा सतत पाणउतारा करणारे व तुमचा आत्मविश्वास व स्व–सन्मान खच्ची करणारे तुमच्याच कुटुंबातील लोक या यादीत असतील.
ज्या लोकांच्या नावासमोर ऋण चिन्ह आहे त्यांच्यासोबत वेळ घालविणे थांबवा. ते शक्य नसेल तर निदान त्यांच्यासोबत जो वेळ आपण घालवितो तो लक्षणीयरित्या कमी करून इतर लोकांच्या नकारात्मक विचारांच्या प्रभावापासून आपण स्वत:ला दूर ठेऊ शकतो.
केवळ आपली वेळ आणि ऊर्जा वाया घालविण्यासाठीच तुमच्याशी गप्पा मारायला येतात, असे अनेक लोक तुम्हाला माहिती असतील याची मला खात्री आहे. मी अशा लोकांना मनोविकारी भुते म्हणतो. ते तुमच्यातील जीवनेच्छा आणि ऊर्जा अक्षरश: शोषून घेतात.
१. सतत तक्रार करणारे आणि स्वत:च्या दुरवस्थेबद्दल इतरांना जबाबदार धरणारे लोक तुमच्या आसपास आहेत का?
२. नेहमी इतरांची निंदा करणारे, नकारात्मक चर्चा करणारे, ‘हे सगळं किती वाईट आहे,’ हे तुणतुणे वाजविणारे लोक तुमच्या भोवती आहेत का?
३. केवळ एक फोन करून तुम्हाला टेन्शन व मन:स्ताप देणारे आणि तुमचा अख्खा दिवस खराब करणारे लोक तुमच्या जीवनात आहेत का?
४. तुमची स्वप्ने अवास्तव आहेत असे सांगून तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून व ध्येयापासून परावृत्त करणारे लोक तुमच्या जीवनात आहेत का?
५. तुम्हाला सतत स्वत:च्या पातळीवर खाली खेचणारे मित्र तुमच्या आसपास आहेत का?
अशा लोकांना ओळखुन त्त्यांच्याबरोबर वेळ घालविणे बंद करून यशस्वी लोकांबरोबर रहायला सुरुवात करा. त्यांच्या यशाचे रहस्य जाणून घेऊन त्या तंत्रांचा अवलंब करून पहा, ती कितपत उपयुक्त ठरतात हे पहा, ते जो विचार करतात तसा विचार करा. तरच आपल्या चांगल्या सवयी आपल्याला योग्य फळं देतील.
©श्रीकांत कुलांगे
9890420209