हेवा – दावा

 

सुट्टीमध्ये असताना एका मित्राला भेट दिली. त्याच्या आईशी बोलताना तिच्या आनंदी चेहऱ्यावरून जाणवले कि घरात शांती आहे. “तीन सुना घरात पण कधी हेवादावा नाही” हे तिच्या बोलण्यातून जाणवले. आज समाजात काही कारण नसताना हेवा वाटणे व त्यामुळे निराश होणे अशा असंख्य घटना घडतात. असं का होतं म्हणून अनेकदा आपले मित्र खासगीत बोलत असतात. एखाद्या व्यक्तीला हेवा वाटण्याचे मुख्य कारण म्हणजे असुरक्षितता, विक्षिप्त विचार, सतत अन्याय होतो असे मानणारे व्यक्तिमत्व.

मत्सर हा आपल्याकडे ६ शत्रुंपैकी एक मानला आहे. अनेक तोटे आहेत. त्याने तुम्ही ज्याचा मत्सर करता त्याला फरक पडत नाही. मात्र तुमच्या जिवाला मात्र त्रास होतो. –
१. यामुळे आपले मन हायजॅक होऊ शकते,
२. प्रगती खुंटते.
३. आपल्या कुटुंबाचा नाश ओढवला जाऊ शकतो.
४. अत्यंत क्लिष्ट प्रकरणांमध्ये अगदी खून सुद्धा होऊ शकतात.
५. अति मत्सर नैराश्य वाढवुन जीवन उध्वस्त करते, चिंताग्रस्त मनोवृत्ती तयार होते.
६. भीती, असुरक्षितता, कमी आत्मविश्वास अशा समस्या वाढतात.

मत्सर म्हणजे द्वेष, जळावू वृत्ती, दुसऱ्याची भरभराट, प्रगती सहन न होणे. आपला स्वभाव मत्सरी आहे कि नाही हे ओळखणे सोपे आहे, खालील काही गोष्टी दिल्या आहेत – बघा काही साम्य आहे का:
१. आपल्या प्रिय गोष्टीत किंवा कामामध्ये हस्तक्षेप केला तर राग येणे.
२. नाराज होणे – जेव्हा जोडीदार आपल्याबरोबर वेळ घालवू शकत नाही तेव्हा त्याची नाराजी.
३. इतरांना एखादी गोष्ट मिळाली तर मनापासून आनंद व्यक्त होत नाही. घालमेल होते.
४. आपल्या प्रिय व्यक्ती वर इतर कुणी प्रेम करत असेल तर ते न आवडणे.

मग आपण काय करू शकतो ज्यामुळे मत्सर थोडा कमी होऊ शकेल –

१. भावनेच्या भरात लगेच कृती करु नका. शांत व्हा आणि थोडा विचार करा
२. स्पर्धा स्वतःशी असावी. दुसर्याचे गुण मान्य करा, स्वीकारा.
३. गरज असेल तरच आणि योग्य व सौम्य मार्गाने आपले मनोगत व्यक्त केले तर नाते तुटत नाहीत.
४. स्वतःचे विश्लेषण. न्यूनगंड कमी होण्यास मदत होते.
५. आपली जखम आपणच भरली तर छान. नाहीतर योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या.
६. आपल्या जोडीदारावर व स्वत:वर विश्वास ठेवा.
७. मानसोपचार तज्ज्ञाकडे मार्गदर्शन घेणे.

परंतु प्रत्येक गोष्टीला एक सीमा असते तशी आपल्या सहन करण्याच्या क्षमतेला सुद्धा. कुणीही कुणाचा अंत पाहू नये गैरफायदा घेऊ नये. शेवटी बैल ऐकतो म्हणजे टोचत राहणे चांगले नाही, कधीतरी तो मारणारच. जे आपल्या चांगल्या वागणुकीने सुद्धा आपल्याला त्रास देतात, त्यांना स्पष्ट शब्दात सांगणे पण गरजेचे आहे. जर मत्सर खूप वेळ राहिला तर मानसिक आजार ही खात्री समजून पुढील उपचार घ्या. कारण नंतर ते तीव्र होतात. जीवनात प्रत्येक क्षण महत्वाचा असतो. हेवा दावा, मतभेद विसरून सामाजिक जाणीव ठेऊन या चांगल्या विचाराने एक झाले तर परिवर्तन शक्य आहे.

@श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *