अविवेकी स्वभाव

 

काही माणसं का बदलत नाहीत हा खूप लोकांचा तक्लीफदेह प्रश्न समाजातील वेगवेगळ्या थरांमधून ऐकायला येतो. शेफालीने खूप समजावून देखील तिचा भाऊ काही केल्या ऐकायला तयार नव्हता म्हणून प्रयत्नांती माझ्याकडे पाठवले. रडत कढत आलेल्या संदीपशी बोलून प्राथमिक माहिती घेतली आणि काही कारणास्तव त्याची होणारी चिडचिड समजली. त्याला पुन्हा नंतर बोलावून विचारात पडलो की जवळपास प्रत्येक घरामधून असं कुणीतरी असते ते नेहमी सांगूनही ऐकत नाही. चूक किंवा बरोबर काय, सुख – दुःख, योग्य – अयोग्य, गुण – दोष हे कधी समजणार अशा माणसांना? माणसं अविवेकी का होतायत, आईवडील, भावंडाना, नातेवाईकांना, शेजार्यांना अजिबात बरे का बघत नाहीत? हा काही सामाजिक किंवा मानसिक प्रश्न आहे का? असे सारे शेफालीला ना उलगडणारे कोडे होते. अशा ठिकाणी लागणारी आत्मजागृकता, आत्मज्ञान येत नाहीत तोपर्यंत ते बदलत नाहीत किंवा पुढे जाऊन त्याला काही कारणे सुद्धा आहेत.

१. सपशेल हार पत्करणारी मानसिकता. नवीन बदल नकोसे असतात.
२. चुकीच्या मतांना चिकटून राहणे. कित्येकदा माहिती असून सुद्धा.
३. अनामिक भीती.
४. आपल्या आयुष्याचे सुकाणू दुसऱ्यांच्या हातात आहेत असे वाटणे.
५. त्यांच्या अहंकाराचे रक्षण करण्यासाठी. राग व्यक्त करून इतर ऐकतात असा गैरसमज तीच वृत्ती बनते.
६. स्वतःचे वजन टिकवण्यासाठी (नकारात्मक वागून). हट्टीपणा, माझ्या मनासारखे नाही होऊ देत म्हणून वेठीस धरण्याची वृत्ती.

अशा व्यक्तींना बदलण्यासाठी आपण भरपूर कळत नकळत चुका करत असतो आणि त्या कित्येकदा आपल्याला समजत नाहीत.
१. त्यांना जरुरीपेक्षा अधिक माहिती देऊन गोंधळून टाकतो.
२. आपण त्यांच्या मधील चांगले गुण न बघणे.
३. पटकन बदल अपेक्षित करतो.
४. त्यांच्याकडे एक टाकाऊ व्यक्ती म्हणून पाहणे, किंमत न देणे, इतरांसमोर अपमान करणे.
५. शारीरिक किंवा मानसिक आजारपण नजरअंदाज करणे.

समजूतदारपणा तसा लहानपणापासून येतो तो आपल्या सभोवतालच्या वातावरणाकडून, कुटुंबियांकडून, मित्रांकडून, समाजाकडून. जर सगळे त्याची टिंगल टवाळी, वेळोवेळी चुका काढू लागले तर न्यूनगंड मनात तयार व्हायला वेळ लागत नाही. मग आपण काय करावं अशा व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी?
१. योग्य तेवढी माहिती देणे. हळूहळू बदल होत असल्यास परिस्थिती नुसार वाढ करणे.
२. त्यांना लहान लहान काम देऊन विश्वास टाकणे. चुकल्यास समजावून सांगणे. वेगवेगळ्या पद्धती वापर करा.
३. मोटिव्हेट करणे – प्रसंगी बक्षीस देणे. प्रशंसा करणे.
४. प्रासंगिक गोष्टींबाबत त्यांच्या बरोबर चर्चा केली तर त्यांना महत्व देतोय हे समजते.
५. काही प्रसंगी त्यांना निर्णय घ्यायला सांगणे.
६. शारीरिक किंवा मानसिक प्रश्न असतील तर तातडीने सोडवणे. कधी ते तोंडाने सांगत नसतात. त्यांच्या देहबोलीतून समजेल.
७. त्यांच्या आवडी निवडी लक्षात ठेवणे. व त्यात त्यांना पुढे शिक्षण देता येईल का ते पाहने.
८. कधीच त्यांची तुलना इतरांशी करू नये. त्यांच्या अहं ला धक्का लागता काम नये.
९. त्यांच्या मित्र परिवारावर बारीक लक्ष असू द्यावे.

सत्संगाशिवाय विवेक नाही. म्हणून सर्वानी चांगले वाचन, संगीत ऐकणे, छंदांमध्ये गुंतवून घेणे, वडील धारी मंडळी बरोबर चर्चा करणे, जपजाप, शिक्षण घेणे क्रमप्राप्त आहे. मनापासून तयारी करायला वेळ लागतो म्हणून चांगल्या मनाच्या माणसांनी थोडा धीर धरत, त्यांच्या प्रश्नाचा उलगडा करत, त्यांचे मन बदलणे कालांतराने शक्य होते. अविवेकाची मर्यादा वेळीच थांबवली नाही तर अनर्थ अटळ असतो म्हणून योग्य गुरु, योग, समुपदेशन, मानसोपचार हे महत्वाचे आहे. आज २१ जून – जागतिक योग दिवस – चांगला मुहूर्त आहे – मग चला एक पाऊल टाकूया योग, प्राणायाम करून.

@श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *