घर घर की कहानी म्हणजे परस्परातील स्नेहभाव कमी होऊन किचकट गुंतागुंत वाढत जाणे. याला अनेक पैलू आहेत आणि कारणेही. मागील आठवड्यात समुपदेशन साठी जवळपास याच कारणासाठी बरेच कुटुंबीय ऑनलाईन चर्चा करून समुपदेशन घेत आहेत.
खरं तर गुंतागुंतीचा तिढा कुणा एक व्यक्तीमुळे होतो का ही रिसर्च करण्याची गोष्ट नाही. ती बहुतांशी काही छुप्या किंवा उघड कारणास्तव घडते. बऱ्याचदा असेही आढळून आले आहे की अनेक कुटुंब एकमेकांपासून विभक्त किंवा मनाने वेगळी फक्त अहंकारापोटी निर्माण झालेली दिसतात. तरीही मानसिकरीत्या हा प्रश्न गौण आहे. कुठलीही व्यक्ती आपले मत कसे, कशी, कुठे आणि का मांडते यावर सगळं अवलंबून असतं हे सांगायला शास्त्रज्ञांची गरज नाही. आतापर्यंत आपल्यापैकी बहुतांशी हा अनुभव निश्चितच आलेला आहे.
सर्व काही आपल्या मनावर व विचारांवर अवलंबून असते. आपल्या मनोभूमीत आपण जे विचार-बीज पेरले किंवा मनोभूमीवर पडू देऊन ते तिथे रुजु दिले तर ते बीज जसे असेल तशी फळे त्याला लागतील. आज ना उद्या ते कृतीच्या रुपात बहराला येईल आणि त्या विचाराच्या मुळ गुणधर्मानुसार त्याला तशाच संधी आणि परिस्थितीची फळे लागतील. चांगल्या विचारांना चांगली फळे लागतील तर कुविचारांना, वाईट विचारांना वाईट फळे लागतील.
आज काही ठिकाणी कौटुंबिक व्यवस्था अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे असे जाणवते. त्यातील मुख्य कारणे आहेत.
१. कुटुंबप्रमुख हेकेखोर असणं. आपल्या पद्धती प्रमाणे एखादी गोष्ट न झाल्यास ताळमेळ बिघडतो.
२. शिक्षण असणे आणि नसणे, कित्येक ठिकाणी दोन्ही गोष्टी आपल्याला वैचारिक रित्या अपंग करून जातात. त्यातून इगो वाढतो.
३. सवांदाची पद्धत चुकीची असणे. बोलण्यामध्ये अर्थ एक असतो पण समोरील व्यक्ती गैरसमज करून घेते.
४. बोलण्याचे तारतम्य, पद्धती अगदी रांगड्या स्वभावाची असणे आणि त्यातून चुकीचे समजले जाणे.
५. दुराग्रह, शंका.
६. मानसिक अस्वास्थ्य.
७. चांगल्या विचारसरणीमध्ये सातत्य नसणे.
८. निसर्ग आपल्याद्वारे आणि आपल्यासोबत कार्य करीत असतो आणि ज्या विचारांत आपण जास्त रममाण होत असतो, त्याचे फळ तसेच मिळत असते. कित्येक परिवार नकारात्मक विचार करताना दिसतात.
केवळ जेव्हा आपण शिव्या-शाप देणे, तक्रार करीत शोक करण्याचे थांबवतो तेव्हाच आपण सुखी, निरोगी आणि समृद्ध बनू शकतो. आपल्या जीवनाचे नियमन करणाऱ्या सुप्त न्यायाचा शोध घेऊ लागतो, तेव्हाच हे शक्य होते. आपल्या आयुष्याचे नियंत्रण करणाऱ्या त्या घटकाशी जुळवून घ्यायला आपण शिकून घेतले म्हणजे आपण आपल्या स्थितीबद्दल इतर कोणाला तरी बोल लावायचे, दोषी ठरवायचे थांबवतो. आपल्या मनात मजबुत आणि निरोगी विचारांना जतन करू लागतो. परिस्थितीशी झगडण्याचे बंद करतो व उलट त्यांना आपल्या अधिक वेगवान प्रगतिला मदत करणारे साधन समजून त्यांचा वापर करू लागतो, स्वतःच्या अंतरंगात सुप्तावस्थेत दडलेल्या सामर्थ्याचा आणि शक्यतांचा शोध घेण्याचे साधन म्हणून त्यांच्याकडे पाहू लागतो.
आपले अपरिपक्व विचार आपल्याला पंगू करून जातात. म्हणून काही तारतम्य आपणही पाळायला हवे. त्याने काय होते की;
१. अधम आणि नीच विचार लवकरच मद्यपानाच्या आणि रागाच्या, कडवटपणाच्या सवयीत रुपांतरीत होतात आणि या सवयी दुःखाच्या आणि विनाशाच्या परिस्थितीचे रुप धारण करतात.
२. विनाशक आणि विघातक विचार मग तो कोणत्याही स्वरुपाचा असो, गोंधळात टाकणाऱ्या, थकवून टाकणाऱ्या सवयी लावतो आणि या सवयी आपले लक्ष विचलीत करणाऱ्या बनतात आणि त्या विपरीत परीस्थिती निर्माण करतात.
३. भय, शंका आणि अनिश्चिततेचे विचार दुबळ्या आणि चंचल सवयी लावतात आणि या सवयी अपयश, दारीद्र्य आणि पराधीनता निर्माण करतात.
४. आळशीपणाचे विचार अस्वच्छतेच्या आणि अप्रामाणिकपणाच्या सवयी लावतात,
५. ज्यांच्यातून निर्माण होणारी अनारोग्यप्रद परिस्थिती गरीबीकडे नेते.
६. तिरस्काराचे आणि धिक्काराचे विचार इतरांवर दोषारोपण करण्याच्या आणि हिंसेच्या सवयी लावतात ज्यांच्यातून इजा होण्याची आणि छळ होण्याची परिस्थिती आकाराला येते.
विशिष्ट विचारसरणी सातत्यपूर्ण असली, ती टिकून रहात असेल, तर मग ती चांगली असो वा वाईट, त्याचा प्रभाव आपल्या चारीत्र्यावर आणि परिस्थितीवर पडल्याशिवाय रहात नाही. आपण आपल्या परिस्थितींना प्रत्यक्ष निवडू शकत नाही हे खरे, परंतू आपण आपल्या विचारांची तर निवड करूच शकतो आणि त्याद्वारे अप्रत्यक्षपणे तरीही खात्रीशीरपणे आपण आपल्या परिस्थितीला आकार देत असतो.