श्याम मनातून थोडा मनातून दुखावलेला जाणवत होता. त्याचा एक मुद्दा होता की इतर मित्र, मैत्रीणी पूर्वीसारख वागत नाहीत. अजून चर्चा केल्यावर बोलला की स्वतःच्या नशिबावर कदाचित तो नाराज असावा कारण इतर खूप पुढे गेले होते. त्याच्या लक्षात आणून दिले की त्याला असुरक्षतेची चिंता सतावत आहे.
असुरक्षिततेच्या भावनेपोटी अनेकांचा आत्मविश्वास कमी झालाय व त्याचा संबंध बऱ्याचदा चिंता, विकृति, व्यसनाधीनता, मानसिक आरोग्याशी जोडला जातो. उच्च पातळीची असुरक्षितता असलेल्या व्यक्तीस, जीवनाच्या अनेक पैलूंबद्दल आत्मविश्वासाचा अभाव वारंवार जाणवतो. असे का होतं याबाबत काही तथ्ये आहेत.
१. एखादा शारीरिक आघात.
२. घटस्फोट किंवा आर्थिक तोटा / टंचाई.
३. आयुष्यात अत्यल्प आनंदाची अनुभूती. घरातील त्रासदायक वातावरण.
४. दैनंदिन जीवनातील अस्वस्थता.
५. काही गोष्टी प्रयत्न करूनही मिळत नाहीत म्हणून आलेले नैराश्य.
६. दिशाहीन आयुष्य किंवा इतरांनी दुर्लक्ष केल्याची भावना.
७. शंकेखोर स्वभाव. मित्रांच्या काही गोष्टींना नकारात्मकतेने घेणे.
८. घनिष्ठ किंवा प्रेमसंबंध, नंतरचा दुरावा.
असुरक्षित भावनांचे परिणाम पटकन दिसून येतात. श्यामला फक्त मित्रच नाही, तर इतर गोष्टींचा सुध्दा परिणाम जाणवायचा. असं काय होत?
१. चांगले नातेसंबंध तुटण्याची शक्यता.
२. अजून ताणतणाव व नैराश्य येण्याची भीती.
३. अमली पदार्थांच्या आहारी जाण्याची शक्यता.
४. एकाकीपण जाणीव तीव्र होते.
५. समाजापासून दूर जाण्याचा धोका.
६. हे अंतर नैराश्य, सामाजिक चिंता आणि स्मृतिभ्रंश असे मनसिक आजाराला आमंत्रण देतात. रागाचे प्रमाण वाढते.
७. आहारातील विकृती जसे की एनोरेक्सिया आणि बुलिमिया.
८. शरीर तंदुरुस्त रहात नाही. स्वतःच्या नजरेतून आपली इमेज कमी होणं.
असे अनेक परिणाम झाल्याने आनंद अत्यंत दुर्मिळ होतो. श्याम सुध्दा यातून बाहेर पडू शकतो म्हणून या स्वभावाशी कसे मिळते जुळते घ्यायचे याची चर्चा केली.
१. असुरक्षतता का येते याची कारणे शोधून उपाययोजना करणे. त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत होईल.
२. स्वतःच्या चांगल्या सवयी, सामर्थ्य आणि बुध्दीमत्ता यांचा वापर करून नकारात्मकता दूर होईल.
३. रोजनिशी ठेवणे, त्यातून आपल्यात होणारे चांगले बदल लिहून ठेवणे थेरपीचा भाग असतो.
४. योग्य आहार, शरीराची काळजी घेतली तर मानसिक आरोग्य आनंददायी असेल.
५. सातत्य नसेल तर मात्र केलेले उपाय कामी येत नाही. सातत्य साठी प्रेरणा हवी. म्हणून कुटुंबीयांची व निवडक मित्रांची मदत महत्वाची.
६. आपण इतरांसारखे बनण्याऐवजी वेगळे बनुया. आपली वेगळी ओळख हीच महत्वाची. त्यामुळे जळफळाट होत नाही.
७. सर्वात महत्त्वाचं, आपले व्यक्तिमत्व सकारात्मक ठेवणे गरजेचे. त्यासाठी प्रयत्न निरंतर ठेवल्यास इच्छा शक्ती शाबूत राहते.
आजही याबाबत समाज प्रबोधन खूप होतं परंतु अशा व्यक्तिमत्वाच्या व्यक्ती त्याकडे ध्यान देत नाहीत. ज्यांना आपल्यात बदल करायची इच्छा असेल त्यांनी नक्कीच समुपदेशन घेऊन पुढील वाटचाल सुसह्य करू शकता. यासाठी मनाची व शरीराची साथ आवश्यक आहे. चल तर मग असुरक्षेतेकडून सुरक्षित विचारांकडे..
©श्रीकांत कुलांगे
9890420209