(वाचताना थोडे हसायला हरकत नाही )
आज मी थोडे परखड पण आनंदी / सकारात्मक भावनेतून लिहितोय. विकासचा फ़ोन वरील संवाद थोडा “बायको आणि त्याच्या आई” विषयी होता. बायको आणि आईचे सुत जुळत नव्हते. एकीकडे आई म्हणतेय की आजून ही या घरची का होतं नाहीये, तिला हे जमत नाही ते जमत नाही. आणि तिकडे बायको म्हणतेय मी काय मशीन आहे का की आर्टीफिसिअल इंटेलिजन्स प्रमाणे त्यांना काय हवे आहे ते करू. या गोंधळामध्ये एक तर covid मध्ये नोकरी नाही आणि घरी हे वातावरण. पुढे काय करायचे हे समजावून मी संभाषण संपवले. आई चे किंवा बायकोचे – कुणाचे ऐकू, दोघांचा ताठरपणा नको त्या वेळी, नको इतक्या वेळ राहिला तर यात घराचे घरपण राहील काय? माझे मत कदाचित काहींना पटतील कदाचित नाही. लग्नानंतर मानसिक समुपदेशन नेहमी लागते, शक्यतो ते जर तज्ज्ञाने केले तर छान, पण तेच जर दुसऱ्याच्या हातात गेले तर कुटुंबाचे बारा वाजायला वेळ लागत नाही.
सर्व प्रथम सुनेची बाजू पाहू – तिने काय करावे (सुशिक्षित आहे असे गृहीत धरून):
१. सासूने काही उणीव काढल्या तर त्या मोटिवेशन म्हणून बघणे. जसे शाळेत गुरुजी छडी मारायचे.
२. नेहमी नवीन शिकणे ही जाणीव असावी. कदाचित नवीन घरी काहीतरी नवीन प्रथा असू शकते. कालांतराने ती बदलू शकेल, पण आता प्रयत्न करू नये.
३. संयम – नवीन घरी हा प्रयत्न करावाच. डोक्यावर बर्फ, तोंडात साखर हा फंडा चालतो. नोकरी करायची असल्यास वेळ द्या, पहिले घर यशस्वी रित्या सांभाळले तर नोकरीत यश आहे, अन्यथा न घर के न घाट के.
४. आपल्या व्यथा व्यक्त करणे – मन मोकळे केले पाहिजे. नवरा समंजस असेल तर फक्त त्याच्याकडेच. नसेल तर समजदार मैत्रीण चालेल. शक्यतो आपल्या आईला फ़ोन करू नये. कारण तिला आधीच तिच्या सुनेचा प्रश्न असू शकतो…..
५. मेडिटेशन – दीर्घ श्वास घेणे, नियमित झोप, छंद असेल तर त्याचा वापर घराकरिता होईल तर छान.
६. सासू सासरे (कसे असले तरी) – त्यांच्यात आपले आई वडील पाहणे व सेवा करणे.
७. नवऱ्याकडून असणाऱ्या अपेक्षा कदाचित उशिरा पूर्ण होतील – वेळ द्या.
मग नवरोबाकडून काय करणे अपेक्षित आहे:
१. बायकोला एक मनुष्य म्हणून वागणूक द्या – ती तुमची मैत्रीण, गृहिणी आणि आई असेल. तिला वेळ द्या.
२. तिच्या आणि आई मधील वाद असतील तर तिला चुकीचे म्हणायच्या ऐवजी मानसिक आधार द्या – घरात वाद कमी होतील.
३.आई व बायकोच्या वादात पडायच्या अगोदर थोडे बाबांकडे बघा. बऱ्याचदा कुंपणावर बसलेले असतील तर शेजारी बसा. गरज असेल तरच मध्ये बोला. त्यांचे प्रश्न बऱ्याचदा आपोआप सुटतात.
४. बायको काही सांगत असेल तर ऐकून घ्या, कसे प्रश्न सोडवू शकता ते पहा, अन्यथा मानसोपचार तज्ज्ञाला भेट द्या.
५. मातोश्रींचे म्हणणे चुकीचे होते हे सरळ सांगण्याऐवजी वेळ काळ बघून सकारात्मक पद्धतीने घेतले तर कदाचित फायदा होतो.
६. तुम्हीसुद्धा घरातील व्यक्तींशी मस्त पैकी बोलत चला – मस्ती-मजाक असेल तर ताण कमी होतो. ऑफिस मधील कटकटी घरी नकोत.
आता थोडे सासूकडे वळूया:
१. सुनेला लेकीसारखे तुम्ही वागवत आहातच तर थोड्या चुका माफ करा, तिला सकारात्मकरित्या तुमच्या चालीरीती शिकवा. तिला वेळ द्या. तुम्ही समजूतदारपण घेतला तर छानच.
२. नवीन पिढी थोडी जागरूक आहे – त्यांना त्यांचे करिअर महत्वाचे वाटते. जर शक्य असेल तर जरूर विचार करा – अहं बाजूला ठेऊन.
३. अगोदर ठरवा घरात घरपण हवे की हेवादावा. शांतता आणि आनंदी घरात लक्ष्मी येत असते.
४. जर सून भांडखोर असेल तर पहिले आपले काही चुकतेय का ते पहा, वाटल्यास समुपदेशक ला भेटा, सल्ला घ्या. पतीशी, मुलाशी बोला.
५. शक्य असेल तर तडजोडीला तयार राहा – शेवटी एकत्र कुटुंब पद्धती हे सर्वांचा निर्णय असतो.
६. उगीच आरडा ओरडा करायचे दिवस गेलेत. (हे सासू व सून दोघीना लागू). टोचून बोलणे, टोमणे देणे आजकाल च्या मुली नाही सहन करत. जरुरीपेक्षा जास्त झाले तर मांजरपण बोचकारते.
मला आठवड्यातून ४ तरी अशा केसेस समुपदेशनासाठी येतात आणि वाटते की माणसाने जगण्यासाठी जगावे की हसण्यासाठी. वाद म्हणजे भांडण नव्हे, ते एक तात्विक बोलण्याची प्रक्रिया असते व ती तिथेच संपली पाहिजे. सासू-सून-नवरा घराचे महत्वाचे अंग आहेत – वडील शक्यतो सर्वाना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतात कारण ते कुटुंब प्रमुख असतात. म्हणून सगळ्यांना म्हणजे ज्यांचे लग्न होणार असतील किंवा झालेली असतील तर समुपदेशन जरूर घ्या. सुखी संसाराचा मंत्र आहे आज जगणे – उद्याचे उद्या पाहता येईल.
@श्रीकांत कुलांगे
9890420209