काल दिवसभर मित्राची एकच तक्रार की करमत नाहीय, उगीच चीडचीड होतेय, काम करावेसे वाटत नाहीय. हातात असलेला हॅमर उगीचच फेकून देऊन आपला राग इतरांना दाखवून, असं का होतेय म्हणून मला भेटायला आला आणि बोलला की पूर्वी आवडणाऱ्या गोष्टी आता आवडेनाश्या होतायत. ते मी अगोदरच नोट केलं होतं की याचं काहीतरी बिनसलंय. काय आणि का, ते नेमकं त्याला समजत नव्हतं. अशी वेळ आजकाल आपल्यापैकी बहुतेकांच्या आयुष्यात कधी ना कधी येतेच. वेगवान, गुंतागुंतीच्या जगण्यात या वेळा वाढताहेत. आणि अशी वेळ आली तर आपण करतो काय? आपल्याला नेमकं काय होतंय ते थोडं थांबून बघणं टाळतो व दोष दुसऱ्यात आहे असे म्हणून मोकळे होतो.
जागतिक मानसिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार,असं होऊ लागलं तर ओळखावं की आपलं मन आजारी पडतंय.
जेंव्हा अशा गोष्टी घडतात तेंव्हा आपण काय करतो ते बघूया:
१. आपण आजारी मन लपवतो. स्वतःपासूनसुद्धा, त्याचं म्हणणं नीट ऐकत नाही.
२. मनाबाहेरच्या कारणांची भिंत मनाभोवती उभी करून त्याला उपचार करण्याऐवजी त्यांना जवळ करतो. त्यानं आजार चटकन बरा होण्याऐवजी घुसमटून अजून वाढतो.
३. उपचार न करता भोवतालच्या माणसांना आपलं इन्फेक्शन-संसर्ग देतो आणि आपलं सभोवतालचे वातावरण अजून दूषित करतो.
४.आपलं मन आजारी आहे म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर ज्यांना वेडे म्हटलं जातं अशा गंभीर मानसिक रुग्णांची चित्रं नाचायला लागतात. मग तर घाबरून कुणाला बोलतच नाहीत.
मानसिक तज्ज्ञांच्या मते, आजच्या काळात असलेले वातावरण, ज्यात असंतोष, सामाजिक-राजकीय हिंसाचार, व्यसनाधीनता, कुटुंबाची मोडतोड, कौटुंबिक अत्याचार, इत्यादी अशा अनेक कारणांमुळे मानसिक संतुलन बिघडलं आहे.
मनाची अशी स्थिती घडायला इतर कारणं पण आहेत – त्यामध्ये ठराविक आढळून आलेले ते बघूया:
१. मद्यपान आणि मादक पदार्थांचा जास्त वापर,
२. शारीरिक निष्क्रियता
३. खराब झोप किंवा झोपेची कमतरता
४. प्रदीर्घ काळ मानसिक त्रास असणे
५. हिंसक, भांडण अशा वातावरणात असणे
६. दारिद्र्य, गरिबी, जॉबलेस
७. अयोग्य अन्न आणि कुपोषण.
८. नेहमी टर उडवली जाणं.
९. एखाद्याला वाळीत टाकणं किंवा तुटक वागणं .
हे आणि इतर रिस्क फॅक्टर, सकारात्मक व निरोगी मनाचा विकास होऊ देत नाहीत आणि चांगले काम करणे कठीण करतं. त्यामुळे त्याचे परिणाम दैनंदिन व्यवहारावर दिसून येतात.
मग काय केले पाहिजे ज्याने करून आपले मन मजबूत होईल:
१. काहीजण म्हणतील मन मोकळं करा हे तत्त्व आम्हाला सांगण्याची गरज नाही. पण हे मन मोकळं लोकांशीच होत असतं. आणि जर हे टाळलं तर व्यक्तीच्या मनाचा किंवा समाजाच्या मनाचा आजार बळावत जातील. म्हणून भीती, शरम वाटून न घेता भोवतालच्या विवेकी थोरांशी निःपक्षपाती किंवा वेळेला ‘तुझं चुकतंय’ म्हणायला न घाबरणाऱ्या दोस्तांशी किंवा मानसोपचार तज्ज्ञांशी शेअरिंग झालं पाहिजे.
२. सक्रिय राहा. आपली काम आपणच करा. व्यायाम केल्याने आपल्याला बरे वाटेल. त्यामुळे चांगली झोप आणि आवश्यक विश्रांती मिळेल.
३. आपल्या अल्कोहोलचे सेवन कमी ठेवा. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने नैराश्याच्या भावना वाढू शकतात. गुटखा तंबाकू पासून दूर राहायला सांगणे म्हणजे मूर्खपणा आहे असे लोक म्हणतात व त्यावर माझा विश्वास आहे.
४. मागील चुका किंवा झालेल्या नकारात्मक गोष्टींवर विचार न करण्याचा प्रयत्न करा. जास्त काळजी केल्याने काहीही बदलत नाही.
५.ज्यांच्याशी आपलं छान जमतं आणि जे आपल्याला आनंदित करतात त्यांच्याबरोबर राहा. नकारात्मक माणसं दूरच बरी.
६.आपल्या भावनांची काळजी घ्या. भावनात्मक गुंतवणूक कधी कधी त्रासदायक ठरते. जी गोष्ट ठराविक प्रयत्न करून मिळत नाही ती आपली नसते.
७. आपली हेल्थ चेकअप वेळोवेळी करून घेऊन कुठली व्हिटॅमिन्स ची कमी आहे का ते पाहून डॉक्टर चा सल्ला घ्या.
८. सर्वात शेवटी मानसिक आरोग्याची तपासणी जरूर करून घ्या.
सकारात्मक वृत्तीमुळे आपल्यात बदल होऊ शकतात. विशेषतः जेव्हा आपण कठीण काळातून जात असतो तेव्हा सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्यास मदत होते. त्यामुळे निरोगी मन हे चांगल्या कल्पना राबविणे, निर्णय घेणे व नियमित कार्ये करून आपलं आयुष्य सुखमय बनवते. निरोगीपणाचा अर्थ वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टींचा अर्थ असू शकतो. कित्येकदा आपण सुधारतो परंतु समोरचा सुधारत नाही म्हणून निराश होऊ नका.
@श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९