एक तरुण व्यक्ती, आयुष्यात मला काहीच मिळालं नाही म्हणून नैराश्याच्या गर्तेत होरपळून जाऊन समुपदेशन घेण्यास मागील आठवड्यात येऊन गेला. त्याला एक प्रश्न विचारला की तूला खरंच काय हवं? हे उत्तर त्याचं स्पष्ट नव्हतं. नसेल तर जे हवं ते मिळणार कसं हा माझा त्याला प्रतिप्रश्न होता.
अडचण ही आहे की आपल्यापैकी पुष्कळ जणांना स्वत:च्या आकांक्षांची फारशी स्पष्ट कल्पना नसते. आपल्याला काय हवं हे नक्की ठाऊक असेल तर ते मिळतं.
आपल्या ज्या अपेक्षा असतात तसंच आपलं आयुष्य व्यतीत होतं असंही म्हणता येईल. जर खूप काही अपेक्षा असतील तर खूप काही मिळतं. नक्की काय त्याचा तपशील बाहेरील मनाला समजत नसेल तर अंतर्मन मोकाट सुटतं नि कसं साध्य करायचं या विषयी फिकीर करत नाही. बहिर्मनाने घेतलेला निर्णय अंतर्मनाच्या आधारेच घेतलेला असतो, हे आपण लक्षात घेत नाही. काय करायचं हे बहिर्मन ठरवत असलं तरी कसं काय करायचं हे ठरवत असतं अंतर्मनच!
आपल्या सर्वांजवळ मन नावाचं एक अद्भूत रसायन आहे. मन विचार करू शकतं नि हवं तिथे पोहोचू शकतं. मनाकडे हे ठरविण्याची विश्लेषणशक्ती असते की तुम्ही नक्की कुठे आहात नि तुम्हाला कोठे पोहोचायची आकांक्षा आहे.
मग ध्येयपूर्तीसाठी काय करावं?
१. ध्येय सुस्पष्ट करणं. मला काय हवंय?मला जे हवं त्यासाठी मला काय करायला हवं असा माझा विश्वास आहे?
२. लिहून काढणे. ध्येय निश्चित केल्या केल्या त्याची लेखी नोंद करणं आवश्यक आहे. आपले विचार आपण लिहितो तेव्हाच आपण खरा विचार करीत असतो, हे लक्षात येणं महत्त्वाचं आहे.
३. अनेक ध्येयं लिहिणे. खूप साऱ्या ध्येयांबद्दल लिहून काढा. एक किंवा दोन- एवढ्याच उद्दिष्टांची नोंद न करता डझनभर उद्दिष्टांबद्दल लिहून काढा किंवा किमान १०१ ध्येयांची नोंद करा. कारण, काही लगेच पूर्ण होतात तर काहींना कितीतरी वर्षं जावी लागतात. काही सफल झाल्यानंतर आणखी खूपशी ध्येयं तुमच्या अंतर्मनाला कार्यरत ठेवू शकतील. विपुलतेचा नियम! जर जे जे हवं ते सर्व काही मिळू शकतं, शिवाय त्यासाठी कृतिशील राहण्याची इच्छा आहे तर मग थोडक्यात गोडी कशाला मानायची?
४. आपल्या ध्येयांची लेखी नोंद करताना तडजोड करू नका.
५. आपल्या उद्दिष्टांची वाच्यता करू नका. तुम्ही नव्या नव्यानंच उद्दिष्ट ठरवू लागले असाल तर जगाला त्यासंबंधी न सांगणं उत्तम.
६. हेतू ठरवा. ध्येयं मोठी असली तरी ती मुळातून विस्कळित आणि निरुद्देश असू शकतात. स्वतःलाच विचारा, ‘माझ्या आयुष्याचा नेमका हेतू कोणता?’
एकदा तुम्ही उद्दिष्टप्राप्तीत सफल होऊ लागलात की लोकांना तुमचा अंदाज येतो नि मग ते तुम्हाला असामान्य, लक्षणीय आणि इतरांपेक्षा वेगळं समजू लागतात. मुद्दा एवढाच की आधीपासूनच जे करायचं त्याविषयी बडबड करून निरुत्साहाचे धनी होण्यापेक्षा आधी कृती करा. त्याचे पडसाद आपोआप उमटतील.
जेंव्हा ध्येयपूर्ती होते तेव्हा लिहिलेली ध्येयं खोडून टाकू नका. ध्येयप्राप्ती झाल्यावर ‘जिंकलो!’ म्हणून लिहू शकतो. ‘जिंकलो!’ असं लिहिणं म्हणजेच काहीतरी मिळवल्याचा संदेश अंतर्मनाकडे पाठवणं होय.
माझ्या क्लायंटला शेवटी एकच सांगितलं की आपण काय होतो याची गोळाबेरीज म्हणजे आयुष्य नव्हे, तर आपल्या आकांक्षा म्हणजे आयुष्य. तुम्हाला काय वाटतं?