विचारातील लवचिकता आणि ताठरपणा.

या आठवड्यात एक कार्यशाळा घेतली. त्या मध्ये आपली सर्वांगीण विकासासाठी विचारांची जडणघडण कशी असावी त्यावर खूपच सुंदर व परिपक्व चर्चा आम्ही सर्वांनी केली. 

ज्या व्यक्तीला आपल्या व्यवसायात उच्च ठिकाणी जायचे आहे, त्याने स्वतःच्या हानीकारक–घातक सवयींचा जाणिवपूर्वक त्याग करायला हवा! त्याचबरोबर नवनवीन अत्याधुनिक गोष्टी या आत्मसात करून घ्यायलाच हव्यात!

सतत बदलत्या काळातील अस्थिर आणि अशांततेच्या वातावरणात योग्य विचार करता येणे, अवतीभोवतीच्या परिस्थितीचे सगळे पैलू सावधानतेने जाणून घेणे आणि त्या बदलांना प्रवाहीवृत्तीने सर्वोच्च प्रतिसाद देणे…या आणि यासारख्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील, तर त्याचा तुमच्या व्यवसायावर व कारकीर्दीवर खूपच चांगला व मोठा परिणाम होऊ शकतो. त्याला कारणे आहेत.

१. तुमची उत्तरे बदलली आहेत. अवतीभोवतीच्या क्षेत्रात पर्यावरणात वावरताना आता आपल्याला नवीन उत्तरे शोधावी लागणार आहेत. एक वर्षापूर्वी जे उत्तर योग्य होते, ते आत्ता काही अंशी किंवा संपूर्णपणे कालबाह्य झालेले असू शकते.

२. सर्वाधिक महत्वाचा गुणधर्म, व्यावसायिक यशासाठी ‘लवचिकता (म्हणजेच मोठ्या प्रवाहीवृत्तीने कालानुरुप बदलण्याची तयारी)’ हा सर्वाधिक महत्वाचा गुणधर्म आहे.

३. बदलांचा वेग वाढतो आहे. आपण मानवी इतिहासातील आजवरच्या सर्वात जास्त वेगाने बदलणाऱ्या हानिकारक, खळबळजनक अशा कालखंडात राहात आहोत. शिक्षण आणि कार्यपद्धती, सर्व झपाट्याने बदलत आहे.

४. कामे/नोकऱ्या नाहीशा होतात. कंपन्या जी उत्पादने आणि सेवा पुरवत होत्या, ती उत्पादने आणि सेवा, ग्राहकांची आवड बदल्याने नाईलाजास्तव बंद कराव्या लागतात व असलेली कौशल्ये आता निरुपयोगी होतात.

५. प्रचलित बाजारासाठी अयोग्य असणारी आधारभूत व्यवस्था वापरल्यास विक्री आणि त्यामुळे नफा घटतो आणि सगळा व्यवसाय बंद पडण्याची पाळी येते. ऍपल व ब्लॅकबेरी फोन यांचे उदाहरण व्यापक आहे.

६. वेगाने कालबाह्य होणे.ज्या कंपन्यांना आपल्या व्यावसायिक मॉडेलमध्ये काही बदल करुन वर्तमानाशी जुळवून घेता आले नाही, त्या कंपन्या लवकरच इतिहाजमा झाल्या.

७. आज बरेच लोक असे आहेत की, त्यांच्याकडे असलेली कौशल्ये आता कालबाह्य होत आहेत आणि त्यांची जागा अधिक चांगली आणि त्या त्या घडीला मागणी असलेली कौशल्ये ज्यांच्याकडे आहेत त्या माणसांनी घेतली आहे.

 

आपली कौशल्ये कालबाह्य होत असतात, याचे भान ठेवा! तळातील ८० टक्के माणसे याच्या नेमकी विरुद्ध वागतात. ही माणसे क्वचितच एखादे पुस्तक वाचतात किंवा एखाद्या नवीन अभ्यासवर्गात जाऊन काही नव्या गोष्टी शिकतात किंवा आपली कौशल्ये विकसित करण्यासाठी काही प्रयत्न करतात. मिळालेल्या मोकळ्या वेळात ती माणसे कोणतेही नवे ध्येय साध्य करण्यापेक्षा अयोग्य ठिकाणी वेळ घालवतात, सोशल मीडिया वर किंवा पान टपरीवर गप्पा मारण्यात अशा गोष्टी करतात. त्यामुळे ही माणसे, बहुतेक वेळा त्यांच्या नकळत स्वत:च्या कार्यक्षेत्रात मागे पडत जातात. ह्या माणसांच्या हातातले काम जेव्हा काढून घेतले जाते, तेव्हा त्यांच्या असे लक्षात येते की, आपल्याकडे असलेली कौशल्ये, जी बऱ्याचदा अनुभवावरच आधारित असतात, ती आपल्या आताच्या उद्योगाच्या दृष्टीने अजिबात उपयोगाची नव्हती. अशा परिस्थितीत काय करायला हवे?

१. सातत्याने नव्या गोष्टी शिकत राहणे.

२. आपल्यात असलेली कौशल्ये अधिक विकसित करणे.

३. नवीन कौशल्ये आत्मसात करणे.

४. वारंवार सभोवताच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन नाविन्याची कास धरणे.

५. पुढील पिढी कशी असेल त्यावर ध्यान ठेऊन मुलांना शिक्षित करणे व स्वतःला मुळ प्रवाहात ठेवणे.

शर्यत सुरुच राहणार आहे. एकाच ठिकाणी कोणीही फार काळ राहत नाही. तुम्ही जर तुमचे ज्ञान आणि कौशल्य सातत्याने अधिकाधिक समृद्ध करीत नसला, तर तुम्ही इतरांशी स्पर्धा करू शकत नाही. जी माणसे स्वत:च्या ज्ञान आणि कौशल्ये विकासाबद्दल अतिशय जागरुक राहून त्या दृष्टीने कायम प्रयत्नशील असतात, त्यांच्या तुलनेत तुम्ही जास्तीत जास्त मागे पडत जाता! बदल आणि लवचिकपणा यांचे तीन शत्रू आहेत.

१. ‘आपले नेहमीचे सरावाचे काम’ हा अगदी पहिला आणि सर्वात वाईट शत्रू आहे. लोक एखादे काम करू लागतात आणि लवकरच त्यांना त्या कामाची, परिस्थितीची सवय होते. मग त्याबाबतीत कोणताही बदल होऊ द्यायची त्यांची तयारी मात्र नसते.

२. भीती आपले पाय मागे ओढते. अपयशाच्या भीतीचे दुसरे मोठे आव्हान असते.

३. बदल करण्यास असमर्थ असल्याची भावना. माणसांनी कोणत्याही बदलाला घाबरण्याचे आणि बदल नाकारण्याचे तिसरे कारण आहे. ज्यांनी बदल करणे आवश्यक आहे, त्या माणसांना बदल आवश्यक आहे, हे चांगलेच ठाऊक असते. पण त्यांच्या मनात असहाय्यतेची भावना असते. वर्तमान स्थितीचा गुंता त्यांना सोडवता येत नाही आणि ते पुढे काहीच करू शकत नाहीत.

 

मग काय करावं म्हणून मोठी चर्चा झाली आणि ठरवलं की पुढे काय करायचे.

 

१. मोकळेपणाने विचार. विचारांच्या कक्षा रुंदावू शकता.

२. आपल्या परस्परसंबंधांपासून सुरुवात करणे. आपले आयुष्यातील ७० टक्के अंदाज चुकत असतात. एकूणच, अधिकाधिक चांगले काम करता यावे, यासाठी आपल्यात लवचिकता येणे आवश्यक आहे.

३. आपण परिपूर्ण नाही आहोत, हे मान्य करून योग्य बदल घडवणे.

४. आपल्या हातून चूक घडली आहे, हे मान्य करणे. अहंकारामुळे बऱ्याच जणांना मी चूक केली हे मान्य करणे कठीण जाते. तुमच्या बाबतीत असे होऊ देऊ नका.

५. विचार बदला. तुम्हाला जेव्हा काही नवी माहिती मिळते, तेव्हा मनातील विचार बदलणे, याला मोठे धैर्य लागते. त्यातून मनाचा लवचिकपणा दिसून येतो.

६. आपल्या व्यवसायाचे, गुंतवणुकीचे आणि कारकीर्दीचे पुनर्मूल्यांकन करने.

 

मानसशास्त्रज्ञांच्या मते माणसांना वेळ, पैसा किंवा कोणतीही भावना वाया घालवायला आवडत नाही. कोणत्याही प्रकारची हानी किंवा पराजय झाल्यास प्रत्येक माणसाला वाईट वाटते. आपली हार मान्य करायला त्यांना आवडत नाही. कोणत्याही मार्गाने ते नुकसान भरुन काढण्याचा माणसे प्रयत्न करतात.

एखादी परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेली किंवा माझे एखादे नाते/मैत्री बिघडले तर ते अपयश स्वीकारणे चांगले असते. माझा निर्णय अयोग्य होता, माझे चुकले, त्यावेळेस मला सावरुन घेता आले नाही, म्हणून मी माझा विचार बदलला, असे म्हणून मोकळे व्हावे. या सगळ्यासाठी मनाचा फार कणखरपणा आवश्यक असतो. विचार करण्याचा तुम्ही जितका अधिक सराव कराल जितका तुमच्या मनात, वागण्यात लवचिकपणा येतो.

 

© श्रीकांत कुलांगे

9890420209

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *