काल लिहिलेल्या ब्लॉग नंतर खूप मेसेज होते की आपण अपयशी ठरला आहात किंवा आपली सर्व्हिस चांगली नाही, तुमचे हेच चुकते असे अभिप्राय मिळाल्यावर काय करावे?
तुम्हाला मिळणारे सर्वच अभिप्राय योग्य किंवा उपयुक्त नसतात. अभिप्रायाचा स्रोत काय आहे हे पहायला हवे. कधीकधी एखाद्या व्यक्तीने दिलेला अभिप्राय पूर्वग्रहदूषित असू शकतो. बऱ्याचदा गुगल किंवा अनेक ठिकाणी निजी, व्यवहारिक दुश्मनी सुध्दा कारणीभूत आहे असे दिसून आले आहे. मुद्दा असा आहे की जेव्हा अनेक लोक तुम्हाला एकच अभिप्राय देतात तेव्हा त्यात तथ्य असण्याची शक्यता जास्त असते.
जेव्हा सर्वच बाजूंनी मिळणारे अभिप्राय ‘तुम्ही अपयशी ठरला आहात, आपण योग्य काम करत नाहीत ‘ असे तुम्हाला सांगत असतात तेव्हा अशा अभिप्रायांचा स्वीकार करून पुढे जाण्याचे अनेक मार्ग आहेत, जसे की;
१. त्या परिस्थितीत तुमचे ज्ञान व तुमच्या कौशल्यांचा तुम्ही जाणीवपूर्वक, पुरेपूर वापर करून तुम्हाला शक्य तितका प्रयत्न केला हे मान्य करणं.
२. या पराभवातून तुम्ही पुन्हा उभे राहिलात व पुढच्या परिणामांना तोंड देण्यास तुम्ही सज्ज आहात हे मान्य करणे.
३. या अनुभवातून तुम्ही शिकलेली प्रत्येक गोष्ट लिहून काढून त्यावर योग्य सल्ला घेणे गरजेचे.
४. तुम्हाला अभिप्राय पुरविणाऱ्या प्रत्येकाचे त्यांच्या अभिप्रायाबद्दल व सूचनांबद्दल आभार मानायला विसरू नका. एखादी व्यक्ती जर अविवेकीपणाने अभिप्राय देत असेल तर यातून त्या व्यक्तीचा घाबरलेपणा/भित्रेपणा दिसून येतो. तुमची अकार्यक्षमता किंवा खडूसपणा नव्हे, हे लक्षात घ्या.
५. अपयशामुळे निर्माण झालेला विसंवाद दूर करून त्या अनुभवाला परिपूर्णता येण्यासाठी ज्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे त्यांच्याशी बोला.
६. मागे वळून यशाचे पुनरावलोकन करण्यासाठी वेळ काढा.
७. मित्र बदला. तुमचा आत्मविश्वास व उत्साह वाढविणाऱ्या सकारात्मक वृत्तीच्या प्रेमळ मित्रांच्या, कुटुंबियांच्या आणि सहकाऱ्यांच्या संगतीत काही काळ व्यतीत केल्यास फायदा.
८. तुमच्या उद्दिष्टावर आणखी एकदा लक्ष केंद्रित करणे तितकेच महत्त्वाचे.
तुकोबरायांनी सुद्धा अशा अनेक प्रसंगांना तोंड देत आपले विचार व्यक्त केले होते. म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी. योग्य त्या टीका टोमणे सकारात्मकतेने घेतले तर निश्चितच आपल्या यशाचा आलेख उंचावतो.
जेंव्हा आपण दुसऱ्यावर टीका करतो किंवा प्रतिसाद देतो, आपल्या प्रतिक्रिया देतो तेंव्हा काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.
१. त्या योग्य व सभ्य भाषेत असाव्यात.
२. त्यापासून समोरील व्यक्तीच्या आयुष्यात न्यूनगंड निर्माण होऊ नये.
३. त्या व्यक्तीला, व्यवसायाला आपल्या प्रतिसादाचा फायदा होईल, सुधारणा करता येतील अशा असाव्यात.
४. उगीच शत्रू मानण्यात काही अर्थ नाही.
५. व्यक्तिगत उद्विग्नेतून, व्यावसायिक किंवा दांभिक प्रतिसादामुळे आपण आपलीच मान खाली घालत असतो.
६. आपण सात्विक मानसिकतेतून दिलेल्या सूचना कुणाचे तरी नक्कीच भले करतात. त्यांचे कुटुंब त्यावर अवलंबून असते.
७. आपल्या प्रतिसादामुळे एखाद्याचा जॉब जाऊ शकतो. म्हणून काळजी घ्या.
प्रतिसाद देणे आपले कर्तव्य आहे त्यामुळे कुणाच्याही कामाची प्रतिभा, यश, कार्यप्रणाली, व्यवसाय वृध्दी होण्यास मदत होईल. गुगल वर अनेक जन आपल्या प्रतिक्रिया देत असतात, फोटोज् अपलोड करतात, त्यात सुध्दा एकप्रकारचा चांगुलपणा ठेवल्यास त्या त्या उद्योजकांना फायदा होईल.
यशस्वी उद्दिष्ट पूर्तीच्या दिशेने वाटचाल चालू ठेवणे क्रमप्राप्त आहे. त्या मार्गावर चालताना तुमच्याकडून भरपूर चुका होणार आहेत. कपडे झटका, घोड्यावर पुन्हा एकदा मांड ठोका आणि दौड चालू ठेवा.
©श्रीकांत कुलांगे
9890420209