आज सकाळी अचानक एका महिलेचा फोन आला आणि जॉब करिता विचारणा केली. जॉब नसल्यामुळे मी तिला नाही म्हणालो पण तिचा आवाज आणि पाठीमागे रडणाऱ्या मुलाचा आवाज मला काहीतरी सांगून गेलं. तिच्या आवाजात चिंता आणि कदाचित डोळ्यात पाणी पण असावं. तिने ना थांबता सांगितलं कि माझ्या ह्यांना COVID च्या लॉक डाऊन मुळे ऑफिस ला जात येत नाही व त्यामुळे पगार पण नाही. क्षणात मला जाणवले कि एक पत्नी, मुलांची आई जगण्यासाठी किती जीवाचा आटापिटा करतेय. एखादं कुटुंब, प्रमुख कुटुंबापासून दूर असेल तर असे एक ना अनेक प्रश्नांना सामोरे जाते व मग सुरु होते जीवाची घालमेल. असे अनेक कुटुंब विस्थापित झालेले पाहायला मिळतात आणि त्याला कारणे पण तशीच असतात, जसे कि नोकरी, मत भिन्नता.
घरात आईवडील, मुलगा/मुलगी, सून यांच्यामध्ये मतभिन्नता, वाद यामुळे कौटुंबिक अस्वस्थता अन् वेळप्रसंगी संघर्ष निर्माण होतो. आई-वडील, मुलं, सुना यांच्यामधील वैचारिक मतभेद दिसून येतात व सर्वांची मनःस्थिती बिघडते. त्यामुळे प्रत्येकाचा जीवनमार्ग वेगळा, स्वतंत्र बनतो. मग निर्णय प्रक्रिया बदलते आणि मनापासून दूर तर होतातच पण शरीराने सुद्धा विभक्त होतात. पण कुणालाही असे वाटत नाही कि कुटुंब व्यवस्था हि एखाद्या चिरेबंदी वाड्यासारखी मजबूत हवी. कितीहि वारा, पाऊस आला तरी ना डगमगणारी, खचून न जाणारी, प्रसंगी अनेक यातना सहन करून, दिवाळी च्या रोषणाई ला सामोरी जाणारी वास्तू हीच खरी कुटुंब व्यवस्था असायला हवी. कुटुंबे सुखी झाली तर समाज सुखी होईल. कौटुंबिक व्यवस्था सुधारली तर सामाजिक व्यवस्था सुधारून समाज जीवन पोषक, हितकारक व सुखमय होईल हे सांगायला कुणा महापुरुषाची गरज नाही.
कौटुंबिक समुपदेशन
वैवाहिक आयुष्यात होणारे वाद तसेच कौटुंबिक कलह सोडविण्यासाठी समुपदेशनाचा मार्ग प्रभावी ठरला आहे. कौटुंबिक वाद किंवा गैरसमजातून न्यायालयात दावे दाखल केले जातात. समुपदेशनामुळे गैरसमज दूर होतात. वादी आणि प्रतिवादींमधील तुटलेले नातेसंबंध पुन्हा जोडले जातात. परंतु कित्येकदा कुटुंबातील व्यक्ती समुपदेशनाकडे जाण्यासाठी इच्छुक नसतात आणि त्यामुळे अडचणी मध्ये आजून वाढ होते. कौटुंबिक समुपदेशन, समस्येचे निराकरण करून, थेरपी चा वापर करून सुरळीत होण्यास मदत करते.
माणसाचे संसारी जीवन सुखी, आनंदी होण्यासाठी कौटुंबिक प्रश्नांवर मात करायला हवी. त्यासाठी कोलमडत असलेली कुटुंब व्यवस्था… मग ती एकत्र असो वा विभक्त… ती सावरण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी आपल्या गरजा जर माणसाने कमी केल्या तर पैशांच्या मागे त्याला धावावे लागणार नाही. म्हणजे मग कुटुंबासाठी त्याच्याकडे वेळ राहील. त्यासाठी कुटुंबातील प्रत्येक घटकाने – ‘‘एकमेकांना जाणून घेऊ, एकमेकांशी जुळवून घेऊ, एकमेकांना साह्य करू, एकमेकांना सुखी-आनंदी करू’’… या मूलमंत्राचा ध्यास घेऊन तो आचरणात आणायला हवा. बदलत्या काळाची ती एक मोठी गरज आहे. असे असते तर कदाचित आज सकाळी फोन वरून जॉब मागणाऱ्या महिलेला मी संसार कसा चालवू याची चिंता करायची गरज नसती.
श्रीकांत कुलांगे
9890420209