भावना व कुटुंब

 

मंदाचे सासरे नुकतेच देवाघरी गेले म्हणून घरात पोकळी कशी निर्माण झाली याबाबत ती बोलत होती. खरंच आज सुद्धा घरातील मोठी व्यक्ती गेल्यानंतर निर्माण झालेली पोकळी काही केल्या भरून येतं नाही. आजच्या नवीन पिढीला आजी आजोबा सोबत राहायला मिळणे एक स्वप्नवत होत चालले आहे. कदाचित त्यांना नंतर ते मिस पण नाही करणार जेवढी मंदा आपल्या सासऱ्याला मिस करतेय कारण तिचे बालपण कदाचित असेच तिच्या आजोबांबरोबर गेले असावे. तिची कुटुंबाप्रती असणारी भावना प्रत्येकामध्ये असावी कारण त्यातूनच समाज उभा राहत असतो.
कुटुंबाची ही घट्टपणे केलेली रचना ही त्या त्या व्यक्तीसाठी पोषक तर असतेच, परंतु समाजाचीच विणदेखील त्यानिमित्ताने घट्ट राहते. एकमेकांना भावनिक किंवा मानसिक आधार देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होत असतो. कुटुंब अधिक भक्कम असेल आणि त्यांच्यामध्ये एकोप्याची भावना असेल तर त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीसुद्धा चांगली राहते. कालपरत्वे एकत्र कुटुंब व्यवस्था काही कारणाने विभक्ती कडे जाणार आहे परंतु त्यातून जिव्हाळा, चांगल्या विचारांची गुंतवणूक आवश्यक आहे. कुठेही रहा पण आईवडील, आप्तेष्टांची चौकशी आपुलकी ने करायला हरकत नाही.
प्रत्येक कुटुंब हे वेगळं आणि विशेष असते आणि त्याचा थेट परिणाम मुलांच्या वाढीवर होतो. मानसिक आणि आर्थिक अत्याचार करण्याचा इतिहास असेल तर त्यामुळे पालकांमध्ये मुलांविषयी भीती आणि हिंसेची भावना निर्माण होते. पालक, आजी आजोबा आजच्या वातावरणानुसार बदलत आहेत. म्हणून फक्त मुलांकडून अपेक्षा न करता आपण काय करतो आहोत याचं भावनात्मक विश्लेषण करणं काळाची गरज आहे. आजकाल मुलं आमचं ऐकत नाही हा सूर चांगल्या पैकी ऐकायला येतो. काय कारण आहे? का मुलं आपल्या पासून अलिप्त होतायेत?

तुम्हाला वाटते का मुलं किंवा नातवंडं तुमच्या जवळ राहावीत, मग हे कराच :

१. शब्द एक शक्तिशाली शस्त्र आहे. व्हिज्युअल रेंज (पालकांच्या चेहरा / त्यांचे भाव, त्यांचे घरगुती कपडे, पोझेस इ.) मुलावर तीव्र प्रभाव पाडते. आणि जर ते नकारात्मक असतील तर त्याची सावली मुलांवर पडते.
२. सभ्यता म्हणजे अशक्तपणा नाही. उलटपक्षी: शक्ती! हे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासारखे आहे, वागण्यात, आपल्या स्वतःच्या समर्थतेवर. मुलं तुमच्या सभ्यतेकडे बघतात.
३. बाहेरील लोकांच्या वागणुकीत व त्यातील त्रुटी लक्षात घेणे व त्याबाबत कडवट बोलणं फारच सोपे आहे. पण स्वत: कडे पहा. स्वतःच्या त्रुटी शोधून त्यांना करेक्ट कसं करायचं ते लहानांना कृतीतून शिकवा.
४. शिकणे, कधीही उशीर होत नाही. स्टेप बाय स्टेप पुढे शिकत रहा कारण मुलं आपलं अनुकरण करतात व त्यातून रुची तयार होते.
५. आपल्या जोडीदाराबरोबर नेहमी नम्र रहा, त्याचा सन्मान करा. मुलं तुमचा करतील.
६. इतरांनी केलेल्या चांगल्या कृतीवर आपुलकीने आणि प्रेमळपणाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करा.
७. स्वत: ला उत्तम प्रकारे वागवा!
८. दु: खदायक आणि अपमानकारक ..उद्धटपणावर असभ्यतेची प्रतिक्रिया देऊ नका – हे कठीण आहे, पण प्रयत्न करा..साध्य होईल.
९. हसणे, विनोद. विनोदबुद्धीचा वापर करा. संभाषण चातुर्य तुमच्याकडून मुलांकडे जाईल.
१०.मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्याशी बोला, रागाच्या प्रसंगाचे कारण ओळखण्याचा प्रयत्न करा.

ज्या कुटुंबात सुसुत्रता नाही अशा कुटुंबातील व्यक्तींनी कौटुंबिक मानसोपचाराकडे जाऊन सामोपदेशन घेतल्याने फरक पडतो. कौंटुंबिक मानसशास्त्र संघर्षाच्या कोणत्याही टप्प्यावर अडचणी सोडविण्यासाठी प्रभावी साधने ऑफर करू शकतो आणि सुसंवाद व परस्पर समन्वय साधण्यास मदत करू शकतो. वैवाहिक नात्यातील आवड आणि प्रेम असते ते पुन्हा प्रस्थापित होते. आज सासरी असणारी मंदा आपल्या सासऱ्यामध्ये स्वतःच्या वडिलांना बघते कारण तिच्यावर असणारे बालपणी चे संस्कार. नातं, आपण मानलं तर आहे नाहीतर काहीच नाही. नाही का?

@श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *