‘अमुक एकाला फार डिप्रेशन आलेलं आहे,’ असे आपण सहजपणे म्हणतो. पण व्यक्तीला डिप्रेशन येते म्हणजे नेमके काय होते, ते कशामुळे येते, डिप्रेशनची लक्षणे कोणती? त्यांचे व्यक्तीच्या जीवनावर होणारे परिणाम– मग ते शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक कुठलेही असोत– कोणते, डिप्रेशन घालवता येते का? येत असल्यास कसे? अनेकविध प्रश्न आजच्या एका कार्यक्रमात विचारले गेले. त्यासंदर्भात झालेला संवाद खूप सुंदर होता.
काळजी, नैराश्य, भीती, अस्वस्थता यांसारख्या नकारात्मक भावनांमुळे व्यक्तीचे मानसिक आरोग्य बिघडते. घडय़ाळाच्या काटय़ाबरोबर पळणारे अन् स्वत:बरोबर इतरांना पळविणारे उतावीळ, अधीरे, अट्टहासी, आक्रमक, अतिमहत्त्वाकांक्षी किंवा अति संवेदनशील, क्षुल्लक गोष्टींचा बाऊ करणारे, चिडखोर, असंयमी, असहनशील अशांच्या बाबतीत ते जास्त बिघडते किंवा असंतुलित होते. कुटुंबात असलेल्या अशा व्यक्ती स्वत:ही आनंदी, बिनधास्त राहत नाहीत व इतरांनाही तसे राहू देत नाहीत. यामुळे घरातील व्यक्तींना औदासिन्य येऊ शकते.
औदासीन्य किंवा डिप्रेशन या विकाराची विविध लक्षणे आहेत. ती जशी शारीरिक आहेत तशीच भावनांशी आणि वर्तणुकीशी निगडित आहे. ढोबळपणे त्यांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येईल.
१. शारीरिक: झोप लवकर न लागणे, झोपमोड होणे, स्वप्न पडत राहणे, सकाळी उठल्यानंतर झोप झाल्याचे समाधान न मिळणे, थकवा जाणवत राहणे, भूक न लागणे अथवा जास्त लागणे, वजन वाढणे किंवा घटणे, अकारण पाठ, पोट किंवा डोके दुखणे, अपचन, मळमळ इ.
२. वागणुकीशी निगडित – कार्यक्षमता घटणे, निर्णयशक्ती कमी होणे, सर्वच बाबतीत गती मंदावणे, स्वत:च्या दिसण्याकडे, कपडय़ांकडे व जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होणे, कशातही मन न रमणे, लैंगिक इच्छा कमी होणे, कुटुंबीय आणि मित्र यांच्याबद्दल आस्था न वाटणे.
३. भावनिकतेशी निगडित – दीर्घकाल दु:खी, चिंताग्रस्त वा निर्विकार असणे, हताशपणाची वा अपराधित्वाची भावना वाढीस लागणे, एकाग्रता कमी होणे, चिडचिड, विसरभोळेपणा वाढणे, काहीतरी वाईट घडणार अशी भीती वाटत राहणे, स्व-प्रतिमा खालावणे, निराशा, असहायता आणि स्वत:ला तुच्छ लेखणे (होपलेसनेस, हेल्पलेसनेस आणि वर्थलेसनेस) अशा गर्तेत फिरत राहणे, मनात टोकाचे नकारात्मक विचार येऊन आत्महत्येचा विचार व प्रयत्न करणे.
डिप्रेशनचे चार प्रकार खाली थोडक्यात दिलेले आहेत.
१. सौम्य औदासीन्य – या प्रकारात पीडित व्यक्तीला सौम्य प्रमाणात उदास वाटत राहते. उदासीन वाटण्याचा कालावधी अगदी दोन वर्षांपर्यंतचा असू शकतो. व्यक्तीच्या मनावर दडपण असले तरी ती नित्याचे व्यवहार नीटपणे पार पाडू शकते. मात्र या औदासिन्यामुळे रुग्णाच्या कामावर, त्याच्या नातेसंबंधांवर हळूहळू विपरीत परिणाम होऊ लागतो.
२. मेजर डिप्रेशन – या प्रकारात उदासीनतेची लक्षणे तीव्र असतात व ती दीर्घकाळ टिकतात. त्यामुळे रुग्णाच्या दैनंदिन कामकाजावर प्रतिकूल परिणाम होतात. तीव्र औदासीन्याचे झटके अधूनमधून येत राहतात.
३. चिंतामिश्रित औदासीन्य – या प्रकारात औदासिन्याच्या जोडीला चिंता, काळजी व भीती वाटणे, हातापायंची थरथर होणे, बेचैन वाटणे अशी लक्षणे दिसतात.
४. बायपोलर डिप्रेशन, या प्रकारात रुग्ण आलटून पालटून उत्तेजितता आणि उदासीनता अशा दोन भिन्न अवस्थांमधून जातो. पहिल्या अवस्थेत रुग्णाची क्रियाशीलता खूपच वाढते व तो खूप बडबड करतो. ही अवस्था संपली की, काही काळ अगदी सामान्य व्यक्तीप्रमाणे त्याचे वागणे सुरू होते. कालांतराने तो पुन्हा नैराश्याच्या गर्तेत जातो. हे चक्र असेच सुरू राहते.
डिप्रेशनच्या रुग्णांना खरे तर भावनिक आधाराची गरज असते. त्यांना आपले म्हणणे शांतपणे, लक्षपूर्वक ऐकणारे, आश्वासकपणे आपल्याला समजून घेणारे असे कुणीतरी हवे असते. दुसऱ्याजवळ व्यक्त करण्याने त्यांच्या भावनांना वाट मिळते. तसे झाल्यास त्यांना त्यांच्या विचारांतील त्रुटी, न्यूनगंड लक्षात येण्यास मदत होते व पुढील उपचारांसाठी त्यांची मानसिकता सकारात्मक बनते. म्हणून त्यांना उपदेश करणे टाळायला हवे!
औदासीन्याला प्रतिबंध करण्याचा महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वत:ची भावनिक बुद्धिमत्ता (म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स) वाढवणे. त्यासाठी स्वत:च्या भावना ओळखता येणे, इतरांच्या भावना समजून घेणे व त्याप्रमाणे वागणे, शिवाय अहितकारक भावनांची योग्य हाताळणी आणि व्यवस्थापन करणे इ. कौशल्ये आत्मसात करावी लागतात.
जसे प्रत्येकाला सर्दीपडसे होते तसेच प्रत्येकाला केव्हा तरी अत्यल्प प्रमाणात का असेना पण डिप्रेशन येतेच. मात्र आपल्या मनाची ताकद वापरून आपण त्यावर मात करू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने आवर्जून खालील काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत :
१. वास्तववादी ध्येय ठेवणे
२. जबाबदारीचे पुरेसे भान ठेवणे, प्राधान्यक्रम ठरविणे.
३. घरातील, नात्यातील वा ऑफिसमधील अशी एखादी तरी विश्वासाची व्यक्ती जोडावी की, जिच्याजवळ मन मोकळे करता येईल.
४. एखादा छंद जोपासणे, आवडीच्या गोष्टींमध्ये भाग घेणे.
५. नाटक, सिनेमा बघणे, मित्रमैत्रिणींचा गट करून सहलीला जाणे.
६. हलका व्यायाम, ध्यानधारणा, प्राणायाम करणे.
७. निराश वाटत असताना महत्त्वाचे निर्णय न घेणे.
८. मानसिक आरोग्यात बिघाड झाल्यास उपचारांची टाळाटाळ न करणे.
९. मानसिक आजार न लपविणे.
१०. कोणत्याही समस्येतून बाहेर पडण्याचा निर्धार ठेवणे, भावनांवर स्वत:चे नियंत्रण ठेवणे आणि कोणत्याही परिस्थितीचे आव्हान स्वीकारण्याची तयारी ठेवणे.
आपले मानसिक आरोग्य आपल्याला सहज तपासता येते. त्यासाठी स्वत:च स्वत:ला काही प्रश्न विचारून पाहावेत. उदा. मी स्वत:शी स्वस्थ आहे का? माझ्या सहवासात इतरांना स्वस्थ वाटते का? माझ्यातील उणिवा, दोष शोधून त्यात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न मी करतो का?
वरील प्रश्नांची नकारार्थी उत्तरे आल्यास आपल्या मानसिक आरोग्यात काहीतरी बिघाड झालेला आहे, असे समजण्यास हरकत नाही. विवेकपूर्ण, वास्तवपूर्ण, अर्थपूर्ण आणि सकारात्मक विचारांनी नकारात्मक विचारांवर निश्चितपणे मात करता येते.
रणांगणावर निराश झालेल्या अर्जुनाला गीता सांगणारा श्रीकृष्ण तरी होता. इथे अर्जुनही आपण आहोत अन् श्रीकृष्णही आपणच आहोत. आपल्या मनाची मदत घेऊन आपणच आपले प्रश्न सोडवू शकतो हा विश्वास खूप महत्त्वाचा आहे.