आधी वाद घालणे, लोकांना अयोग्य सिद्ध करणे हा काहींचा आवडीचा छंद असतो. त्यापैकीच एक ग्राहक समुपदेशनासाठी आला होता. तो म्हणाला की मी बऱ्याचदा वादविवादात जिंकतो पण मानसिक शांती काही मिळत नाही. हे असं का होतं?
प्रत्येक वेळी आपण वाद विवाद का करतो याचे कारण शोधायला हवे. त्याचबरोबर या वादविवादाला जर व्यवस्थित म्यानेज करायचे असेल तर काही गोष्टी जरूर करायला हव्यात.
१. योग्य प्रकारे बोलायला शिकणे.
२. आपला आवाज व पातळी योग्य हवी
३. कुठे किती व कसं बोलावं याचं भान.
४. जास्तीचे बोलणेपासून थांबविणे.
५. आपल्या रागाचे नियमन.
६. किती तानायचे याचे भान.
७. वस्तुस्थितीचे भान.
८. परिणाम काय असणार याची कल्पना.
९. कोणत्याही वादात पडण्यापासून रोखणे ही कला अवगत करणे.
१०. मानसिक संतुलन.
लिस्ट वाढत जाईल परंतु एक मात्र खरं की, वाद घालण्यात आणि भांडणे करण्यात अनेकजण आ़युष्यातील भरपूर वर्षे वाया घालवितात. आता मात्र ते त्यांचे तोंड बंद ठेवतात म्हणून त्यांचा खूप लाभ होतो आहे.
वाद विवादातील दोन्ही पक्ष आपलेच खरे करण्याचा प्रयत्न करीत असतात, त्यामुळे १०० पैकी ९० वेळा त्यातून काहीही लाभ होत नाही. वाद विवादामध्ये कोणीही विजयी होऊ शकत नाही. जिंकू शकत नाही. पराजीत झाल्यावरही पराभव होतो आणि विजयी झाल्यावरही पराभव तुमचाच असतो. कारण असे समजा की तुम्ही भरपूर प्रयत्न करून समोरच्या व्यक्तीला चुकीचे सिद्ध केल्यावर त्याचा अर्थ इतकाच होतो की समोरच्या व्यक्तीचा तर्क कमी पडला. तुम्ही त्याच्या प्रत्येक तर्काच्या पार चिंध्या केल्या आहेत. पण त्यामुळे काय झाले आहे? सर्वांसमोर तुम्ही त्याला खाली पहायला लावले आहे, त्याचा अपमान केला आहे. तुम्ही त्याच्या गर्वाला, अहंला घायाळ केले आहे. तुमच्या विजयामुळे तो दु:खी नक्कीच होईल आणि ज्या गोष्टीला समोरची व्यक्ती आपल्या इच्छेशिवाय मान्य करते, तो अद्यापही त्याचा “विचार” असत नाही.
असहमतीचे वादात रुपांतर होण्यापासून कसे रोखायला हवे, याबद्दल काही महत्त्वाचे आणि अमोल सल्ले देण्यात येतात.
१. असहमतीचे मनापासून स्वागत करा.
२. आपल्या पूर्वीच्या भावनेवरच विश्वास ठेवू नका.
३. आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवायला शिका.
४. आधी पूर्ण म्हणणे काळजीपूर्वक ऐका. आपल्या विरोधकांनाही बोलण्याची पूर्ण संधी देऊन त्यांना आपले म्हणणे पूर्णपणे मांडू द्या. त्यांच्याशी वाद घालू नका की त्यांना विरोध करू नका.
५. सहमती शोधण्याचा प्रयत्न करा.
६. सदैव प्रामाणिक रहा. ज्यामध्ये तुम्ही आपली चूक मान्य करू शकाल, अशी तथ्ये नेहमी शोधीत रहा. आपली चूक मान्य करायला वेळ लाऊ नका तसेच आपल्या चुकीसाठी क्षमाही मागा. त्यामुळे तुमचे विरोधक शांत होतील.
७. तुमचे विरोधक योग्यही असू शकतात.
८. समस्येमध्ये रस घेण्यासाठी आपल्या विरोधकांचे मोकळ्या मनाने स्वागत करा. त्यांचे कौतुक करा.
हट्टी, भावशून्य आणि अतिशय जिद्दी स्वभावाची माणसं मुळातच आपली हार मनात नसतात. अशा परिस्थितीत किती वाद विवाद, संवाद करायचा ते ते प्रासंगिक हवे. त्यांचा स्वभाव बदलणे अनेकदा शक्य नसते. किंबहुना ते आडमुठेपणा सोडून द्यायला तयार नसतात किंवा वस्तुस्थितीकडे नकारात्मतेने पाहत असतात.
बुद्धाने खरे सांगितले होते, ‘तिरस्काराने नाही तर प्रेमाने जग जिंकले जाते.’ संशयसुद्धा वादाने नाही तर समजूतादरपणा, सदभावना, कूटनीति आणि समोरच्या व्यक्तीचे गुण समजून संपविला जाऊ शकतो.
श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ञ