आई, वडील, पालक, मुलं, नातेवाईक व शेजारी यांच्याकडून प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा परस्परांबाबत असतात. लॉकडाऊन मधील काळात हि गोष्ट घरोघरी प्रकर्षाने दिसत आहे. नको त्यापेक्षा जास्त वेळ एकमेकांबरोबर राहिल्यानंतर प्रत्येकाला प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. प्रत्येकाच्या आदर्श वागण्याच्या काही चौकटी बनवलेल्या असतात व ते सर्व त्यानुसार वागत असतात; पण साऱ्यांनी तसेच वागले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो व तो पूर्ण झाला नाही की माणसे अस्वस्थ होतात. मी मनमोकळे बोलते/बोलतो तसे सर्वानी बोललेच पाहिजे, असा चुकीचा आग्रह असतो. त्या वेळी असे न बोलणाऱ्या माणसाला काहीतरी लेबल लावले जाते, नावे ठेवली जातात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, त्याला/तिला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी वेगळ्या असू शकतात, हे लक्षात घेतले जात नाही.
विवेकनिष्ठ मानसोपचारामध्ये (rational psychotherapy) असे दुराग्रह (Stubbornness) शोधले जातात. प्रत्येक माणसाच्या मनात असे काही दुराग्रह असू शकतात, त्या माणसाला ते योग्य वाटतात, पण इतरांना अयोग्य वाटु शकतात. निरपेक्ष भावनेतून स्वत:च्या मनातील विचार पाहू लागलो, तर असे अविवेकी हट्ट स्वत:चे स्वत:लाच समजू शकतात. काही जणांचा उगीचच अनावश्यक गोष्टी सांगण्याचा स्वभाव असतो, काही जण त्रास टाळण्यासाठी थापा मारतात. काही जणांना दुसऱ्याला फसवण्यात विकृत आनंद मिळतो. पण रागाच्या भरात माणसे बेभान होतात व भांडतात. प्रत्येकाची मूल्ये वेगवेगळी असतात. कुणासाठी व्यवस्थितपणा हे मूल्य असते, कुणासाठी नसते. देशोदेशी हे नियम थोड्याफार फरकाने आपल्याला दिसून येतात. नाविन्यता हे मूल्य असू शकते. मला कुणीही नाव ठेवताच कामा नये, हाही अविवेकी समज आहे. जगात प्रत्येक माणसावर दोषारोप झालेले आहेत आणि सध्याच्या सोशिअल मीडिया मध्ये ते पटकन दिसून येतात. दुसऱ्या माणसांनी कसे वागावे आणि काय बोलावे हे आपल्या नियंत्रणात नाही, हे पटले की अपेक्षांचा दुराग्रह कमी होतो. तसेच स्वत:चा आनंद इतरांच्या वागण्यावर अवलंबून ठेवला नाही, की अस्वस्थता कमी होते. अपेक्षांचे ओझे इतरांवर लादण्यापेक्षा त्यांना समजावून घेऊन सामोपचाराने राहिल्यास हेच ओझे आनंददायी वाटेल व मानसिक संतुलन आनंद दायी असेल.
श्रीकांत कुलांगे