मनाची उभारी

काल नीट परीक्षेचा निकाल लागला आणि अनेक मुलं कमी मार्कस मुळे निराश झाली. अनेकांचे कॉल आले, काही भेटून गेले की पुढे काय करावं. साहजिक आहे परंतु अनेक वेळा असे दिसते की, एखादे अपयश आल्यास माणसे निराश आणि दु:खी होतात. यशासाठी अथक प्रयत्न करून सुद्धा निराशा पचवणं अवघड जाते. यशाची खरी कसोटी अशा अपयशातून उठून परत आपण प्रयत्नांना सुरुवात कशी करतो यावर पुढील आयुष्य अवलंबून असते. नीट परीक्षे सारख्या अनेक गोष्टी आयुष्यात अपयश आणत असतात. 

आयुष्यातील आलेल्या अपयशातून ‘बाउंसिंग बॅक’साठी उपयोगी पडणाऱ्या काही क्प्त्यांचा आम्ही समुपदेशन करताना विचार केला.

१. काहीही झाले तरी सत्य बदलत नाही. सत्य परिस्थिती नाकारून काही फरक पडणार नाही उलट त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळेल.. परिस्थितीचा स्वीकार.

२. भूतकाळ तर घडून गेलेला आहे. घडून गेलेल्या घटनांबद्दल दु:ख किंवा आनंद मानणे निरर्थक आहे. वर्तमानात जगणे चांगले.

३. का झाले? कसे झाले? मला हे टाळता आले असते का? अशा गोष्टींवर विश्लेषण करून पुढे मार्गस्थ होणे.

४. कितीही काळे ढग आले तरी त्याला सूर्याच्या उपस्थितीत सोनेरी किनार ही लाभतेच. जे होते ते भल्यासाठीच.

५. अनुभवाला येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी शिकता येते. तीच शिदोरी आयुषयभरासाठी पुरते.

६. जिंकण्यासाठीच आपला जन्म झाला आहे. आपण आपला दृष्टिकोन सतत सकारात्मकच ठेवायला हवा. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होईल. त्यासाठी सतत प्रयत्नशील राहायला हवे.

७. आपल्याला काय करायचे आहे आणि ते कसे करायचे आहे यावर आपली श्रद्धा हवी. श्रद्धा म्हणजे पुराव्याशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे नव्हे, तर परिणामांची पर्वा न करता आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करण्याचे ध्यैर्य दाखवणे होय.

८. उत्साहामुळे आनंद आणि ऊर्जा निर्माण होते. आनंदानेच आनंद द्विगुणित होतो. उत्साह म्हणजे आपल्या यशाला लागणारी ऊर्जा आहे. यात आपण गुंतवणूक केली, तर भरपूर चांगला मोबदला मिळेल हे निश्चित.

९. यशस्वी माणसे सामाजिक कामासाठी, दुसर्‍यांच्या कल्याणासाठी योग्य वेळ देतात. निरपेक्ष कामामुळे आपला आत्मविश्वास वाढतो, निसर्ग आपल्याला भरभरून देतो;

१०. जबाबदारी, सचोटी आणि प्रामाणिकपणा यांचा अंगीकार करा

निसर्गाचा एक नियम असाही आहे की, आपण जे देतो ते अचूक आणि मोठे होऊन आपल्याकडे परत येते, म्हणून या गोष्टींना चिटकून राहणे खूपच उपयुक्त ठरते. त्यामुळे आयुष्यातील अनावश्यक तणावातून आपली सुटका होते. आपल्या आयुष्यात काय घडते यापेक्षा जे घडते त्याचा सामना आपण कसा करतो, यावर त्या घटनेचे परिणाम अवलंबून असतात. म्हणजेच घडणाऱ्या घटनेपेक्षा त्या घटनेबद्दलच्या आपल्या प्रतिक्रियांवरच त्या घटनेचे परिणाम अवलंबून असतात हेच अंतिम सत्य आहे.

विद्यार्थी आणि पालकांना हेच कळकळीचे आवाहन की आहे ते पदरात घेऊन नवीन उभरीने पुढे चला, वेगवेगळ्या वाटा आपली वाट पाहत आहेत.

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *