आपले व्यक्तिमत्व म्हणजे फक्त त्याचे वागणे बोलणे दिसणे इतकेच नसून, त्याचे ‘असणे’ ही महत्वाचे. हे असणे सुधारण्यासाठी, आपल्यातील सर्व दुर्गुण मिटवून सर्वार्थाने निर्विकार होण्यासाठी प्रयत्न दोन्ही बाजूने व्हायला हवेत. हा अहं जो माणसाचा फार मोठा शत्रू आहे, ज्यापायी माणूस इतरांपासून, स्वतःपासूनही दूर जात असतो, स्वतःला हरवून बसतो. नवरा बायको, मुले आणि पालक यांच्यातील होणार संघर्ष बऱ्याचदा अहं मधून बिघडतात.
अहंकार हा मुळातच प्रत्येकामध्ये असतो पण तो कुणात जास्त तर काही ठिकाणी कमी. अहंकाराचे मूळ खालील गोष्टींमध्ये असते-
१. अज्ञान.
२. स्वत:बद्दलचा फाजील आत्मविश्वास
३. नकार पचवण्याची कला अवगत नसण।
४. स्वत:पाशी असलेले अधिकार
५.आध्यात्मिक विचारांची वानवा.
अहंकारामुळे फक्त नुकसान आणि नुकसानच होते. यामुळे
१. मन:शांती बिघडते, कारण दुसर्यांचा विकास पाहवत नाही.
२. सारासार विवेकबुद्धी नष्ट होते व इतरांशी आपले संबंध दुरावतात.
३. संसार आणि वित्त हानी.
मनुष्य म्हटला की अहंकार आलाच. त्यावर नियंत्रण ठेवून त्याला आपल्या आज्ञेत ठेवणे यातच खरी प्रगल्भ माणसाची कसोटी लागते. नकरारार्थी अहं कमी होण्यासाठी काही गोष्टी केल्या तर फायदा होईल:
१. जमल्यास रोज ५ चांगल्या गोष्टी करा – कायम चांगली कामे केल्याने आपण आनंदी होतो, उदासी व वेदना कमी होतात.
२. कृतज्ञता दाखवा – म्हणजे चुकांच्या पलीकडे पहा. काहीतरी चांगलं सापडेल. काय केले याची वहीत नोंद ठेवा.
३. जबाबदारी घ्या – सुरुवातीला त्रास होईल पण हळूहळू आनंद वाटायला लागेल. काम पूर्ण केल्याने समाधान लाभते.
४. मी-माझे भौतिक सुख या सर्व कल्पनांना तिलांजली द्या. दुसऱ्याचा विचार करा.
५. दुसऱ्यांबरोबर स्पर्धा करणे टाळा.
नेहमी अंतरात्म्याशी संवाद साधा, आपले बोलणे ओठावर येण्यापूर्वीच अहंकाराचा दर्प नाही ना हे अवश्य तपासा. अहंकार जर संतुलित असेल तर तो आपल्याला फायदेशीर ठरतो. समुपदेशन घेणं, वेळ पडल्यास मानसोपचार घेणं यात काहीच गैर नाही, हे स्वीकारले पाहिजे. घराघरातून वाढणारे कलह यामुळे शांत होऊ शकतात. स्वतः मधल्या कला शोधा, तयार करा, नाहीतर संत तुकडोजी म्हणतात तसे
“एक तरी अंगी असू दे कला, नाहीतर काय फुका जन्मला”
@श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९