“माझं कौतुक कुणीच कसं करत नाही” याबाबत राहुल पोटतिडकीने बोलत होता. वास्तविक ‘प्रशंसा’ हा एकच शब्द आहे, ज्यामध्ये मनुष्याच्या हृदयाचा, इतिहास सामावलेला आहे.
आपल्यासाठी उच्चारले गेलेले कौतुकाचे उद्गार किंवा शाबासकीची थाप अशी किमया करतात. त्यासोबतच आपण इतरांचं केलेलं कौतुकदेखील दुहेरी फायदा घडवून आणतं. आपल्या मनातील भावना व्यक्त करता आल्यामुळे स्वत:ला समाधान लाभतं आणि इतरांच्याही चेहऱ्यावर हसू फुलतं. राहुल याच गोष्टीवर विचार करत होता. का हवं कौतुक?
१. कौतुक नैसर्गिक गरज- ‘कौतुक व्हावं असं वाटणं’ ही नैसर्गिक भूकच! ‘अहं’ सुखावला जातो
२. शाबासकी, कौतुक, आभार, हे थोड्याफार फरकानं तसे समान अर्थाचेच शब्द! यांचा योग्यवेळी योग्य वापर केला की, नातेसंबंधदेखील अधिक दृढ होतात.
३. कौतुक स्वत:ला अपरिचित असणारे गुणदेखील लक्षात आणून देतं.
४. कौतुकाने आत्मविश्वास, आत्मसन्मान वाढतो. कौतुकासोबत सांगितलेल्या चुकाही पचतात आणि पटतातही!
५. नैराश्यातून बाहेर काढण्याचंही सामर्थ्य यामध्ये आहे.
६. आपण जेव्हा एखाद्याचं कौतुक करतो तेव्हा ती व्यक्ती कोणत्या मन:स्थितीतून जात आहे, हे आपल्याला माहीत नसतं; पण ती अशा एखाद्या नकारात्मकतेला सामोरी जात असेल तर आपल्या छोट्याशा कौतुकामुळे परिस्थिती बदलू शकते.
७. ‘आपलच तेवढं चांगलं’, असं नको. इतरांचं कौतुक करण्यासाठी गुणग्राहकता, पारख तर आवश्यक आहेच; पण त्यासाठी मनही मोठं असावं लागतं.
८. कौतुक कसं करावं? हेदेखील समजावून घेणं गरजेचंच! कधी आणि कुणाचे हे समजणं महत्वाचं.
९. कौतुक हे निखळ कौतुक असावं. त्यामध्ये दुसऱ्याचा फायदा होईल या भीतीला थारा देऊच नका!
१०. हृदयाकडे पोहोचणारा मार्ग कानामधून जातो म्हणून ‘तिचे’ही नक्कीच कौतुक करणे आवश्यक असते.
११. नेहमीची कर्तव्यं, जबाबदाऱ्या पार पाडल्या जात असताना कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज असते.
१२. कौतुक करताना उपकाराची भाषा नको.
१३. ‘कौतुकाचा स्वीकार’ हीदेखील कलाच!
अहं मध्ये येणं, व्यक्त होण्याचं कौशल्य नसणं, गैरसमज होण्याची भीती वाटणं, समोरचा डोईजड होईल, शेफारून जाईल असं वाटणं. अशी कितीतरी कारणं आहेत कौतुक न करण्याची! ज्या बाबी गृहीत धरलेल्या असतात, आयुष्य देवाण-घेवाणयुक्त आहे. त्यामुळे नेहमीच इतरांना धन्यवाद द्या आणि काहीही गृहीत धरू नका!
कौतुकास्पद ठरणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींबद्दल जागरूक रहा. स्वत:ला शाबासकी देण्याची सवय लावून घ्या! मग बघा स्वत: मध्येही केवढा सकारात्मक बदल होतो ते!
कौतुकाची थाप जेव्हा पाठीवर पडते ना.
तेव्हा कष्टांची फुलपाखरं होतात.
आणि एक सांगू.
समोरच्या व्यक्तीचं निर्लोभ कौतुक करायला
फारसं काही लागत नाही हो.
ते करा आणि बघा.
आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही समोरच्याला द्याल.
ती म्हणजे त्याचा स्वत:वरचा विश्वास!
© श्रीकांत कुलांगे
9890420209