दिलगिरी, कशी व कधी

 

“माफ करा मला” हे म्हणायची ताकद आपल्यात असायला हवी. प्रत्येक धर्मामध्ये वर्षातून ठराविक काळ एकमेकांना जवळ आणायचा प्रयत्न केला जातो. माफी मागणे आणि माफ करणे दोन्ही आपल्या हातात तरीपण कित्येकदा असे होत नाही. नातेसंबंध आपल्याला चिंतामुक्त ठेवायला कारणीभूत असतात. परंतु हे नातेसंबंध, संघर्षामुळे बर्‍याच भावनिक वेदना आणि तणाव निर्माण करतात. म्हणून माफी कशी व केंव्हा मागावी हे जाणून घेणे महत्वाचे आहे. प्रामाणिकपणे माफी कशी मागायची हे आपल्याला माहित पाहिजे. तुम्ही एखाद्याची दिलगिरी मागून काय साध्य करता, ते म्हणजे:

१. आपली चूक झाली हे आपण मान्य करतो. हे एक चांगल्या माणुसकीचे लक्षण आहे.
२. आपल्या संबंधातील काही सीमा आहेत त्याचे कुठे तरी उल्लंघन झालेय याची प्रचिती येणे.
३. माफी मागून आपण संबंध सुरळीत करू इच्छिता हा संदेश देणे. म्हणजे संवाद सुरु होतील.
४. आपल्या चुकांमधून शिकणे आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याचे नवीन मार्ग शोधणे.
५. मन शांत होतं. आपल्या चुकांमधून धडा शिकणे.

चुकीचे असूनसुद्धा आपण माफी नाही मागितली तर खाजगी आणि व्यावसायिक संबंध तुटण्याची शक्यता असते. यामुळे अफवा, संताप, असंतोष आणि शत्रुत्व देखील होऊ शकते जे कालांतराने वाढू शकते. संशोधनात असे आढळले की लोक माफी मागत नाहीत याची काही प्रमुख कारणे म्हणजे त्यांना इतर व्यक्तीबद्दल खरोखरच चिंता नसणे, माफी मागणे त्यांच्या स्वत: च्या प्रतिमेस हानिकारक आहे असे वाटणे किंवा माफी मागितली तरी काही चांगले होणार नाही असा त्यांचा विश्वास असणे. मग दिलगिरी व्यक्त करायचा विचार करत असाल तर काही गोष्टी ध्यानात ठेवा
१. कधी क्षमा मागितली पाहिजे ते जाणून घ्या -तुमची चूक झालीय हे वाटल्यास, लगेच बोलून मन मोकळे करा.
२. जबाबदारी घ्या. चुकलंय ना, मग बोला, कळत नकळत बोलून गेलोय, माफ करा. दुसर्यांना दोष न देता.
३. त्यांना दुखावून, तुम्हाला पश्चाताप होतोय तुमच्या बोलण्यातून, कृतीतून दिसू द्या,
४. दुरुस्ती करा – तुमचा विश्वास पुन्हा तयार करा.
५. सीमा निश्चित करा – जेंव्हा भांडण करताना सीमोल्लंघन होतं, ती सीमा तय करणे. आपल्याला पुन्हा तोंड दाखवायला जागा ठेवणे.
६. आपण दिलगिरी व्यक्त करताहात ते स्वतःच्या मनःशांती करिता, ते पाहून कदाचित समोरील व्यक्ती सुद्धा माफी मागू शकते.
७. एवढे करून सुद्धा वातावरण बदल झाला नाहीतरी ठीक. जे आहे ते आहे.

दिलगिरी व्यक्त करणे नेहमीच सोपे नसते, परंतु ते महत्वाचे संबंध सुधारण्यास किंवा टिकवण्याचा एक महत्त्वाचा भाग असू शकतो. सहानुभूती, मोकळ्या मनाने, आपण प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आवश्यक असलेली पावले उचलू शकता. त्याने काय होईल की मानसिक आजाराची प्राथमिक सुरुवात आपण इथेच थांबवण्यात यशस्वी होतो अन्यथा आपले आपले आजार अजून बळावण्याची शक्यता अधिक आहे.
मग करताय न सुरुवात दिलगिरी व्यक्त करण्याची….”माझे चुकले, असं मी करायला, बोलायला नको होतं” लाजू नका – आपले मन मोठे करा.

@श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *