एका शाळेतील ‘न ऐकणाऱ्या’ मुलाची आई वैतागून समुपदेशन घेताना बोलली की, ‘‘ कुजकटपणे बोलणाऱ्या नवऱ्याशी मी एकवेळ जुळवून घेऊ शकते. या मुलापुढे मात्र हात टेकले. त्याच्याशी कसं वागावं तेच कळत नाही.” अशा केसेस आता काउन्सिलिंग सायकोलोजिस्ट कडे पहिल्यापेक्षा जास्त वाढत आहेत.
पालकांना मुलांच्या वाढत्या वयातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील समस्यांची जाण असेल, तर त्यांना मुलांना हाताळणे सोपे होऊ शकते. मात्र मुलांना समजून घेण्यापूर्वी पालकांना स्वत:ला स्वत:ची ओळख असणे आवश्यक आहे. एखादे चिडखोर, पटकन रागवणारे वडील मुलांना नीट समजून घेऊ शकत नाहीत. कारण त्यासाठी लागणारी सबुरी त्यांच्यात नसते. याउलट, एखादी आईच जर घाबरट, रडूबाई असेल तर तीसुद्धा मुलांच्या समस्या हाताळण्यास असमर्थ ठरते. कारण ती स्वत:च तिच्यातील नकारात्मक भावनांनी हैराण झालेली असते.
पालकांनी आणि मुलांनी भावनिक कौशल्ये शिकून घेतली तर ती दोघांचेही जगणे आनंददायी करण्यात उपयुक्त ठरतील. टीन-एज गटातील मुलांच्या समस्यांची हाताळणी कशी करायची, भावनिक आवेगांवर नियंत्रण कसे राखायचे हे पालकांनी समजून घेतले आणि ते स्वत:च्या आचरणातून मुलांपर्यंत पोहोचवले तरीसुद्धा त्यांच्यातील विसंवाद (असलाच तर) बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो.
टीन-एज म्हणजे वय वर्षे १३ ते १९ हा गट आणि हे वादळी वय असते. मुलांमध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक अशा सर्वच पातळ्यांवर वेगाने बदल घडत असतात. भावनांचे आवेगही तीव्र होत असतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्या अॅडजस्टमेंटच्या समस्या निर्माण होतात. मुलांमध्ये ‘स्व’ची ओळख निर्माण होण्याचा हा काळ असतो. परंतु आपण त्याला सोयीप्रमाणे शिंग फुटण्याचा किंवा पालकांच्या सत्त्वपरीक्षेचा काळ असे म्हणतो. त्यातही भर पडली आहे ती तीव्र स्पर्धा आणि पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा यातून निर्माण होणाऱ्या ताणतणावाची. डोळ्यांसमोर टीव्हीवर दिसणाऱ्या, भुरळ पाडणाऱ्या जाहिराती आणि डोक्यात इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध असलेली अनिर्बंध माहिती. यातून काय घ्यायचे नि काय सोडायचे, चांगले-वाईट असा सारासार विचार मुले बऱ्याचदा करत नाहीत. भावनांवर नियंत्रण ठेवणे त्यांना जमतेच असे नाही. या सर्वांचा त्यांच्या वर्तनावर कळत-नकळत परिणाम होत असतो. मुलांचा बुध्यांक (आय.क्यू.) वाढतोय पण भावनांक (ई.क्यू.) कमी होतोय अशी परिस्थिती दिसतेय.
जगभरातील मुलांमध्ये आज आढळून येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, त्यात भारत कुठे मागे नाही. त्यात;
१. चिडचिडेपणा, तापटपणा, उद्विग्नता आणि आवेगशीलता (इंपलसिव्हनेस) यामध्ये वाढ.
२. नियमांचे उल्लंघन करण्याकडे वाढता कल,
३. व्यसनाधीनता तसेच झोपेच्या व भुकेच्या तक्रारी.
४. नैराश्य व भावनिक असंतुलन.
५. वर्तनसमस्या.
६. मुलांमध्ये हिंसाचार वाढलेला दिसतोय.
७. चाकू, सुरे, गुप्त्या, क्वचित पिस्तूल यांचा सहज वापर होऊ लागलेला दिसतो.
८. छेडछाड, मारामाऱ्या.
९. कुटुंबाला आर्थिक मदत न करण्याची भावना.
१०. संयम, सहनशीलता कमी होताना दिसतेय.
११. अपयश, नकार पचविता येईनासे झाले आहेत. त्यांना ‘आज-आत्ता-ताबडतोब’ ही मानसिकता वाढू लागलीय. त्यामुळे ती मागचा पुढचा विचार वा परिणामांची पर्वा न करता वागतात.
परंतु हे चित्र भावनिक समायोजन कौशल्ये शिकवून बदलता येऊ शकते. हत्या काय किंवा आत्महत्या काय, त्या घडतात भावनावेगांवर नियंत्रण नसल्यामुळे! त्यामुळे लहानथोरांनी भावनिक कौशल्ये आत्मसात करण्याची गरज कधी नव्हे, इतकी आज निर्माण झालेली आहे. मुलांच्या भावनिक सवयींना अगदी लहानपणापासून योग्य वळण लावल्यास ते पुढे जन्मभर त्यांना उपयोगी पडते.
नवजात बालकांना विविध आजारांना प्रतिबंध करणाऱ्या लसी टोचतात. त्याचप्रमाणे मुलांना मानसिक आजार होऊ नयेत, त्यांच्याकडून टोकाचे अविचारी वर्तन घडू नये, त्यांची मानसिकता संतुलित राहावी यासाठी प्रशिक्षणाच्या रूपाने त्यांचे मानसिक लसीकरण होणे आवश्यक आहे. शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांच्या किंवा अन्य तरुण-तरुणींच्या आत्महत्यांनंतर तर असे प्रशिक्षण अधिकच गरजेचे झाले आहे असे वाटते.
पालक सुजाण असले म्हणजे मुलांचे प्रत्येक टप्प्यावरील विकसित होणे आनंददायी ठरते. अन्यथा ते दोघांनाही त्रासदायक होते.
समुपदेशन घेण्यासाठी आलेल्या माऊलीची अगोदर भावनिक बुद्धिमत्ता चाचणी करून घेतली आणि मगच पुढे तिच्या मुलाबाबत काय निर्णय घ्यायचा ते ठरविले.