हुशार असूनही आयुष्यात मी मागे का हा प्रश्न विचारणारे अनेक जण भेटतात. त्यांना आयुष्यात असलेले प्रश्न व्यवस्थित हाताळता येत नाहीत हा एक दुसरा प्रॉब्लेम. अशा अनेकविध मित्रांना एकच सांगू इच्छितो की आपली भावनिकता वाढवा. असं सांगण्यामागे काही कारणं आहेत.
IQ (Intelligence Quotient) हा शब्द आपल्या ओळखीचा आहे. IQ चांगला म्हणजे आपण हुशार. हुशारीमुळे चांगलं शिक्षण अन् पुढे चांगली नोकरी व सुख अशी मनात एक साखळी तयार असते. कित्येकदा EQ (Emotional Quotient) चा किंवा भावनिक बुद्धिमत्ता शब्दाचा आपल्या डोक्यात विचारही नसतो. हुशारीचा संबंध अभ्यासातील प्रगतीशी जोडला गेलेला असल्यामुळे वागणुकीच्या बाबतीत काही डावं-उजवं लक्षात आलं असेल तरी सगळे गुन्हे माफ असतात. त्याचबरोबर शिक्षणात चमकलेला मुलगा पुढच्या आयुष्यात मागे पडला अथवा अयशस्वी ठरला तर त्याचा संबंध नशिबाशी, परिस्थितीशी, ग्रहांची साथ नसण्याशी किंवा संधी न मिळण्याशी जोडला जातो आणि सामान्य बुध्दीचा माणूस पुढील जीवनात यशस्वी ठरला की त्याला नशिबाची साथ आहे असं म्हटलं जातं.
मात्र भावनेच्या क्षेत्रातील संशोधन जसजसं पुढे सरकू लागलं तसतसे भावनिक विकासाचं महत्त्व आणि आयुष्यात यशस्वी होण्याशी त्याचे संबंध लक्षात येऊ लागले. सामान्य बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती भावनिक हुशारीच्या जोरावर यशाचं शिखर गाठू शकते हेही लक्षात आलं. काहींच्या मते तर जीवन यशस्वी होण्यात IQ चा वाटा वीस टक्के आहे, तर इतर घटकांचा सहभाग ऐंशी टक्के आहे. सध्याचा काळ म्हणजे प्रवेशासाठी धावपळ, पैशाची ओढाताण, नोकऱ्यांबाबत अशाश्वती असा अस्थिरतेचा आणि तीव्र स्पर्धेचा आहे. ह्या दुष्ट चक्रातून जाताना आपल्या मुलांच्या प्रगतीत अडथळे उत्पन्न होऊ नयेत म्हणून पालकांनी स्वत:ची तसेच मुलांची भावनिक हुशारी वाढवण्यासाठी सजग असणं खूप आवश्यक झालं आहे.
बुद्धीच्या विविध पैलूंचा अभ्यास करताना अभ्यासापलीकडे महत्त्वाच्या असणाऱ्या आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या काही घटकांकडे लक्ष ठेवले पाहिजे.
१. Interpersonal ingelligence किंवा ‘आंतरव्यक्तिक बुद्धिमत्ता’ म्हणजे दुसऱ्यांना समजून घेण्याची क्षमता व हुशारी. इतर व्यक्तींच्या वागणुकीमागील प्रेरणा, हेतू लक्षात येणं, त्यांची कार्यपद्धती लक्षात घेणं, त्यांच्याशी सहकार्याने काम कसं करावं, हे कळणं अशा अनेक गोष्टींचा यात समावेश होतो. त्याचबरोबर इतरांचे मूड, स्वभाववैशिष्ट्यं, इच्छा आणि प्रेरणा ओळखून त्यानुसार वागण्याच्या क्षमतेचा अंतर्भाव यात असतो. लोकांच्या संदर्भात काम करणाऱ्यांसाठी तर या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. यशस्वी डॉक्टर्स, शिक्षक, नेते, विक्रेते, धार्मिक गुरू अशांच्या ठिकाणी वरील गोष्टी विशेषत्वाने आढळतात म्हणून ते यशस्वी ठरतात, असं म्हणता येईल.
२. Intrapersonal ingelligence किंवा ‘व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ते’त ‘स्व’ची योग्य जाणीव विकसित करण्याच्या क्षमतेला महत्त्व असतं. स्वत:च्या भावभावनांची जाण असणं, त्या ओळखता येणं, विविध भावनांचा फरक कळणयानुसार आपल्यात बदल करणं आदी गोष्टींचा या आत्मज्ञानात समावेश असतो. आपणच आपल्याला ओळखणं यात अभिप्रेत असतं. ज्याला स्वत:ची ओळख पटते त्याला इतरांना ओळखता येतं. त्यामुळे एखाद्या सामान्य बुद्धिमत्तेच्या परंतु स्वची यथार्थ जाणीव असलेल्या आणि इतरांशी कौशल्याने वागणाऱ्या कुणा व्यक्तीने एखादा मोठा उद्योग उभारला अन् त्या ठिकाणी उच्च बुद्धिमत्ता पण अपुरी व्यक्तीअंतर्गत क्षमता असलेल्या किंवा पुरेसं आत्मभान नसलेल्या व्यक्ती काम करताना दिसल्या तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.
IQ पेक्षा EQ महत्त्वाचा ठरतो तो असा. नुसती अभ्यासातली बुद्धी किंवा शैक्षणिक पात्रता व्यवहारी जीवनात यशस्वी होण्यासाठी पुरेशी नसते. तिथे यशस्वी होण्यासाठीचे आणखी काही निराळे निकष असतात. भावनिकदृष्ट्या व्यक्ती कार्यक्षम व परिपक्व असणं तसंच स्वत:च्या व दुसऱ्यांच्या भावनांची योग्य तऱ्हेने हाताळणी करण्यात तरबेज असणं महत्त्वाचं असतं. थोडक्यात, बौद्धिक गुणांकापेक्षा भावनिक गुणांक तुमच्या आयुष्यावर यशाची मोहर उठवण्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा ठरतो.
भावनिक हुशारी नसलेल्या व्यक्तीला बुद्धी असली तरी तिचा योग्यप्रकारे उपयोग करून घेता येणार नाही. दैनंदिन जीवनात क्षणोक्षणी भावनिक हुशारी आवश्यक ठरते. ती नसेल तर लहानसहान निर्णय घेणं जमत नाही, घेतले तरी चुकीचे ठरण्याची शक्यता असते. मग आत्मविश्वासाचं खच्चीकरण होऊन व्यक्ती निराश होते, मनात न्यूनत्वाची भावना निर्माण होते. काहीच मनासारखं घडत नाही असं वाटून वैफल्यग्रस्तता येते. शिक्षणाची कुठली शाखा निवडावी, कोणत्या प्रकारची नोकरी निवडावी, जोडीदार कसा असावा अशासारखे निर्णय भावनिक हुशारी नसल्याने चुकू शकतात. कारण अर्थातच स्वत:ला आणि इतरांना समजून घेण्यातील असमर्थता.
भावनिक गुणांक (EQ) हा आपल्याला केव्हाही वाढवता किंवा सुधारता येतो. IQ म्हणजे बुध्यांकवाढीसाठी जशी साधारण वीस वर्षं ही वयोमर्यादा असते तशी EQ च्या बाबतीत नसते. तो कोणत्याही वयात पद्धतशीर प्रयत्न केल्यास वाढू शकतो. पण असे प्रयत्न मुलांच्या लहानपणीच केले तर भावनांवर योग्य नियंत्रण येऊन अनेक गोष्टी सुकर होऊ शकतात. भावनिक प्रगल्भता, परिपक्वता येण्यास निश्चित मदत होऊ शकते.