“आजकाल फक्त पाहत राहायचं आणि अप्रिय गोष्टींना सहन करण्या शिवाय पर्याय नाही” असं म्हणत साठीतील मॅडम समुपदेशन साठी आल्या होत्या. त्यांना शांत करता करता मनात अनेक विचार डोकावून गेले.
सध्याच्या गतिमान आणि तीव्र स्पर्धेच्या काळात दैनंदिन जीवन जगताना ताणतणावांना, संघर्षाला तोंड देताना अनेकांची ‘मनःस्वास्थ्य’ शब्दाशी फारकत होताना दिसते. मनाप्रमाणे गोष्ट झाली नाही किंवा अपेक्षाभंग झाला तर चिडचिड हा स्वभावधर्म बनतो अन् कुठल्याही गोष्टीवर रागावणं, चिडणं, संतापणं, कटकट करणं अशा प्रतिक्रिया दिल्या जाऊन स्वत:च्या आणि इतरांच्या आयुष्यातील आनंद, सुख, समाधान आणि शांती ही निरामय जीवनासाठी अत्यावश्यक असणारी चतु:सूत्री हरवून जाते.
इथे मानसिक आरोग्याची व्याख्या महत्त्वाची आहे. यात तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत.
१. तुम्ही स्वत:शी कंफर्टेबल असला पाहिजेत,
२. इतरांना तुमच्या सान्निध्यात छान वाटलं पाहिजे,
३. तुम्ही स्वत:मधील दोष, उणिवा शोधून त्या दूर करत राहिलं पाहिजेत.
म्हणजे नेमकं काय?
१. स्वत:शी स्वस्थ असणं म्हणजे आत्मभान असणं.
२. आपण आपल्याला ओळखणं.
३. आपल्या दैनंदिन जीवनात शारीरिक अथवा मानसिक स्तरावर काही बिघाड झाल्यास चटकन लक्षात येणं.अन् ते पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करणं.
ज्यांना आपल्या स्वत्वाची स्पष्ट जाणीव असते, आपला आतला आवाज जे ऐकू शकतात, त्यांना आपल्यातील सूक्ष्म पातळीवर होणारा बदलदेखील जाणवतो. अशांना आपल्यातील क्षमतांचा योग्य वापर करणं, मर्यादा लक्षात घेऊन त्यावर मात करण्याचा प्रयत्न करणं, संधीचा उपयोग करणं, धोके ओळखून आव्हानं स्वीकारणं इ. जमतं अन् त्यातूनच ते विकसित होत जातात. वास्तवाची जाणीव अन् विवेकाची कास हाती असल्याने त्यांचा परिस्थितीवरचा ताबा सुटत नाही. स्वत:चे प्रश्न स्वबळावर स्वतंत्रपणे, इतरांवर अवलंबून न राहता सोडवण्यावर त्यांचा भर असतो. मात्र आवश्यक तिथे ते इतरांचं साहाय्य जरूर घेतात.
महत्त्वाचं म्हणजे स्वत:शी स्वस्थ असणारी ही मंडळी न कुरकुरता आयुष्याला सामोरी जातात. जिथे शक्य आहे तिथे परिस्थितीत बदल घडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात. जिथे बदल संभवत नाही तिथे परिस्थितीचा विनातक्रार स्वीकार करतात. यांच्यात समायोजनक्षमता भरपूर असल्याने ते प्रतिकूल परिस्थितीतही तग धरून राहतात. लहानसहान अपयशाने खचून जात नाहीत.
‘जगा आणि जगू द्या’ हे तत्त्व जोपासणाऱ्या या स्वस्थ माणसांच्या सान्निध्यात इतरांना अर्थातच स्वस्थ वाटतं. विचार आणि भावनांवर पूर्ण नियंत्रण आणि विधायक दृष्टिकोनामुळे इतरांना त्यांच्यापासून धोका नसतो. कारण दुसऱ्याला इजा किंवा नुकसान करण्याची त्यांची मुळातच वृत्ती नसते. स्वत:कडे, इतरांकडे आणि परिस्थितीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असल्यामुळे स्वत:मधील आनंदाच्या झऱ्याचा त्यांना माग काढता येतो, बाहेरच्या जगातील आनंदाचं निधानही सहजी सापडतं. थोडक्यात, “आनंदाचे डोही आनंद तरंग”, असं त्यांचं जगणं असतं. मात्र ही गोष्ट सर्वांना शक्य होत नाही, असं जगणं जमत नाही.
समुपदेशन करणं सोपं परंतु समोरील व्यक्तीच्या मनात एखादी गोष्ट बिंबवणे अवघड. लहानसहान गोष्टीनेही निराश आणि खचून जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अपयश आलं की प्रयत्न सोडून देऊन दिशाहीन आयुष्य जगणारे, जुने अपमान मनात धगधगत ठेवून बदला घेण्याची वाट बघणारे, प्रियजनांच्या मृत्यूच्या दु:खाने उन्मळून कोसळून आयुष्य अर्थशून्य वाटणारे, गंभीर आजाराने हताश होऊन आत्महत्येचा विचार करणारे जीव शारीरिक आणि मानसिक स्तरावर किती अस्वस्थ, त्रस्त, अशांत असतात याची कल्पनाच केलेली बरी. समुपदेशक या नात्याने मी जेव्हा जेव्हा स्वस्थ आणि अस्वस्थ लोकांच्या मनाचं विश्लेषण करतो तेव्हा या दोन्ही प्रकारच्या लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीतील, दृष्टिकोनातील फरक प्रकर्षाने लक्षात येतो.
मानसिक, भावनिकदृष्ट्या सक्षम, खंबीर असणारे अन् तसे नसणारे यांच्या विचारांमध्ये एक फरक असतो. एक घटना घडली तरी प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात. कुठल्याही गोष्टीला, घटनेला आपण प्रतिसाद देत आहोत, की प्रतिक्रिया, हे लक्षात न आल्याने देखील चुका घडतात. अन् जागरूक न राहिल्यामुळे ‘मला तसं म्हणायचं नव्हतं, चुकून माझ्या तोंडून तो शब्द निघून गेला’ अशी सारवासारव गैरसमजातून निर्माण झालेल्या परिस्थितीत करत बसावी लागते. त्यामुळे स्वत:ला अन् समोरच्याला ताप होतो तो वेगळाच.
मात्र हे चित्र संपूर्णपणे बदलता येतं. त्यासाठी अस्वस्थतेतून स्वस्थतेकडे, सुखाकडे नेणारं, विचारांमध्ये परिवर्तन घडवणारं, त्यांना विवेकाची जोड देणारं, भावनांवर योग्य नियंत्रण ठेवण्यास शिकवणारं खूप काही आहे.
विचारांना आपल्यावर स्वार होऊ न देता त्यांचे लगाम आपल्या हाती असले पाहिजेत एवढं भान ठेवलं तरी बऱ्याच गोष्टी साध्य होतात. विचार किंवा भावना यांवरील नियंत्रण सुटलं की माणूस अनिर्बंध वागू, बोलू लागतो. सुटलेला बाण आणि उच्चारलेला शब्द परत घेता येत नाही हे माहीत असूनही माणसं त्याच त्या चुका पुन:पुन्हा करत राहतात अन् दु:खी होतात. सोपं जगणं अवघड करून टाकतात. आयुष्याचं गणित स्वत:पुरतं सोपं केलं तरी आपण स्वत:ला आणि कुटुंबियांना अनेक प्रश्नचिन्हांपासून वाचवू शकतो.