मनातील भावना कोणकोणत्या व्यक्तिसमोर मांडल्या पाहिजे, असा प्रश्न समुपदेशन दरम्यान एका क्लायंटने विचारला.
आपल्या मनातील भावना कोणत्याही अपेक्षा विन व्यक्त करणे यात अजिबात चूक नाही. उलट आपले भाव व्यक्त केल्याने मन हलकं होत. जर भाव व्यक्त केले नाही तर त्याचा विपरीत परिणाम मनावर आणि परिणामी शरीरावर होतो.
सर्वात प्रथम स्वतःसमोर मनातील भावना मांडायला शिकावं. मग ती भावना आनंदाची, दुःखाची, हरण्याची, असफल होण्याची किंवा प्रेमाची,रडण्याची असो. स्वतः पेक्षा विश्वासार्ह व्यक्ती कोण असेल ना!! यातुन स्वतःला समजुन घ्यायला शिकता येईल. बर्याचदा पुर्ण जगाला समजुन घेण्याच्या घाईत आपण स्वतःला तितका वेळंच देत नाहीत. असं स्वतःसमोर व्यक्त होऊन स्वतःला माफ करता येईल, स्वतःला प्रोत्साहन देता येईल. नाहीतर चुकीच्या ठिकाणी चुकीच्या भाषेत जर भावना व्यक्त झाल्यास गैरसमज होण्याची शक्यता जास्त असते.
जोपर्यंत तुम्हाला स्वतःसमोर स्वतःच्या भावना व्यक्त करणे जमणार नाही तोपर्यंत दुसर्यांसमोर त्या गोष्टी सांगता येणार नाहीत. शेवटी स्वतःला नीट करणे स्वतःच्या हातात असतं. बाकी लोक फक्त तुमचं बोलणे ऐकुन सल्ला देतील. तुमचं दुःख ऐकून काहीजण तर मनात आनंदी होतील. आणखी नकारात्मक बनवतील. म्हणुन जर तुम्ही कुणासमोर व्यक्त होणार असाल तर आधी याची पडताळणी करा की ती व्यक्ती तुमची परीस्थिती समजुन घेऊ शकेल. जेव्हा आपण स्वतःशी बोलतो तेव्हा आपल्याला त्यातील काही बारकावे आपोआप क्लीक होतात.
समजा तुम्हाला कुणी आवडतं आणि तुम्हाला ती भावना त्या व्यक्ती समोर व्यक्त करायची आहे. मग ठरल्याप्रमाणे तुम्ही स्वतःसमोरच आधी भावना व्यक्त करताय. तेव्हा तुम्हाला ही जाणिव होऊ शकते की ज्या व्यक्तीला आपण भारी समजतोय ती व्यक्ती आपल्याशी केव्हा कसं वागली आहे. केव्हाच तीने आपल्याला काळजी दाखवली नाही, मदतीचा हात दिला नाही, कधीच प्राधान्य दिलं नाही मग क्षणभर थांबुन तुम्ही गुढ विचार कराल व तुम्ही सर्व क्षण रीवाईन्ड करणार तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही भावना व्यक्त करायची गरज आहे का, त्या व्यक्तीची ती पात्रता आहे का. कारण बर्याचदा आपल्याला कुणी आवडलं म्हणुन त्याची नकारात्मक बाजु आपण दुर्लक्षित करतो आणि फसतो.
बऱ्याच वेळा आपण भावनेच्या ओघात स्वतःला कुणासमोर व्यक्त करतो आणि नंतर त्याबद्दल आपल्याला पश्चाताप होतो. मग आईवडील असो की मित्रमैत्रिणी. कुठल्या विषयावर कुणासमोर हे देखिल महत्वाची आहे. प्रत्येक गोष्ट त्या व्यक्तीसमोर व्यक्त व्हाल तर तुमच्या भावनेला कुणी आदर देणार नाही. म्हणुन जेव्हा तुम्हाला स्वतःला एखादी भावना सांभाळली जात नसेल तेव्हाच आपल्याला जी व्यक्ती समजुन घेईल अस वाटतं तसा जुना अनुभव आहे त्या व्यक्तीसमोर मोकळे झालात तर छान वाटेल.
स्वतःपेक्षा जास्त वेळ तुम्हाला कुणीच देऊ शकत नाही. मिळालेला खांदा विश्वासार्ह असेलच किंवा नेहमीच सोबत असेलच असं नाहीना!! कदाचित ती व्यक्ती अगोदरच त्रासलेली असू शकते. म्हणुन व्यक्त होण्यासाठी पुर्णपणे कुणावर अवलंबुन नका राहु. पण जेव्हा जास्तच गरज भासेल तेंव्हा चांगला समुपदेशक गाठलेला बरा.