आज सकाळी जेव्हा तुम्ही उठलात, तेव्हा प्रथम काय केलंत? आंघोळीला गेलात, तुमचे इ-मेल, मेसेजेस पाहिलेत? तुम्ही तुमचे दात आंघोळीच्या आधी घासलेत की नंतर? पहिल्यांदा डाव्या किंवा उजव्या बुटाची नाडी बांधलीत? कामासाठी बाहेर पडताना तुम्ही तुमच्या मुलांशी काय बोललात? तुम्ही ऑफीसला कोणत्या रस्त्याने गेलात? तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये तुमच्या टेबलपाशी पोहोचलात, तेव्हा प्रथम तुमच्या इ-मेलना उत्तरे दिलीत, सहकार्यांशी बोललात की थेट कामाला सुरुवात केली? आपण आपले संपूर्ण आयुष्य, जे काही चाकोरीबद्ध जगतो, तो सगळा एकत्र सवयींचा परिणाम असतो. आपण दररोज करत असलेल्या बहुतेक निवडींमागे आपल्याला वाटत असतं की, ते फार विचारपूर्वक घेतलेले निर्णय आहेत परंतु प्रत्यक्षात तसं नसतं. खरंतर त्या सवयी असतात.
मग जरी एखादी सवय क्षुल्लक वाटली तरी कालांतराने, जेवणाची दिलेली ऑर्डर, आपण आपल्या मुलांशी रोज रात्री काय बोलतो, पैसा शिल्लक टाकतो की खर्च करतो, व्यायाम किती वेळा करतो आणि आपल्या विचारांना, रोजच्या कामांना कशी शिस्त लावतो, या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर, उत्पादकतेवर, आर्थिक सुरक्षेवर आणि आनंदावर खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतो, परिणाम होतो. दररोज केल्या जाणार्या कृतीपैकी 40 टक्क्यांहूनही अधिक काम हे प्रत्यक्षात निर्णय नव्हते तर त्या सवयी होत्या असे काही संशोधनामध्ये दिसून आले आहे.
सवयींचे सामर्थ्य मोठे आहे. परंतु त्या नाजूक असतात. त्या आपल्या नकळत लागू शकतात किंवा मुद्दाम सुद्धा लावल्या जाऊ शकतात. त्या अनेक वेळा आपल्या परवानगीची वाट न बघता डोके वर काढतात. त्यांच्यातील काही गोष्टींमध्ये बदल करून त्यांच्यात मोठे परिवर्तन घडवून आणता येऊ शकते. आपल्या लक्षात येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर त्या आपल्या आयुष्याला आकार देत असतात. त्यांचा पगडा इतका मोठा असतो, की इतर सगळे सोडून, आपली व्यावहारिक अक्कल सुद्धा बाजूला ठेवायला लावून, त्या आपल्या मेंदूला त्यांच्या अधीन करून घेतात.
मग नवीन सवयी कशा तयार करायच्या?
तो फॉर्म्युला म्हणजे “सूचना – नित्यक्रम – बक्षीस”. सूचना, नित्यक्रम आणि बक्षीस यांचा समन्वय साधून, नंतर पद्धतशीरपणे तल्लफ निर्माण करून सवयीच्या चक्राला चालना दिली जाते. सवय तेव्हाच तयार होते, जेव्हा सूचना बघताक्षणी आपल्यामध्ये तल्लफ तयार होऊ लागते. एकदा तल्लफ तयार झाली, की आपण आपोआप कर्म करू आणि त्या सवयीप्रमाणे वागू लागतो.
त्यासाठी आपण मोबाईल वापराचे उदाहरण घेऊ या. जेव्हा व्हॉट्सॲप वापर करणार्याला काहीतरी सूचना मिळते- उदा. बझ होणे, लगेच आपण मोबाईल कडे आकर्षित होऊन मेसेज चेक करतो, बक्षीस काय तर, नवीन माहिती किंवा मित्र मैत्रिणीचा संदेश वाचून आनंदी होतो. जर आपण मोबाईल फोन चा आवाज बंद ठेवला तर तुम्ही विचलित होणार नाहीत व पुन्हा पुन्हा मोबाईल कडे आकर्षित होण्याची सवय जडणार नाही.
वैज्ञानिकांनी अतिमद्यपान करणार्या, धूम्रपान करणार्या आणि खादाड व्यक्तींच्या मेंदूचा अभ्यास करून तल्लफ मेंदूमध्ये पूर्णपणे रुजल्यानंतर त्यांच्या न्युरॉलॉजीमध्ये – मेंदूच्या रचनेमध्ये आणि त्यामधील न्युरो रसायनांचे अभिसरण यामध्ये – काय बदल घडतात, याची नोंद घेतली आहे. विशेषतः अनावर होणार्या सवयींबद्दल संशोधकांनी लिहिले आहे, की अशा सवयींची व्यसनाधीनतेप्रमाणे लक्षणे दिसायला लागतात, ज्यामुळे हव्या असलेल्या गोष्टीचे अतिरेकी तलफेमध्ये रूपांतर होऊन त्या सवयी मेंदूला स्वतःहून कृती करायला प्रवृत्त करतात. याचे भयानक परिणाम दिसत असतील, जसे स्वप्रतिष्ठा, नोकरी, घर, परिवार अशा गोष्टी पणाला लागत असतील, तरीसुद्धा तशी कृती होते. याची प्रचिती आपल्याला समाजात वारंवार दिसून येते.
एखाद्याच्या व्यसनाधीन सवयीमुळे कुटुंबावर संकट येते. अशा सवयी दूरच ठेवलेल्या बऱ्या अन्यथा मानसिक आरोग्य खराब होण्याची दाट शक्यता असते. म्हणून सवयी नियंत्रित ठेवण्याची पद्धत स्वतःहून तयार करणे क्रमप्राप्त आहे.