अनेक मुलींच्या किंवा सूनांच्या आयुष्यात केवळ चांगला संवाद न केल्याने वादळाचा सामना करावा लागतोय ही वस्तुस्थिति नाकारता येत नाही. स्नेहाला याच बाबतीत समुदेशन करताना अनेक पैलूंवर चर्चा झाली.
जे लोक मुलींचे पालनपोषण करून त्यांना शिकवून मोठे करतात व तिचे लग्न करून देणे हे पुण्याचे काम समजतात, तेसुद्धा सदैव चिंतेने ग्रासलेले असतात. सासरच्या लोकांचे समाधान होईल, एवढे धन जमवता येईल का म्हणून प्रयत्न करतात. कधी कधी तर हुंड्याच्या स्वरूपात धन हडपल्यानंतर लोभी लोक काही ना काही निमित्ताने सुनेला माहेरी आणून सोडतात. अशावेळी तिची शैक्षणिक पात्रताच तिचा आधार ठरते.
मुलींना शाळा-कॉलेजचे शिक्षण, कलाकौशल्य आणि संसारातील कामाचे प्रशिक्षण देण्यासोबत त्यांना संभाषणकलेत प्रवीण केल्यास ती त्यांची कायम संपत्ती बनेल. जिला कुणीही हडपू शकणार नाही अथवा हिसकावून घेणार नाही आणि ज्याच्या आधारे सासरच्यांना संतुष्ट करून आपल्या संसाराची नीट घडी बसवतील. काही अनिवार्य कारणामुळे तिला जर पतीपासून वेगळे व्हावे लागले तर तिला आपल्या सन्मानाचे रक्षण करीत आपल्या जीवनाला एक नवीन व उपयोगी असे वळण देऊन सुखी बनवता येईल. यासाठीच उपवर मुलीला ‘संभाषणकले’चा स्वत: प्राप्त केलेला हुंडा आपल्यासोबत घेऊन जाणे खूप जरुरी आहे.
संभाषणकला तसेच व्यवहारात प्रवीण व चाणाक्ष सुनांद्वारे घरातील स्थिती, कौटुंबिक संबंध, मुलांची काळजी व शिक्षण, प्रशिक्षण इ. मध्ये आणले जाणारे सुधारणात्मक बदलामुळे होणारे लाभ आणि सुख-शांतीची अनेक उदाहरण आपण पाहतो. ते हे सिद्ध करतात की, मुलीच्या लग्नात दिला जाणारा हुंडा व पैशाच्या तुलनेत त्यांना बालपणापासून संस्कारासोबत दिले जाणारे संभाषणकलेचे प्रशिक्षण सर्वाधिक लाभदायक ठरते.
पुष्कळ घरात स्त्रियांना अचूक पद्धतीने संभाषण करता न आल्याने सासू-सुना, नणंद-भावजय, जावा-जावा व पती-पत्नी यांच्यात अकारण कलह उत्पन्न होऊन कटुता निर्माण होतो आणि शेजारी तसेच संबंधितांशी वाद व्हायला लागतो. ज्यामुळे आपापसातील सद्भावना व सहयोग विरून जातो. संभाषण कलेपासून वंचित मनाला लागेल असं बोलणारी, भांडखोर सून लाखोंचा हुंडा देऊनही सासरी कलहाचं कारण बनते आणि तिरस्कृत तसेच उपेक्षित राहते.
मानवी जीवनातील यश व सुखाचे प्रमुख साधन आहे- ‘संभाषणकलेतील नैपुण्य!’ इतर सर्व कलांप्रमाणे ही अभ्यास व निरंतर साधनेने शिकता येते, ज्याची सुरुवात बालपणापासूनच व्हायला हवी. यासाठी घरातील सर्व सदस्यांद्वारे जागरूकपणे आपापसातील बोलणे-वागण्याने सहृदय, मधुर वातावरण बनवण्याचा सराव करणे व करवून घेण्याची गरज असते. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा गृहिणी व माता या कलेत प्रवीण होतील. हा सराव काळजीपूर्वक हवा.
१. घरात बोलताना आवाजाचा चढ उतार, स्पष्टता आणि मोजकेच बोलणे.
२. आदर कुठे व कसा द्यावा. कुठे बोलण्याची पद्धत कशी असावी हे पालकांना माहिती हवं. काळ वेळ याचे भान असणे तितकेच महत्त्वाचे.
३. शब्द संग्रह मुबलक असला पाहिजे व योग्य शब्द योग्य ठिकाणी बसवता आले पाहिजेत.
४. दुखावणाऱ्या भाषेपेक्षा संतुलित संभाषण योग्य पद्धतीने करणे जरुरी.
५. आत्मविश्वास वाढवून बोलण्याची लकब योग्य करण्यासाठी आरशाचा वापर केल्यास फरक जाणवेल.
६. वेळीच हस्तक्षेप करून मुलांमध्ये असणाऱ्या चुका परिपक्वता दाखवून नीट कराव्यात.
७. योग्य मानसिकता असल्यास संभाषण सुयोग्य होते. ती नसल्यास मौन केंव्हाही चांगले. मनावर संयम ठेवण्यासाठी अनेक पद्धतीचा वापर होतो.
यामुळेच मुलींना विशेषत्वाने संभाषणकलेत प्रवीण करण्याचा प्रयत्न बालपणापासूनच व्हायला पाहिजे. जो त्यांच्यासाठी सर्वोत्तम हुंडा तसेच जीवनाच्या प्रत्येक क्षणात कामी पडणारे अमूल्य ठेवा होईल. खऱ्या अर्थानं मानसिक आरोग्य नीट ठेवायचं असेल तर संभाषण सुयोग्य ठेवायला हरकत नाही. लक्षात ठेवा, या दोन्ही गोष्टी परस्पर संबंधित आहेत.
योग्य संभाषण कला सर्वांनच कामी येते म्हणून आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे, बोलण्याच्या माध्यमातून इतरांमध्ये ऊर्जा कशी निर्माण होईल असा विचार केल्यास जीवन आजुन सुंदर व सुसह्य होईल.
श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ञ