कलहप्रिय व्यक्ती

जी माणसं स्वत:वर खूश असतात, ज्यांचा अहं तृप्त असतो, अशी माणसं इतरांना प्रेम, कौतुक, आदर व आधार देतात. ते ईर्षा, मत्सर अशा भावनांच्या आहारी जात नाहीत. स्वत: शांत राहून तणावजन्य परिस्थिती व कलहाचे शांतीने व्यवस्थापन करतात.

याविरुद्ध काही व्यक्ती कलहप्रिय मानवी मनोवृत्तीचे प्रतिनिधीत्व करतात. पुष्कळदा दोन कलहप्रवृत्त पक्षांपैकी एक थोडा-फार सुजाण असतो. प्रसंगी माघारही घेतो; पण दुसऱ्या पक्षाला त्याची ही सात्त्विक वृत्ती पसंत पडत नाही. न्यायाच्या बुरख्याखाली त्याला आपला स्वार्थ साधायचा असतो. त्याला पोकळ विजयाचं समाधान मिळवायचं असतं. त्याला आपल्या आंधळ्या अहंकाराची तृप्ती करून घ्यायची असते! जगातल्या सर्व कलहांचं बीज या इच्छेतच असतं. दुसऱ्याचा मोठेपणा, चांगुलपणा, श्रेष्ठत्व कबूल करणं करावा लागणं हाच मुळी त्या व्यक्तींच्या ‘आत्मसन्मानाला धोका’ वाटू लागतो आणि स्वत: तणावग्रस्त होतात, म्हणूनच मत्सरग्रस्तही बनतात. हा धोका दूर करण्यासाठी अशा श्रेष्ठ माणसाला नामोहरम करणं आवश्यक आहे, असं त्यांना वाटू लागतं आणि अर्थातच पुढं अशा कृती त्यांच्या हातून घडतात. कुणाचं कौतुक करणंही त्यांना जमत नाही. प्रेम, आदर, कौतुक या गोष्टी, खरं म्हणजे, देता-घेता वाढणाऱ्या; पण आत्मकेंद्रित व्यक्ती याबाबतीत फारच दरिद्री असतात.

ही माणसं स्वत:च स्वत:साठी व इतरांसाठीही तणावजनक असतात आणि ईर्ष्या, मत्सर, स्वार्थ यामुळं सतत कलह निर्माण करीत असतात. त्यांच्या प्रतिक्रियाही अशा परिस्थितीत चुकीच्या व त्यांच्यासकट सर्वांसाठी अहितकारक असतात.

जी माणसं स्वत:वर खूश असतात, ते आत्मगौरवानं संतुष्ट असतात, ज्यांचा अहं तृप्त असतो, अशी माणसं प्रेम, कौतुक, आदर, आधार इतरांना देतात. खूप दिलं की, खूप परत मिळतंही. ते ईर्ष्या, मत्सर अशा भावनांची कुरघोडी स्वत:वर होऊ देत नाहीत किंवा अशा भावनांच्या आहारी जात नाहीत. त्यामुळं स्वत: शांत राहतात. राहू शकतात. तणावजन्य परिस्थिती व कलह टाळतात.

आपल्या मनावरील ताण हलके करण्यासाठी काय करता येईल?
१. आत्मपरीक्षण करायचं. ‘मी असा वागत नाही ना, हा प्रश्न स्वत:ला वेळोवेळी विचारायचा. उत्तर ‘होय’ असेल, तर स्वत:ला बदलायचं. कारण ही वृत्ती आत्मघातकी आहे. ती तुम्हांला सुखानं जगू देत नाही. शिवाय फक्त आपणच आपल्याला बदलू शकतो.
२. माणसं अशीही असतात, नव्हे असतातच, हे स्वत:ला समजाविणं, पटविणं. अशी माणसं ओळखता येणं. त्यांच्या वृत्तीचा स्वीकार करून, त्यांच्यापासून स्वत:चं संरक्षण करणं. ही माणसं अशी का? त्यांनी असं वागू नये किंवा वागताच कामा नये, असे प्रश्न आणि हट्ट आपण मनात बाळगतो, म्हणून दु:खी आणि तणावग्रस्त होतो.
३. तसा माणूस आणि त्याची वृत्ती बदलणं कठीण. पण त्यांच्या वृत्तीचा उपयोग तुम्ही शहाणपणानं करून घेऊ शकता.
४. विशिष्ट माणसांनी असं वागू नये, असा कोणता वैश्विक नियम आहे?

या पूवीही समाजात चांगले होते, तसे दुष्टही होते. सज्जन होते, तसे दुर्जन होते. ‘शूर’ होते, तसे ‘दुबळे’ होते. त्यागी होते, तसे भोगी, स्वार्थीही लोक होते. आताही आहेत आणि यापुढंही असणार. या सर्वांच्या सोबतच हसत जगता आलं पाहिजे आणि अशी हसत जगू शकणारी माणसंदेखील होती. आहेत. पुढं असतील. या सगळ्याचा ‘स्वीकार’ हवा. तो स्वत:वरील ताण हलका करण्यासाठीच. एकदा का हे जमलं की, आपल्याला या स्वभाववैचित्र्यांचा ताण न येता, त्यातील विविधतेची मजा वाटायला लागेल आणि मग हा ‘माणसांचा खेळ’ हसत खेळता येईल. हसत जगता येईल.

©श्रीकांत कुलांगे
मानसोपचारतज्ज्ञ
9890420209

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *