या जगामध्ये सर्वच जण आनंदाचा शोध घेत असतात, पण तो मिळविण्याचा फक्त एकच मार्ग आहे, आपण आपले विचार नियंत्रणात ठेवूनच आनंद मिळवू शकतो.
आपण आपला व्यक्तिमत्व विकास करताना आपल्या स्वभावाची जाणीव ठेवून आनंदी राहण्याचे नियम कटाक्षाने पाळावे असा सल्ला अनेक ठिकाणी वाचायला मिळतो.
आनंद काही कोणत्याही बाह्य परिस्थितीवर अवलंबून असत नाही. तो तर आपल्याला आपल्या आत शोधावा लागतो. तुम्ही काय आहात कसे आहात, कुठे राहता, काय करता या गोष्टीवर तुमचे सुख-दु:ख अवलंबून असत नाही. त्याचा संबंध तर थेट तुमच्या विचाराशी आहे. उदाहरणार्थ दोन व्यक्ती एकाच ऑफिसमध्ये काम करतात. त्यांना पगारही सारखाच मिळतो. पण त्यांच्यापैकी एक जण खूप सुखी असतो तर दुसरा खूप दु:खी असतो. कारण? कारण परिस्थितीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. उष्ण प्रदेशात रणरणत्या उन्हात काम करणारा शेतकरीही तितकाच आनंदी असू शकतो, जितका पुणे, मुंबई किंवा दिल्ली मधील एखाद्या वातानुकुलीत कार्यालयात काम करणारा अधिकारी असू शकतो. फक्त त्या शेतकर्याची विचारसरणी सकारात्मक असायला हवी.
कोणतीही वस्तू चांगली किंवा वाईट असत नाही. तिला चांगले किंवा वाईट आपला दृष्टिकोन ठरवित असतो. बहुतेक लोकांना जितके आनंदी रहायचे असते तितकेच ते आनंदी राहत असतात.
आनंदी राहण्याचे काही ठळक क्लृप्त्या आपण वापरायला हरकत नाही, जसे की,
१. बाहेर जाताना आपली हनुवटी आतल्या बाजूला ओढणं.
२. कपाळावरील आठ्या जाणीवपूर्वक काढून बाहेर वागणं.
३. भरपूर श्वास घेत राहणं.
४. सूर्याचा प्रकाश घेणं.
५. आपल्या मित्राचे हासून अभिनंदन करणं आणि प्रत्येक वेळी मोकळ्या मनाने हस्तांदोलन करणं.
६. तुम्हाला चुकीचे समजले जाईल ही गोष्ट आपल्या मनातून काढून टाका.
७. वैर्यांचा किंवा शत्रूचा अजिबात विचार करू नका.
८. आपल्याला काय करायचे आहे ते आधी नक्की करणं.
९. कोणत्याही प्रकारे इतस्त: न भटकता थेट आपल्या ध्येयाच्या दिशेने निघणं.
१०. आपले डोके नेहमी चांगल्या कामावर केंद्रित करा.
योग्य मानसिक दृष्टिकोन आणि प्रत्येक ध्येय मिळविण्यासाठी धाडस, प्रामाणिकपणा आणि आनंद आवश्यक असतो. आपले मन जसा विचार करीत असते तसेच आपण घडत असतो. म्हणून आनंदी स्वभाव आवश्यक आहे. शांघाय येथे एका हॉटेल मध्ये पाटी पहिली, ‘ज्या व्यक्तीकडे हसणारा व आनंदी चेहरा आहे त्याला दुकान उघडण्याची अजिबात आवश्यकता नाही.’ थोडक्यात, तुमचे आनंदी हास्य म्हणजे तुमच्या चांगल्या भावनांचा संदेश वाहक असते. तुमच्या हसण्यामुळे, आनंदी राहण्या मुळे तुमच्या चेहर्यावर पडणारी प्रत्येक दृष्टीचे जगणे प्रज्वलित होत असते. नक्कीच प्रयत्न करा.
श्रीकांत कुलांगे
मानसोपचारतज्ज्ञ