प्रेमाचे नाते

 

प्रियकर-प्रेयसी चे नाते कसे असावे याबाबत कालानुरूप काहीही बदल झालेले नाहीत फक्त पद्धत बदलली. काही तरुण तरुणींना समुपदेशन करताना प्रेम म्हणजे नेमकं काय ते समजून सांगणं कठीण नसतं. हा जीवनातील अविस्मरणीय प्रवास. शारीरिक आकर्षण व प्रेम ह्या विषयीचे ज्ञान असणं आवश्यक. अन्यथा जीवनाचा एक भाग असलेल्या या गोष्टीमळे अनेकांचे संपूर्ण आयुष्यच उध्वस्त झालेलं आहे. लग्न करत असताना व निभावताना, प्रेम हा महत्वाचा भाग असतो.

प्रेमाच्या नात्याविषयीचे तरुण तरुणींचे विचार दोन प्रकारचे असतात, आदर्श प्रेम व बेगडी प्रेम. प्रथम आदर्श प्रेमाबद्दल बोलू.

१. समोरील व्यक्तीची वैचारिक क्षमता लक्षात घेऊन आपल्या जोडीदाराची निवड करतात.

२. कसा दिसतो पेक्षा कसा असतो ह्याला प्राधान्य देतात.

३. भावनेच्या आहारी न जाता जोडीदाराचे विचार, महत्वाकांक्षा, भविष्यातील ध्येय, भावी योजना या विषयावर चर्चा करतात.

४. एकमेकांना परिपूर्ण ओळखतात.

५. मानसिक सक्षमता समजून घेतात. सहनशीलता हा गुण असतो.

६. आलेल्या संकटाना धैर्याने सामोरे जाऊन मैत्री, विश्वास व प्रेमाचे नाते जन्मभर टिकवतात.

आता बेगडी प्रेम म्हणजे टाइमपास व शारीरिक आकर्षण यातून जन्मलेले वैचारिक अपत्य. यामध्ये प्रेमाचा अर्थ या व्यक्ती स्वतःच्या स्वार्था नुसार काढत असतात.

१. काहींचे प्रेम हे जोडीदाराची शरीरयष्टी, सौंदर्य बघून असते तर काहींचे गाडी, संपत्ती बघून.

२. जोडीदारा समवेत फिरणे, एंजॉय करणे एवढ्या पुरता मर्यादित असतो.

३. काहींचे नाते शारीरिक सुखासाठी असते.

४. अनेक जण एकमेकांची फसवणूक करत असतात.

५. काहीजण, इतर प्रेम करतात म्हणून आपणसुद्धा करावे अशा भावना ठेवतात.

६. अनेकजण, प्रेम करत नसतात तर होऊन जात असते अशी क्लृप्ती लढवतात.

७. बरेच जण प्रेम हे प्रसादासारखे वाटत असतात.

आज समाजात बेगडी, ढोंगी प्रेम करणारे, प्रेमाबद्दल अर्धे माहिती असणारे कमी जास्त प्रमाणात आढळतात. व ज्या भागात, समाजात अशा प्रकारची असक्षम व्यक्ती असतात, त्याठिकाणी प्रेमविवाह, आंतरजातीय विवाहास विरोध होत असतो. ढोंगी प्रेम करून विवाह आई वडिलांच्या इच्छेप्रमाणे करणाऱ्या प्रियकर प्रेयसी ना समाजात दिखाऊ सन्मान मिळत असतो असे तरुण – तरुणी, आईवडील तसेच प्रियकर यापैकी कुणाशीही एकनिष्ठ राहू शकत नाही.

मग प्रेम कुणाला म्हणतात?

१. जेंव्हा आई म्हणते, संपले लहानपण आता, पुरे झाले लाड. जबाबदाऱ्या स्वीकार आणि कर्तव्य पार पाड.

२. जेंव्हा वडील म्हणतात, स्वप्न मोठे बघ, नोकरीसाठीच शिकू नको. वेळ प्रसंगी तुझ्या स्वप्नांसाठी घरदारही आपण विकू.

३. जेंव्हा भाऊ म्हणतो, अनेक कारणांमुळे जरी आपण वेगळे राहू, समस्यांवर मात करण्यासाठी एकत्रही येऊ.

४. जेंव्हा बहीण म्हणते, कठोर निर्णय घ्यावे लागतात समजू नये त्याला वार. अपेक्षा ठेऊ नये कुणीच कुणाकडून हाच जन्माचा सार.

५. जेंव्हा पती म्हणतो, समजून घेऊन मला तू सदैव दे साथ. अंतिम श्वासापर्यंत असाच माझ्या, हातात असुदे हात.

६. जेंव्हा पत्नी म्हणते, कुटुंबापुरतेच आपले जग नसावे, सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडायचे भानही नेहमी असावे.

७. जेंव्हा मुलं मुली म्हणतात, चांगल्या सवयी स्वतःला लाऊन प्रामाणिकपणे जीवन जगायचे आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी वैचारिक सामर्थ्य वाढवायचे आहे.

यालाच प्रेम म्हणतात. म्हणून समाज सुदृढ बनवायचा असेल तर आपले मानसिक आरोग्य, स्थर्य, शिक्षणाचा योग्य वापर, बघण्याची दृष्टी, रूढी परंपरा, वैचारिक प्रेम भावना यांचा अतूट परस्पर संबंध ठेवायला आणि जपायला हवा. प्रेमाची हवा मनरुपी फुटबॉलमध्ये किती व कशी भरायची हे ज्यानेत्याने आपापल्या पद्धतीने ठरवायचे असते. तरच त्या मॅच मध्ये मजा आहे अन्यथा आयुष्यभर भरलेली हवा कुठल्यातरी मार्गाने निघून जात राहील.

©श्रीकांत कुलांगे

मानसोपचारतज्ज्ञ

9890420209

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *