सहनशक्तीच्या पलीकडे

 

मागील आठवड्यात कर्जत येथील एका डॉक्टर कुटुंबानं केलेली आत्महत्या हृदय पिळवटून टाकणारी आहे. सगळं सहनशक्तीच्या पलीकडं आहे. मुलाला कमी ऐकू येतेय म्हणून समाज कुटुंबाला अपमानास्पद वागणूक देते हे वाचून वाईट तर वाटतेय. परंतु त्याही पेक्षा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सहनशक्तीचा.

‘हे सर्व माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं आहे हो! आणखी नाही मी सहन करू शकत! काय करू मी!’ मन आणि शरीर दुःखाच्या ओझ्यानं थकून गेलेलं असतं. मनाच्या जणू चिंधड्या झालेल्या असतात. विचारशक्ती लयास जाते. काय करावं समजत नाही. मार्गच दिसत नाही. समोर फक्त अंधार असतो. ‘या अंधारातून मी प्रकाशाकडे जाईन,’ अशी शक्ती मनाला राहत नाही. आणि मग अशी कुटुंब, व्यक्ती टोकाची भूमिका घेतात. ज्याच्या वंशा जावे तेंव्हा कळे ही जरी भूमिका मनात घेतली तरी यामध्ये व्यक्तींची वैचारिक परिपक्वता लक्षात येते.

मी या ठिकाणी फक्त उहापोह करतोय तो आपल्या सहनशक्तीचा. अशा कुठल्या घटना आहेत ज्या आपल्याला सहनशक्ती संपवायला कारणीभूत ठरतात?

१. कौटुंबिक कलह.

२. मुलांचा अभ्यास आणि त्यांची चिडचिड, तडफड.

३. जोडीदार अयोग्य. घटस्फोट

४. शारीरिक आणि मानसिक व्याधी. असंतुलन.

५. अपंगत्व – शारीरिक आणि बौद्धिक.

६. आत्मविश्वासाचा अभाव.

७. काहींना आर्थिक टंचाई, परिस्थिती.

८. जवळच्या व्यक्तींचा मृत्यू.

९. विनाकारण अथवा काहीतरी शोधून त्रास देणारी मंडळी.

१०. क्लिष्ट नातेवाईक, शेजार.

११. आजारपण.

१२. एकाकीपण. मन घुसमटून जाते जेंव्हा कुणी बरोबर नसते.

१३. अनावश्यक ताणतणाव. सवय.

१४. अपत्यांद्वारे वडीलधाऱ्या मंडळीला होणारा त्रास.

१५. समाजातील गुंडांचा त्रास.

१६. राजकीय, शासकीय, धार्मिक निर्णय. संप, रास्तारोको, भाववाढ, ट्रॅफिक, समजत तेढ निर्माण करणारी वक्तव्ये इत्यादी.

या सर्व गोष्टी एकमेकांशी निगडित असतात. त्यांना अंत नसतो जोपर्यंत आपण ठरवत नाही. सहन करायला शिकणं हे लहानपणा पासूनच आपल्याला नियती शिकवत असते हे काहींच्या लक्षातच येत नाही. समाज मला अपमानास्पद वागणूक देत आलाय ही नवी गोष्ट नाही. अगदी देवदिकापासून ऐकत आलेल्या गोष्टी आज सहजासहजी घरोघरी घडताना दिसतात.

मग या सहनशक्तीचा आपण जर सामना करायचा ठरवला तर शक्य आहे का, याचा विचार करायला हवा. काय पर्याय आज आपल्यासमोर आहेत?

१. औषधी. आत्यंतिक कठीण परिस्थितीतही, विदीर्ण स्थितीतूनही माणसाला बाहेर काढून विचारशक्तीला नवचेतना देण्याचं काम काही औषधं करतात. अशा दुःखामुळे मनावर विपरीत परिणाम होण्याचा धोका टाळू शकतो.

२. मानसोपचार. मन मोकळे करून घेणारे हे योग्य मार्गदर्शक असतात.

३. अनेक समुपदेशन केंद्र सरकार आणि एनजीओ च्या मार्फत चालतात. त्यांना भेटून समुपदेशन घेऊ शकता.

४. सभोवालच्या वातावरणाचा परिणाम आपल्या वर होत असेल काहीजण राहतो ती जागा बदलतात.

५. काही करा परंतु अंगारा धुपाराच्या भानगडीत पडू नये.

६. योग्य शारीरिक परिस्थिती असेल तर व्यायाम, योगा अशी सवय लावल्याने फरक पडतो.

७. चालणे, इतर व्यक्तींशी बोलणे यागोष्टी असलेल्या समस्यांना सामोरे जाण्याची हिम्मत वाढवतात.

८. शासनाच्या अनेक अपंग पुनर्वसन योजना आहेत, त्यासंबंधी समाज कल्याण विभागाला भेट देऊ शकता.

९. आपले शिक्षण पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित करणे हा सुध्दा पर्याय आहेच.

१०. कुटुंबातील काही व्यक्ती त्रास देतात. का त्रास देतात याची कारणमीमांसा केल्यास फायदा होईल.

११. आर्थिक व्यवहार आजही सर्वात जास्त सहनशक्तीची वाट लावताना दिसतात. म्हणून शक्यतो यापासून दूर राहिलेले बरे.

१२. क्लिष्ट नातेवाईक – दुरून डोंगर साजरे, असेच ठेवा.

१३. मनाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त आहार, चांगले मित्र, सवयी, झोप, इतरांना मदत करण्याची सवय चांगली.

१४. रोज स्वतःशी प्रामाणिक राहून सकारात्मक बोलणं आणि फक्त चांगल्याच गोष्टी लिहून ठेवल्याने खूप फरक पडतो.

आपण नेहमी वाचतो किंवा ऐकतो, सांगतो. ‘यत्न तो देव जाणावा। प्रयत्नांति परमेश्वर! प्रयत्ने वाळूचे कण रगडिता, तेलही गळे!’ किंवा असंच काहीतरी. प्रयत्नशील असणं हा माणसांतील मोठाच गुण आहे; मग यावर कदम टोकाची भूमिका जशी स्वतःसाठी हानिकारक आहे तशीच समाजासाठी सुद्धा.

म्हणून त्या डॉक्टर कुटुंबियांची परिस्थिती नेमकी काय होती ते देव जाणे परंतु प्रत्येकाच्या मनाला मात्र ती विचार करायला लावणारी आहे.

सहनशक्तीच्या पलीकडं जाऊन दीव्यांग व्यक्तींच्या कुटुंबीयांना हे सांगू इच्छितो की,

एखाद्या दिव्यांग व्यक्तितील एखादा अवयव किंवा क्षमता सर्व सामान्य प्रमाणे नसले तरीही अन्य अवयव, क्षमता अधिक विकसित होतात. त्या क्षमता ओळखून त्या व्यक्तीला शिक्षण / व्यवसाय शिक्षण देणे आवश्यक आहे. यामुळे ती व्यक्ती आत्म विश्वासाने पुढे येते. उदा. अंध व्यक्ती उत्तम गायक, शिक्षक, वक्ते होऊ शकतात. तर कर्णबधिर व्यक्ती लाकूड/ बांबू /वेत चे फर्निचर बनवणे, चित्रकला, मूर्तिकला, विविध खेळ, शिलाईकाम यात पुढे येऊ शकतात. क्षमताधिष्टीत विकास महत्वाचा आहे. पालकांनी निराश न होता याचे भान ठेवून सातत्यपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत.

©श्रीकांत कुलांगे

मानसोपचार तज्ज्ञ

 

 

 

 

 

 

 

 

 

 

1 thought on “सहनशक्तीच्या पलीकडे”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *