काही व्यक्ती न बोलता त्यांना आलेली विरक्ती इतरांना नकळत दाखवत असतात. ही विरक्ती सर्वच बाबतीत असते आणि त्यांच्या चालण्या, बोलण्यातून दिसते. जीवनातील छोटीछोटी सुखंही माणसाला आनंदी ठेवण्यासाठी पुरेशी असतात. ती जीवनाला चव आणतात; पण या सर्व गोष्टींमुळे आनंद मिळण्यासाठी मन संवेदनक्षम हवं. नाही का? परंतु काही आठवड्यांपूर्वी आलेली समुपदेशनाची केस अजून सुध्दा चालू आहे. काय असतात अशा लोकांच्या चालीरीती, विचार पद्धती?
१. काही ठराविक प्रकारची आपली मतं ते व्यक्त करीत राहतील. उदा. ‘माझ्यामध्ये कधी बदल होणार नाही. मी आहे हा असा आहे.’
२. अशा व्यक्तींच्या संवेदना थोड्याशा बोथट बनलेल्या असतात. सुख आणि दु:ख सारखंच वाटतं.
३. वेदना मुकाट्याने सहन करतील; पण त्याचबरोबर बरे होण्यासाठीही काही खास प्रयत्न करणार नाहीत.
४. त्यांचं आयुष्य एकसुरी झालेलं असतं. त्यांचं काम, धंदाव्यवसायही ते कर्तव्य म्हणून ते करायलाच हवे म्हणून करीत असतात; पण त्यातील मजा अनुभवत नाहीत किंवा जीवनाचा एकसुरीपणा कंटाळा आणत असेल तर काम बदलण्याचा, आणि हे बदलण्यासाठी काही खास प्रयत्न करीत नाहीत.
५. रोजच्या धंदाव्यवसायाच्या बाबतीत, इतर वैयक्तिक कामाच्या बाबतीत इतकेच नव्हे, तर आजारी असतानाही ते तक्रार करणार नाहीत.
६. कोणी बोललं तरच बोलणार, ते सुध्दा मोजून मापून.
७. चेहऱ्यावरील हावभाव फक्त ठराविक लोकांपुरतेच. नाहीतर सदानकदा बारा वाजलेले चेहरा.
८. या व्यक्ती, जीवनाला, परिस्थितीला शरण जातात. त्यांच्या लक्षात येत नाही की, ही परिस्थिती बदलता येण्यासारखी आहे; कारण ती त्यांनीच निर्माण केलेली आहे.
९. ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’. या वृत्तीचा अतिरेक हा अशा व्यक्तीचा स्थायिभाव.
१०. तो जर खालच्या पदावर काम करीत असेल व वरच्या जागांसाठी त्याला काही परीक्षा वगैरे द्यावयाची असेल तर तो देणार नाही. तो सांगेल काय फरक पडतो कारकून आणि साहेबामध्ये?
११. एखादा जेवणातील पदार्थही ते आवडीनं खाणार नाहीत, त्याची चव घेत जेवणार नाहीत. जेवण चवदार असो व नसो त्यांना काहीच फरक पडत नाही.
अशी विरक्ती, स्थितप्रज्ञता काही अंशी चांगली, सर्वसंगपरित्याग करणाऱ्या त्या संतांना ती आलेली असते आणि त्यांच्या बाबतीत ती आवश्यकही असते; पण सर्वसामान्य लोकांना, संसारात पडलेल्या लोकांसाठी ही वृत्ती अयोग्य वाटते. माणसाने हसत राहावं, जीवनातील छोट्या गोष्टींचा आनंद घ्यावा, दु:खानं रडावं देखील.
अशा व्यक्तींना मुळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो.
१. निराशेचे मुळ कारण अनेकदा जुने असते. त्याला शोधून त्यावर उपाय करणे.
२. मानसोपचार तज्ज्ञांची मदत होते.
३. त्यांना हळूहळू बोलकं करून नियमित माणसांमध्ये बसायला प्रवृत्त करणं योग्य.
४. ठराविक उपचार गरजेचे असतात. आयुर्वेद, होमिओपॅथी यामध्ये तुमच्या सवयी आणि आहार यावर डॉक्टर उपचार करू शकतात.
५. वयोमानानुसार विरक्तीचे कारणं आहेत. त्या नुसार समुपदेशक पुढील गोष्टी ठरवत असतो.
६. आत्मविश्वास डळमळीत झालेला असतो तो पुनर्जीवित करण्यासाठी काही क्लासेस आहेत.
७. शारीरिक अडचणी असतील तर फिजिओथेरपिस्ट कडे घेऊन जाता येईल. अनेक दिव्यांग व्यक्ती आज खेळ खेळतात दिसतात.
८. ग्रुप थेरेपी कामी येते.
थोडक्यात विरक्त व्यक्तींना मुळ प्रवाहात आणणे व त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी आपल्याला अनेक तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. परंतु या व्यक्तींना काही करायची इच्छा होत नाही, ती मानसिकता बदलणे मोठे काम आहे. म्हणून त्यांच्यासमोर त्यांना आवडणारी व्यक्ती, कृत्य, अशा गोष्टी प्रेरणादायी आहेत का याचा कानोसा घ्या. उगीच जन्माला घातलं आहे कसा तरी ‘टाइम पास’ करायचा ही वृत्ती चूक, त्यांना समजाऊन सांगितले तरी समजत नाही म्हणून घरातील अशी व्यक्ती त्रासदायक असते. त्यासाठी इतरांनीही मानसोपचार घेतलेला बरा. रस्ते अनेक आहेत पण योग्य निवड कुठली हे एखाद्या कुशल तज्ञालाच करुद्या.
©श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ञ
This is a Common problem these days
ठेविले अनंते तैसेची राहावे अश्या प्रकारचे लोक नेहमी आनंदी असतात. वरील उल्लेख केलेली विरक्ती ही उदासीनता दर्शवते. छान लेख !!
नमस्ते सर
लिहिलेल वाक्य न वाक्य बरोबर आहे पण बरेचदा
समोरचा माणूस स्वीकारच करत नाही कि हो मला बदलायला पाहिजे। त्या परिस्थितीत सुधारणा कशी करायची।
WhatsApp वर चर्चा करुया. ९८९०४२०२०९
कधी कधी विरक्ती ही काही कालावधीपुरती येते, ती फायदेशीर ही असते आणि व्यक्ती नंतर पुन्हा नॉर्मल होते, पण जर ते होत नसेल तर समुपदेशन आवश्यक आहे…